मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
नववर्षाच्या उगवणाऱ्या सूर्य देवाचे स्वागत सर्वांनी उत्साहात साजरे केले. नववर्षाचे नवरंग, नव उल्हास, उत्साह घेऊन जानेवारी महिना अाला. नववर्षाच्या इंग्रजी वर्ष २०२५ हे साल आपल्या जीवनात सुख-शांती घेऊन येवो. हे शुभचिंतन सामाजिक, आर्थिक, मानसिक सर्व स्तरासाठी हे शुभचिंतन. मागील वर्ष भूतकाळात दडलं जातं. मन नवनव्या आशा-अपेक्षांनी फुलत जातं. पुन्हा एकदा तो दिवस आनंद, सुख-शांती, समृद्धी स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करणारा असतो. मागच्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचा लेखाजोखा सोबत साठवून मन धावतं, उंदडतं तरीही झेप नव्या क्षणांची, नव्या आव्हानांची, नव्या सणांची, नव्या ऋतूंची घेण्यासाठी. प्रत्येक नव्या दिसागणिक क्षणांची नांदीच असते. वर्षांपासून वर्ष पुढे सरकण्याची जुने-जुने अनुभव, प्रसंग, अंदाज आयुष्य गाठीशी बांधून अलविदा करत असतो आपण जुन्या क्षणांना. नव्या वर्षाचं स्वागत करत गिरवत असतो नवे धडे पुन्हा पुन्हा नव्याने.
‘दिस येतील दिस जातील, भोग सरंल सुख येईल’ असं म्हणत हे सुख कुठे तरी दडलेले आहे आणि मला ते नक्कीच मिळणार आहे. या आशेवर जगत असतो तो माणूस. आशावादी, आनंदी, सुखदुःखाला सोबत घेऊन चालत असतो. एक बहुरूपी, जादूगार, किमयागार किंवा जीवन नावाच्या रंगभूमीवरचा एक कलावंत जणू. आपली भूमिका ठामपणे मांडणारा. ती साजेशी करण्याचा प्रयत्न करणारा. एक नट! प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यामागे एक मुखवटा घेऊन जगत असतो. कथा, व्यथा वेगळीच असते प्रत्येकाची. जगण्यासाठीची धडपड असते. आपल्या माणसांसाठी ओढाताण असते. रोजचा वेळेवर उगवणारा सूर्य त्याचा सूर्योदय वेगळाच काही सांगून जातो. वेळेवर येतो, तो वेळेवर जातो. वेळ हातातून निसटून जाते आणि आयुष्याची गतही, गतीही तशी कॅलेंडरची पाने पलटावी आपण पलटत जातो. गतकाळाचे ओझे मनात साठवत साठवत आयुष्याच्या नोंदी करत भल्याबुऱ्याचा हिशोब लावत श्वासागणिक, क्षणागणिक जगत जातो, जागत जातो, पुढील आव्हाने पेलत जातो. तोच एक क्षण असतो जादुई पुन्हा पुन्हा जगण्यासारखा… वर्तमान नको, नको भूतकाळ, भविष्यकाळ असावा फक्त आज आजचा क्षण भरभरून जगण्यासारखा, आनंदानं जगण्यासारखा, इतरांसाठी स्वतःसाठी काही करण्यासारखा. आपल्या आयुष्याची एक डायरी असते. त्यामध्ये खूप काही बारकावे टिपावे लागतात. नोंदी असतात, प्रत्येक वेळी चढ-उतार असतात.
यशापयश असतं आणि हे आपण त्यामध्ये लिहीत जातो. लिहावेच लागतात. मनाच्या डायरीत त्या अनुभवांचे कुंदन असतं. केव्हा केव्हा आलेले अनुभव खूप काही धडे शिकवून जातात आणि ती अनुभवांचे शिदोरी पुढील आयुष्य जगण्यासाठी अत्यंत मोलाची असते. काही महत्त्वाचे मार्ग त्यातून सापडतात. समस्यांची उकल होते. निरपेक्ष, निष्पाप, निर्मोही जगण्यासाठी पुन्हा एकदा ती पडताळून पाहावी. त्याच्या साहाय्याने पुढील आयुष्याचे टप्पे गाठत जावं असे एका वर्षात खूप काही कमावलेलं असतं, गमावलेलं असतं. वाहून जाते ती गंगा असते, हाती उरते ते तीर्थ असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक क्षेत्रांत विविध घडामोडी काळाबरोबर घडून जातात. त्यात बदलही होतात, तो आवश्यक आहे. बदल सृष्टीचा नियम आहे. ते बदल वास्तव म्हणून स्वीकारावेत. निसर्गात जसे ऋतूंचे बदल असतात तसे माणसाच्या आयुष्यात सुद्धा निर्णय बदलतात. आपल्या वाणी आणि बुद्धीने श्रेष्ठ ठरलेला अमृताचा पुत्र म्हणजे माणूस आणि या माणसाच्या हातून पर्यावरण, निसर्ग, प्रदूषणमुक्त, अन्यायमुक्त, प्रबोधनात्मक, परिवर्तनात्मक करण्यासाठी निश्चित कार्य घडो. प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदात जावो. यशप्राप्तीचा नंदादीप तेवत राहो. प्रत्येक क्षणोक्षणी सृजन, सर्जनशील नावीन्य उपक्रम घडो २०२४ या वर्षाला निरोप देताना अनेक घडामोडी फारच दुःखद अनुभव देऊन गेल्या. व्यक्तिपरत्वे सुखदुःखाची संज्ञा वेगळी असली तरी, एकूणच हे वर्ष तितकेसे चांगले कोणालाच गेले, काहींना ते गेले नाही. म्हणूनच हे नववर्ष सुख-शांती, समृद्धी, यश, प्रगतीच्या वाटांनी उजळून जावो.