मीनाक्षी जगदाळे
[email protected]
आपल्यावर आलेल्या परिस्थितीसाठी सासरच्यांना, माहेरच्यांना, इतरांना कोणालाही दोष देऊन वाद घालत बसू नका. ज्या घरात पती पत्नीला विचारत नसतो तिथे कोणीच तिची किंमत करत नाही. त्यामुळे उगाच याला, त्याला आपलं दुःख सांगून, रडून सहानुभूती पण मिळवू नका. लोकं तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा किंवा तुमची समस्या सोडवण्यापेक्षा तुम्ही कुठे चुकलात, कशा चुकलात, तुमचंच कसं सगळं वागणं उलट आहे, तुम्हाला नांदता येत नाही हे शिकवतील. तुमचीच बदनामी करण्यासाठी, तुम्हाला दोष देण्यासाठी तुमचेच कुटुंब आघाडीवर असेल. आपल्या भावनांचे प्रदर्शन करून प्रेमाची, आपलेपणाची भीक कोणाकडे मागत बसू नका.
जोपर्यंत नवऱ्याचे अनैतिक संबंध घराबाहेर आहेत तोपर्यंत तुम्हाला त्याला सावरण्याचा, संसार वाचवण्याचा, नवऱ्याला सुधारण्याचा, स्वतःला बदलण्याचा जितका प्रयत्न करता येईल तितका नक्की करा. समुपदेशन दरम्यान काही प्रकरणं अशीही येतात ज्या ठिकाणी नवऱ्याने बाहेर बाई ठेवली किंवा घरात आणून बाई ठेवली आहे. यावेळी मात्र महिलांचा संयम पूर्ण गेलेला असतो आणि आता कठोर कायदेशीर काय प्रक्रिया करायची? इतकं डोक्यावरून पाणी गेल्यावर कोणतीही महिला ही परिस्थिती स्वीकारायला तयार नसते. कायदेशीर, पोलीस तक्रार याबद्दल मार्गदर्शन त्यांना हवं असतं. त्यामुळे विवाहित महिलांबाबतचे कायदे याबद्दल आपण वेगळ्या लेखात सविस्तर माहिती घेऊच. तरी आपल्या पतीची फक्त तात्पुरती सर्वसाधारण गुंतवणूक कुठे झाली असेल तर वेळ सर्व गोष्टी वर औषध असतं. त्यामुळे संयम ठेवा. लग्न केलेला नवरा आणि त्याच्यापासून असलेली मुलं हे नातं सर्वश्रेष्ठ आहे. नवऱ्याच्या आयुष्यात आलेल्या, असलेल्या कोणत्याही फालतू व्यक्तीमुळे हे नातं तोडू नका. तुमच्या नात्याला कायद्याचा, समाजाचा, धर्माचा आधार आहे. त्यामुळे आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका.
अनेक महिलांना हा त्रास होतोय की बाहेरील बाई नवऱ्याच्या आयुष्यात आल्यामुळे तो तिच्यावर खूप खर्च करतो, घरातील जबाबदाऱ्या टाळतोय, मुलांच्या आर्थिक कर्तव्यात कमी पडतोय. या ठिकाणी आपण इतकंच म्हणू शकतो की त्याने कमवलेला पैसा कुठे खर्च करायचा, हा त्याचा चॉईस आहे. त्याला तात्पुरती मजा, मस्ती करणारी, तेवढ्यापुरती साथ देणारी बाई जर खर्च करण्यासाठी प्राधान्य वाटतं असेल तर त्याची इच्छा असं मानून स्वतःच्या पायावर उभ्या राहा. स्वतःच्या कला, गुण, शिक्षण, बुद्धिमत्ता यांचा वापर करा. त्यातून पैसे कसे कमवता येतील यावर विचार करा. मुलांना सत्य परिस्थितीची जाणीव करून द्या. ते जर कमवण्याइतपत मोठे असतील तर त्यांची मदत घ्या, पण खचून जाऊ नका. जर मुलं लहान असतील तर तुम्हाला आर्थिक बाबतीत झेपेल, परवडेल असेच अभ्यासक्रम त्यांच्यासाठी निवडा. कारण खूपदा समुपदेशनाला आलेल्या केसेसमध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च नवरा बाहेरील बाईवर होणाऱ्या खर्चामुळे करत नाही ही तक्रार असते. पती-पत्नी एकत्र राहत असो वा विभक्त विवाहबाह्य संबंध मग ते आईचे असोत की वडिलांचे हाल मात्र मुलांचे, त्यांच्या शिक्षणाचे होतात हेच पाहायला मिळते.
नवऱ्याला त्याच्या आयुष्यात जे हवं ते तो करतोय त्याचं आयुष्य तो जगतोय मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला, तुमच्या परिस्थितीला काय निर्णय घेणं योग्य आहे. सामाजिक बदनामी त्याची होईल, तिची होईल, लोकं त्यांना नावं ठेवतील, जे काही नुकसान, अपप्रचार, अपमान व्हायचा तो त्यांचा होईल त्यामुळे तुम्ही डाळमळीत होऊ नका. समाजात तुमचा मानसन्मान कमी होणार नाहीये त्यामुळे खचून जाऊ नका. अनेक महिलांना अशावेळी घटस्फोट घेऊन द्वितीय विवाह करायचा असतो, काहींना फक्त घटस्फोट घेऊन मुलांसोबत एकटं राहायचं असतं, काहींना त्याच घरात राहून नवऱ्याची बाहेरची बाई आणि तो यांना सरळ करायचे असते. काही महिला शांतपणे फक्त सहन करत राहतात. काही महिला स्वतः घर सोडतात, काही नवऱ्याला घराबाहेर काढतात, अशी अनेक उदाहरणं वेगवेगळ्या केसेसमध्ये पाहायला मिळतात. महिला नवऱ्यावर आर्थिक बाबतीत कितपत अवलंबून आहे, तिला सासरचे, माहेरचे पाठबळ, आधार किती आहे यावर प्रत्येकीचे निर्णय अवलंबून असतात.
आपण निर्णय कोणताही घेतला तरी तो आपल्या स्वतःच्या, मुलांच्या हिताचा घ्यावा. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात कोणी एक व्यक्ती आली म्हणून आपलं, मुलांचं आयुष्य खराब करून घेऊ नये. पतीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्यामुळे अनेक महिलांना आत्महत्याचे विचार येतात, अनेक महिला मुलांना घेऊन आत्महत्या करेल असं बोलतात. आपला जीव, आपलं जीवन इतकं स्वस्त नाही की अशा फालतू कारणास्तव ते संपवावे. त्यामुळे असा विचार पण मनात आणू नका. नवऱ्याने दुसऱ्या कोणासोबत संबंध ठेवले याचा अर्थ तुम्ही कमी आहात, तुमच्यात कमतरता आहेत, तुम्हाला संसार करता आला नाही, नवरा सांभाळता आला नाही असे काहीही नाही. त्याला त्याच्या इच्छेनुसार जे वाटले, जे आवडले, जे पटले, त्याला त्याच आयुष्य कोणासोबत घालवायचं, कितीवेळ कोणाला द्यायचा हे सर्वस्वी त्याच्यावर सोडून द्या. तुम्ही त्रागा करून, भांडण करून, वाद घालून तुमच्यातील संबंध अधिक खराब होतील पण नवरा बदलणार नाही. त्यामुळे स्वतःची मनःशांती, आरोग्य, मानसिक, भावनिक विकास, व्यक्तिमत्त्व विकास, स्वतःची स्वप्न, स्वतःच आयुष्य यासाठी जगा. आपल्यावर आलेल्या परिस्थितीसाठी सासरच्यांना, माहेरच्यांना, इतरांना कोणालाही दोष देऊन वाद घालत
बसू नका.
ज्या घरात पती पत्नीला विचारत नसतो तिथे कोणीच तिची किंमत करत नसते. त्यामुळे उगाच याला त्याला आपलं दुःख सांगून, रडून सहानुभूती पण मिळवू नका. लोकं तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा किंवा तुमची समस्या सोडवण्या पेक्षा तुम्ही कुठे चुकल्या, कशा चुकल्या, तुमच्यात किती समस्या आहेत, तुमचंच कसं सगळं वागणं उलट आहे, तुम्हाला नांदता येत नाही, नीट वागता येत नाही, तुमचे विचार नकारात्मक आहेत हे शिकवतील. तुमचीच बदनामी करण्यासाठी, तुम्हाला दोष देण्यासाठी तुमचेच कुटुंब, नातेवाईक, समाज आघाडीवर असेल. आपल्या भावनांचे प्रदर्शन करून प्रेमाची, आपलेपणाची भीक कोणाकडे मागत बसू नका. इथे प्रत्येकाला स्वतःचं पडलेलं असत, स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी जो तो व्यस्त असतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण त्याचं काय भलं होणार आहे, यातून त्याचा काय हेतू साध्य होईल हे बघत असतो. त्यामुळे कोणाच्या मदतीची, तुम्हाला समजावून घेण्याची अपेक्षा बाळगून स्वतःला अजून दुःखी करून घेऊ नका. हार न मानता स्वतःची लढाई स्वतः लढा.