नाशिक: नाशिकमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे जाऊद्दीन डेपो परिसरात खेळत असताना उघड्या डीपीला हात लागल्याने विजेच्या तीव्र धक्क्यामुळे पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आफ्फान नईम खान असं या दुर्देवी बालकाचं नाव आहे.
सोमवारी दुपारी चार वाजता घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत असून शहरातील उघड्या डीपी जीवघेण्या ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. आफ्फान नईम खान वय (०५) रा. आनंद कॉम्प्लेक्स मागे, गुलजारवाडी, सुभाष रोड, नाशिकरोड याची आई जाऊद्दीन डेपो येथील वजन काट्याच्या मागे असलेल्या गोडाऊनमध्ये बारदान गोणी शिवण्याचे काम करते.
नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या असताना आफ्फानही बरोबर होता. आई कामात गुंतलेली असतानाच आफ्फान हा खेळायला गेला. खेळता खेळता त्याचा हात उघड्या डीपीला लागला.
डीपीतील वायरींमुळे त्याला वीजेचा तीव्र धक्का बसला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी त्याला बाजूला करून जवळच्या बिटको रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आफ्फानच्या आईची स्थिती न बघण्यासारखी झाली आहे. आफ्फानचे वडील नईम खान हे पेंटींग काम करतात.
शहरातील काही भागात उघड्या डीपी असून त्या धोकादायक स्थितीत आहे.अशाच एका डीपीमुळे पाच वर्षीय बालकास हकनाक प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे वीज मंडळाने उघड्या डीपींबाबत तातडीने उपाय योजना करावी आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.