Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीइस्त्रोने पुढे ढकलली स्पाडेक्स 'डॉकिंग' चाचणी 

इस्त्रोने पुढे ढकलली स्पाडेक्स ‘डॉकिंग’ चाचणी 

बेंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) नुकतेच श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्पाडेक्स मिशन (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) लाँच केले. दरम्यान घेण्यात येणारी डॉकिंग चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी स्पाडेक्स डॉकिंग मंगळवारी ७ जानेवारीला होणार होते, मात्र आता हीच चाचणी गुरूवारी ९ जानेवारीला होणार असल्याची अपडेट इस्रोने ट्विटरवर (एक्स) सांगितले.

इस्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी, एसडीएक्स ०१ (चेझर) आणि एसडीएक्स ०२ (लक्ष्य) हे दोन लहान उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. या मिशनमध्ये पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात दोन छोट्या यानांचे डॉकिंग करणे म्हणजेच जोडणे आणि अनडॉक करणे (वेगळे करणे) ही प्रक्रिया पूर्ण करणे हा इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत एकाच रॉकेटमध्ये उपग्रहाचे २ भाग सोडण्यात आले आहेत. पण अवकाशात ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांना एकमेकांच्या जवळ आणून जोडले जाणार आहे. चेसर आणि टार्गेट अशी या दोन उपग्रहांची नावे आहेत. या मिशनमध्ये, चेसर लक्ष्याचा पाठलाग करेल आणि त्याच्याशी डॉक करेल.

टार्गेट आणि चेसरचा वेग ताशी २८ हजार ८०० किलोमीटरपर्यंत जाणार आहे. सुमारे २० किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरून चेसर स्पेसक्राफ्ट टार्गेट स्पेसक्राप्टच्या दिशेने जाईल. त्यानंतर हे अंतर कमी होऊन ५ किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर दीड किलोमीटर आणि पुढे जाऊन ५०० मीटर होईल. जेव्हा चेसर आणि टार्गेटच्या दरम्यानचे अंतर तीन मीटरवर येईल तेव्हा डॉकिंग म्हणजे दोन्ही स्पेसक्राफ्टच्या जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. चेसर आणि टार्गेट जोडल्या गेल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर केले जाईल. ही सर्व प्रक्रिया पृथ्वीवरून नियंत्रित केली जाणार आहे.

अंतराळातील दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान आगामी काळात भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास सहाय्यभूत ठरणारे आहे. अशा प्रकारच्या स्वदेशी डॉकिंग प्रणालीद्वारे स्पेस डॉकिंग करणार्‍या देशांच्या निवडक गटामध्ये सामील होणारा भारत हा चौथा देश बनला आहे. सध्या या गटात अमेरिका, चीन आणि रशिया यांचा समावेश आहे. अमेरिकेने १६ मार्च १९६६ रोजी प्रथम अंतराळात डॉकिंग केले होते. तर सोव्हिएत युनियनने ३० ऑक्टोबर १९६७ रोजी पहिल्यांदा २ स्पेसक्राफ्ट डॉकिंग केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -