मुंबई : एका नंबर प्लेटच्या दोन कार मुंबईत फिरत होत्या. यातील एका कारचा नंबर अधिकृत होता. तर दुसऱ्या कारच्या नंबर प्लेटमध्ये बदल करण्यात आला होता. हा प्रकार गेट वे ऑफ इंडिया जवळ असलेल्या ताज हॉटेलनजीक उघडकीस आला. या प्रकरणी अधिकृत नंबर प्लेटधारक कार मालकाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्यावर गुन्हा नोंदवून कारवाई करा, अशी मागणी अधिकृत नंबर प्लेटधारकाने केली आहे.
अधिकृत नंबर प्लेटधारक शागीर अली यांची कार ज्या मार्गावर गेलीच नव्हती त्या मार्गावरून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ई – चालान येत होते. हा काय प्रकार आहे हेच शागीर अलींना समजत नव्हते. अखेर त्यांनी व्हॉट्सअॅपच्या अनेक ग्रुपवर स्वतःच्या कारचा नंबर जाहीर केला आणि समान नंबराची दुसरी कार आढळल्यास फोटो काढून पाठवा असे आवाहन केले होते. हे आवाहन वाचलेल्या शागीर अलींच्या ओळखीतील एका व्यक्तीने ताज हॉटेलनजीक एक कार बघितली. या कारचा नंबर आणि शागीर अलींच्या कारचा नंबर समान होता. हा प्रकार लक्षात येताच शागीर अलींच्या मित्राने ती कार अडवण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी कार अडवत आहे, हे लक्षात येताच बनावट नंबर प्लेट वापरणारा कार मालक वाहन घेऊन पळण्याचा प्रयत्न करू लागला. यामुळे ताज हॉटेल बाहेरच्या रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर शागीर अलींच्या मित्राने पोलिसांच्या आणि निवडक स्थानिकांच्या मदतीने कार थांबवली. बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. घडलेला प्रकार शागीर अलींना कळवला. नंतर शागीर अलींनी बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्याच्या विरोधात पोलिसांकडे रितसर तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली.
पोलीस चौकशीतून बनावट नंबर प्लेट प्रकरणाचा अखेर खुलासा झाला. कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीने रस्त्यात कोणी अडवू नये यासाठी कारच्या नंबर प्लेटमध्ये बदल केला होता. त्याच्या कारच्या नंबरमध्ये शेवटी 3 हा आकडा होता जो त्याने रंगवून, बेकायदेशीररित्या 8 केला होता. यामुळे समान नंबराच्या दोन नंबर प्लेट झाल्या होत्या. या प्रकरणात कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.