स्नेहधारा – पूनम राणे
आदर्श समाजाच्या निर्मितीमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, किंबहुना त्यांचे नाव उच्चारता क्षणीच मनात चैतन्य जागृत होऊन आदराने त्यांच्यासमोर नतमस्तक होता येतं, अशा निर्मळ, निरागस वृत्ती, असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आजची ही कथा.
दारावरची बेल वाजली. पत्नीने दरवाजा उघडला. पत्नीने हसून स्वागत केलं. हा अधिकच बावरला. दबकचत त्याने आत प्रवेश केला. अगं! हे काय, ‘‘मुलं दिसत नाहीत.”
“तुम्ही हातपाय धुऊन घ्या, चहा आणते.” पत्नी म्हणाली. हा अधिकच गोंधळला. बावरला.
इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली. समोर एक गृहस्थ दोन मुलांना घेऊन उभे होते.
त्याचे असे झाले होते. शहरात ग्रंथ प्रदर्शन भरले होते. ग्रंथ प्रदर्शन पाहण्याचा शेवटचा दिवस होता. पत्नीने पती राजांना बजावून सांगितले होते की, आज ग्रंथ प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. मुलांना ग्रंथ प्रदर्शन पाहायला घेऊन जायचे आहे, तेव्हा ऑफिसमधून लवकर या. या गृहस्थाने ऑफिसमध्ये गेल्यानंतर तशी कल्पना आपल्या साहेबांना दिली.
साहेब, “मला संध्याकाळी पाचच्या आत मुलांना घेऊन ग्रंथ प्रदर्शन पाहायला जायचे आहे, आज शेवटचा दिवस आहे. ‘‘साहेब ओके म्हणाले.”
संध्याकाळी तीन वाजण्याच्या सुमारास. शास्त्रज्ञांची तुकडी एक प्रयोग करण्यात व्यस्त होती. साहेबांनी खिडकीतून पाहिलं, जर यांना मुलांना घेऊन जाण्यासाठी सोडलं, तर प्रयोग अर्धवट राहील, म्हणून थेट साहेब त्याच्या घरी गेले व मुलांना घेऊन ग्रंथ प्रदर्शन पाहून आले देखील…
अशा प्रकारचे साहेब, प्रसंगी खुर्ची बाजूला ठेऊन, क्वचित प्रसंगी माणुसकी जपणारे सर्वांना लाभले, तर भारतमातेला धन्य झाल्यासारखे वाटेल आणि भारत महासत्ताक होण्यास वेळ लागणार नाही.
मुलांनो, स्वतःची २५००० ग्रंथसंपदा असणारे, स्वतःच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे, मुलांवर प्रचंड प्रेम करणारे, आपणा सर्वांचे आवडते शास्त्रज्ञ, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.
त्यांचीच ही वरील कथा.
“रोज एक तास तुम्ही काहीही वाचा, ज्ञानाचे एक केंद्र होऊन जाल, असा त्यांचा संदेश आपणासाठीच आहे. मुलांनो, ग्रंथ वाचन करा.” या वाक्याची आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.”
लहानपणीचा त्यांचा एक प्रसंग आठवतो, वर्तमान पत्राचे गट्टे दुकानात टाकून घरी आले. खूप थकले होते. आई भाकऱ्या भाजत होती. गरम गरम भाकरी त्यांच्या ताटात वाढत होती. भूक जोराची लागली होती. आई वाढत होती. ते खात होते. भावाने पाहिलं, हाताने खुणा करून डॉ. कलामांना त्यांने बाहेर बोलावलं. ‘‘अरे आधाशासारखा खातोस काय! आईसाठी डब्यात पीठही शिल्लक नाही. ती उपाशीच राहील.” हे ऐकून त्यांना फार वाईट वाटले. आईला त्यांनी घट्ट मिठी मारून माफी मागितली. आईने त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाली, अरे हरकत नाही. माणसं प्रसंगातूनच घडत असतात. यापुढे प्रथम दुसऱ्याचा विचार कर. चेहरा नेहमी आनंदी ठेव. मन आनंदी ठेव. कितीही कठीण प्रसंग आला तरी मनाचा तोल जाऊ देऊ नकोस आणि सतत कार्यमग्न रहा.
ते अत्यंत हुशार वर्गात सर्वप्रथम येत होते. इंजिनिअर कॉलेजच्या अॅडमिशनच्या वेळेला त्यांनी अर्ज भरला. अॅडमिशन ही मिळाले; परंतु ते घेण्यासाठी एक हजार रुपये फी आवश्यक होती. वडिलांकडे इतके पैसे नव्हतेच. हे जेव्हा त्यांच्या लग्न झालेल्या बहिणीला समजले, तेव्हा तिने आपले स्वतःचे दागिने गहाण ठेवून सरांच्या हातावर अॅडमिशनचे पैसे ठेवले. त्यांचे मन भरून आले.
त्यांनी मनाशी निश्चय केला, बहिणीचे गहाण असलेले दागिने लवकरच स्वतःच्या कमाईने सोडवून देईन.” आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. मुलांनो, हा नात्याच्या गोडवा आजच्या काळात, आपण आपल्या जीवनात अंगीकारायला हवा.
भारतीय क्षेपणास्त्र निर्मितीचे जनक, बालमित्र, भारताचे माजी राष्ट्रपती, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, देशातील ३० विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदवीने सन्मानित झालेले डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सर…
आपल्या भाषणात सांगत, “जगाच्या रंगमंचावर असे वावरा की, जगाच्या रंगमंचावरचा आयुष्याचा आपला खेळ संपल्यानंतर, टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत आणि आजही त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्यातून त्यांच्यासाठी अखंड जग टाळ्या वाजवतच आहे आणि टाळ्या वाजत आहेत…