नवी दिल्ली : खो खो विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा शुभारंभ भारत – पाकिस्तान संघाच्या सामन्याने होणार होती. पण भारताचा व्हिसा पाकिस्तानला मिळालेला नाही. यामुळे पाकिस्तानच्या पुरुष आणि महिला संघाची खो खो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
विश्वचषकासाठी विशिष्ट मुदतीत योग्य कादगपत्रांसह व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक असते. पण या नियमाचे पाकिस्तानकडून पालन झाले नसल्याची शक्यता आयोजकांकडून व्यक्त होत आहे. पाकिस्तान खेळणार नसल्याचे लक्षात येताच आयोजकांनी गटांची नव्याने रचना केली आहे. आता भारत – नेपाळ या सामन्याने खो खो विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे. याआधी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यंदाच्या खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष गटात २० आणि महिला गटात १९ संघ आहेत.
Buldhana Hair Loss : बापरे! विचित्रच घडतंय, ३ दिवसांतच पडतंय टक्कल!
खो खो विश्वचषक २०२५ – स्पर्धेसाठी संघांची गटवारी
पुरुष
अ गट – भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट – दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
क गट – बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट – इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया
महिला
अ गट – भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स
क गट – नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया
पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा कधी आणि कुठे होणार ?
पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून भारतात सुरू होत आहे. अंतिम सामने १९ जानेवारी रोजी आहेत. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. पुरुषांची खो खो विश्वचषक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला निळ्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. तर महिलांची खो खो विश्वचषक स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या महिला संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शन येथे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.