Saturday, May 10, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Alibaug Sea : अलिबागच्या समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली; १५ खलाशांना वाचवण्यात यश

Alibaug Sea : अलिबागच्या समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली; १५ खलाशांना वाचवण्यात यश

अलिबाग :  येथील समुद्रात आक्षी साखर भागात 'हिरकन्या' ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी बचावले असले तरी बोट बुडाल्याने तब्बल २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा बोट मालक जगदीश बामजी यांनी केला आहे. दुसऱ्या मच्छीमारी बाेटीतील खलाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून मदत केल्याने १५ खलाशांचा जीव वाचला आहे.




जगदीश बामजी यांच्‍या मालकीची हिरकन्या बोट १५ खलाशांसह मासेमारीसाठी निघाली होती. हिरकन्या'मधील खलाशी हे मासेमारी करताना थकून बोटीतच झोपले होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकटली. त्यानंतर काही काळाने बोटीत पाणी भरू लागले. कुलाबा किल्‍ल्‍याच्‍या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली. ही घटना समोरून येणाऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच, त्याने आरडाओरडा करून हिरकन्यामधील खलाशांना जागे केले. त्यानंतर त्यांना बोटीत घेतले. मात्र, हिरकन्या बोट बुडाली.

मिळालेल्या माहितीनुसार हिरकन्या बोट बुडाल्याचे कळताच बोट मालक जगदीश बामजी दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचले. मत्‍स्‍यव्‍यवसाय विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी अलिबाग किनारी पोहोचले असून ते बोटीला झालेल्‍या अपघाताची माहिती घेत आहेत. अथक परिश्रमानंतर स्‍थानिकांच्‍या मदतीने अपघातग्रस्‍त बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.

Comments
Add Comment