कल्याण : कल्याणमधील लाल चौकी परिसरात आई आणि लहान मुलाला एका ट्रकने उडवल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणमधील लाल चौकी परिसरात हा धक्कादायक अपघात घडला. यावेळी आई आपल्या मुलाला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जात होती. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा आणि माती वाहून नेणाऱ्या ट्रकने मायलेकराला उडवले. आई आणि मुलाचा या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघाती ट्रकचा इन्शुरन्स संपलेला होता. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Alibaug Sea : अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; १५ खलाशांना वाचवण्यात यश
या अपघातानंतर तातडीने पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला आहे. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. या अपघातामधील ट्रक कल्याण डोंबविली महानगरपालिकेचा होता. मात्र, या अपघातानंतर महानगरपालिकेचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. याविरोधात माजी आमदार प्रकाश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केलं.