नवी दिल्ली: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो(justin trudeau) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आपले सरकार आणि वैयक्तिक टीका यांच्या दरम्यान त्यांनी हा निर्णय घेतला आहे. देशाला संबोधित करताना त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. जोपर्यंत नव्या नेत्याची निवड केली जात नाही तोपर्यंत ते कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम करतील.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रुडो यांच्यावर दबाव वाढला होता. ट्रम्प यांच्याकडून सातत्याने ट्रुडो यांना टार्गेट केलं जात होतं. तर इलॉन मस्क यांनीही ट्रम्प यांच्या विजयानंतर म्हटलं होतं की, ट्रुडो यांचे काउंटडाऊन सुरू झालंय.
जस्टिन ट्रुडो यांनी २०१३ मध्ये लिबरल नेते म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी पक्ष अडचणीत होता आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पहिल्यांदाच तिसऱ्या स्थानावर घसरला होता.दरम्यान, कॅनडाच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षाचे सध्या १५३ खासदार आहेत. काही महिन्यांपूर्वी ट्रुडो सरकारचा मित्रपक्ष असलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. एनडीपी हा खलिस्तान समर्थक कॅनडाचे शीख खासदार जगमीत सिंग यांचा पक्ष आहे. त्यामुळे ट्रुडो सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी झालेल्या बहुमत चाचणीत ट्रूडोंच्या पक्षाला दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे ट्रूडो यांचे सरकार वाचले होते.