सतीश पाटणकर
केपादेवी मंदिर हे गाबीत, आरमारी समाजाचे एक श्रद्धास्थान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन आणि जागृत देवस्थानांपैकी वेंगुर्ला तालुक्यातील मूठवाडी, उभादांडा येथील श्रीकेपादेवी हे एक आहे. श्रीकेपादेवी ही गिरप बांधवांची कुलदेवता असली, तरी तालुक्यातील सर्व रयतेची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या इतिहासाविषयी कुठेही लेखी माहिती नाही; परंतु काही जाणकारांकडून असे कळते की, १५ व्या शतकात गोव्यातील पोर्तुगीज अत्याचाराच्या काळात देवीची मूर्ती गोव्यातून आणून मूठवाडीमध्ये तिची स्थापना केली असावी. काही जणांच्या मतेही मूर्ती मूठ येथेच केगदाच्या (केवडा) वनात सापडली; म्हणून तिला केगदी देवी हे नाव पडले आणि कालांतराने केगदीचे केपादेवी झाले, तसेच सर्व प्राणीमात्रांवर कृपा करणारी म्हणून कृपादेवीचे नाव केपादेवी झाले असावे, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला.
श्रीदेवीची अप्रतिम मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. या मूर्तीला ४ हात असून एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात त्रिशूळ आणि चौथ्या हातात महिषासुराचे मुंडके आहे. रेड्याचे शिर कापून महिषासुराला रेड्याच्या पोटातून बाहेर काढून त्याचा शिरच्छेद केलेला आहे. रेड्याचे कापलेले शिर तिच्या बाजूला पडलेले आहे. महिषासुराचा वध करूनही देेवीचा चेहरा सौम्य आणि शांत आहे. देवीच्या मूर्तीला शेकडो वर्षे स्नान घालून पूजाअर्चा केली जाते, तरीही मूर्तीची कोणत्याही प्रकारे झीज झालेली नाही. मूर्तीची स्थापना कधी केली आहे, हे कुणालाही ठाऊक नाही. कदाचित ही मूर्ती परशुरामकालीन असून ती मसुरीवरून आणली असावी, असा अंदाज आहे. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-मूठ येथील ३५० वर्षांपूर्वीचे श्रीकेपादेवी हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. श्रीकेपादेवीचे स्वरूप महिषासूरमर्दिनी असे आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज असून एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात त्रिशुळ ही शस्त्रे आणि एका हातात महिषासुराचे मुंडके आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूस रेड्याचे शीर पडलेले दिसते तर उजव्या बाजूस देवीची गणिका हातात मशाल घेऊन उभी असलेली दिसते. महिषासूरनामक राक्षसाचा वध पार्वती मातेने केला. महिषासुराशी झालेल्या देवीच्या घनघोर युद्धाच्या वेळी महिषासूर राक्षस घाबरून एका रेड्याच्या पोटात लपला त्यावेळी देवीने महिषासूर रेड्याच्या गुद्वारावाटे पळून जाऊ नये म्हणून त्यावर पाय ठेवला व रेड्याचा शिरच्छेद केला आणि महिषासुराला बाहेर काढून त्याचा वध केला.
महिषासुराचं मर्दन करणारी म्हणून श्रीदेवीपार्वतीच्या या रूपाला “महिषासुरमर्दिनी” बोलले जाते. देवीचं स्वरूप युद्धाच्या वेळचं असूनसुद्धा श्रीमुखावर शांत भाव आहेत. श्रीकेपादेवी गिरप घराण्याची कुलदैवत असून सात वाड्यांची मालकीण आहे. वेंगुर्ले बारा-पाच रहाटीत श्रीकेपादेवी देवस्थान हे अत्यंत महत्त्वपूर्ण देवस्थान आहे. रहाटीत श्रीदेवी सातेरी, श्रीदेवी भगवती, श्रीदेवी भराडी, श्रीदेवी येरागीण, श्रीदेवी गुणादेवी, श्रीदेवी रेडीमाऊली व श्रीदेवी केपादेवी या सात बहिणी व श्री रवळनाथ हा या सात देवींचा भाऊ मानला गेला आहे. श्रीकेपादेवी पंचायतनामध्ये श्रीकरंडेखोल देवस्थान, श्रीदाडोबा देवस्थान, श्रीगिरोबा देवस्थान, श्रीनागरधन्नी देवस्थान, श्रीवाटोबा देवस्थान, श्रीहेळेकर देवस्थान या देवस्थानांचा समावेश होतो. मंदिरातील सर्व धार्मिक विधी करण्याची जबाबदारी गिरप घराण्याकडे असून त्यामध्ये चार बक्कलदार आहेत. त्याव्यतिरिक्त या मंदिराचे कांबळी, करंगुटकर, चमणकर, बेहरे, तुळसकर, कुर्ले, डिचोलकर सात वाडेकरी आहेत. हे सर्व वाडेकरी उपस्थित झाल्यावरच प्रत्येक उत्सवास सुरुवात होते. हा लोकशाही संकेत शेकडो वर्षे चालत
आलेला आहे.
नवरात्रोत्सव, दसरा, तुलसी विवाह, कार्तिकपाडवा, जत्रोत्सव, समराधना, शिमगा, चैत्रपाडवा असे उत्सव प्रतिवर्षी रयतेच्या उपस्थितीत केले जातात. आई नेहमी आबोलीचे वळेसार, वेणी व इतर नानाविध फुलांनी सजलेली दिसते म्हणूनच की काय एखाद्या स्त्रीने खूप फुले माळली असतील तर तिला “काय गे केपादेई बनान इलय” असं नकळत विचारलं जात. केपादेवी मातेवर मच्छीमार समाजाची अढळ श्रद्धा आहे. श्रीकेपादेवीने आपला एक गण रयतेच्या रक्षणासाठी समुद्रकिनारी ठेवला असून त्या गणाला श्रीमुठेश्वर संबोधले जाते. आजतागायत एकाही व्यक्तीचा मूठ किनारी समुद्रात बुडून मृत्र ओढवला नाही हा चमत्कारच आहे. श्रीकेपादेवीला खोटं-नाटं, पंचाक्षरी, गारूडी विद्या तसेच कोंबडा-बकरा यांचा बळी पूर्णपणे निषिद्ध आहे. या देवस्थानाला पूर्णपणे “गोडं देवस्थान’’ संबोधलं जातं. श्रीकेपादेवी जेवढी भक्तवत्सल आहे तेवढीच न्यायनिष्ठूर आहे. अनितीने वागणारे येथे नेहमी शिक्षेचे धनी बनतात. म्हणूनच मातेला ‘‘शेळ कुणाची आग” संबोधले जाते. शेळकुणाची (गोवरी) आग जशी धुमसून धुमसून पेट घेते त्याचप्रमाणे अनितीने वागणारा येथे योग्यवेळी वाईट कर्माची फळं भोगतो. देवस्थानचे व्यवस्थापन विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ, तसेच देवस्थान उपसमिती यांच्यामार्फत केले जाते. नवरात्रोत्सव, दसरा, तुळशी विवाह, कार्तिकपाडवा, जत्रोत्सव आणि समराधना, शिमगा, चैत्रपाडवा (गुढीपाडवा) हे महत्त्वाचे उत्सव या मंदिरात साजरे केले जातात. देवीच्या गाभाऱ्यात देेवीच्या उजव्या बाजूला ४ मूर्ती आणि डाव्या बाजूला ४ मूर्ती आहेत. उजव्या बाजूला पूर्वस, गिरपवस आणि ब्राह्मणाच्या २ मूर्ती, तर डाव्या बाजूस जळबांदेश्वर, हेळेकर आणि इतर २ देवांच्या मूर्ती आहेत. कुळाचे देऊळ (कुळकार), पासलयदेव, आगयोवेताळ (पययाचापूर्वस), कारवार देवी यांची देखभाल श्री स्थानिक गिरप मंडळी करतात.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)