मुंबई : बॉलीवूड असो किंवा हॉलिवूड प्रत्येक इंडस्ट्री मधील अभिनेत्री किंवा अभिनेत्याचा अभिनयासोबत काही न काही जोडधंदा सुरु आहे. मराठी अभिनेत्रीही यात मागे नाहीतच. मात्र बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री सुद्धा स्वतःचा व्यवसाय करत आहे. चेहऱ्याच्या प्रॉडक्ट पासून ते कपड्याच्या ब्रँडचा सुद्धा तिचा व्यवसाय आहे.
बॉलीवूडची मस्तानी ओळख असलेली दीपिका पदुकोण आज ३९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दीपिकाने नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. असे असले तरी तिचा बॉलीवूड मधला प्रवास संपलेला नाही. दीपिकाने प्रेगनंट असताना देखील सिंघम चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. आई होण्यापूर्वीच दीपिकाने फक्त अभिनयावर भर न देता व्यावसायिक जीवनातही उत्तम प्रगती केली आहे.
दीपिका पादुकोण २०१८ पासून केए प्रॉडक्शन नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवते. या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपट बनला होता. प्रॉडक्शन हाऊससोबत, दीपिकाचा स्वतःचा स्किन केअर ब्रँड 82°E देखील आहे. तिने २०२२ मध्ये तो लाँच केला होता जो फेशियल मास्क, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, लिप बाम आणि क्लिन्झर सारखी उत्पादने तयार करतो. याशिवाय दीपिकाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे.
दीपिका ओम शांती ओम या जबरदस्त चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. तिच्या या अभिनयाच्या कारकिर्दीला १८ वर्षे झाली. अभिनेत्रीने स्वबळावर करोडोंचे साम्राज्य उभे केले आहे. तरी आता दीपिकाच्या नव्या चित्रपटाकडे चाहत्यांचे डोळे लागले आहे.