
भारत आणि नेपाळ यांच्यात मोठी लष्करी परंपरा आहे. भारतीय सैन्यात नेपाळी तरुण मोठ्या संख्येने सहभागी होतात. नेपाळी गोरखा हे भारतीय सैन्याचा अविभाज्य भाग आहेत. पण अग्निवीर ही व्यवस्था लागू झाली त्यावेळी भारत आणि नेपाळचे संबंध बिघडले होते. नेपाळने गोरखा तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यास मनाई केली होती.हा मनाई हुकूम कायम आहे. नेपाळचा आग्रह आहे की, नेपाळी गोरखा तरुणांना पूर्वीच्या पद्धतीने भरती करून घ्यावे तर भारत अग्निवीर या व्यवस्थेसाठी आग्रही आहे. या मुद्यावरुन सुरू झालेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निवीर म्हणून निवृत्त होताना तरुणाकडे २१ व्या शतकाला अनुसरुन तांत्रिक कौशल्य आणि भविष्याचे नियोजन करण्यासाठी मोठी रक्कम असते. शिवाय अग्निवीर म्हणून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर केंद्रात तसेच राज्यात अनेक नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळते. याच धर्तीवर नेपाळी गोरखा तरुणांना आकर्षक योजना देण्याबाबत भारतात विचार सुरू आहे. यामुळे तिढा सुटण्याची शक्यता वाढली आहे.
भारत दरवर्षी नेपाळी सैन्याच्या जवानांना आधुनिक लष्करी प्रशिक्षण देतो. मागच्या वर्षी ३०० नेपाळी जवानांना भारतात प्रशिक्षण देण्यात आले. भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश एकमेकांच्या लष्करप्रमुखांना मानाच्या जनरल पदाने सन्मानीत करतात. दोन्ही देश दरवर्षी संयुक्त लष्करी कवायत करतात. या कवायतीद्वारे लष्करासमोरील विविध आव्हानांना सामोरे जाताना परस्पर समन्वय वाढवण्यावर भर दिला जातो. यामुळे भारत आणि नेपाळच्या सैन्यात उत्तम समन्वय आहे.