विशेष – प्रशांत सिनकर
हिवाळा ऋतू सर्वांना हवाहवासा वाटत असला तरी पाहुण्या पक्ष्यांसाठी हा ऋतू काही वेगळाच असतो. एरवी पुस्तकात दिसणारे पक्षी प्रत्यक्ष नजरेच्या टप्प्यात भिरभिरताना दिसतात. ठाणे खाडी तर पाहुण्या पक्ष्यांसाठी वरदान ठरत आहे. एका फ्लेमिंगो पक्ष्यांमुळे सर्वांच्या चर्चेत ठाणे खाडी आली आहे. वास्तवात युरोप आणि आशिया खंडातील विविध पक्षी खाडीत तळ ठोकून असतात. येथील जैवविविधतेमुळे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात अशा तिन्ही ऋतूत अनेक पक्षी मुक्कामाला येत आहेत.
मुंबई शहरालगत असणारे ठाणे शहर स्मार्टसिटीच्या पंक्तीत बसल्यामुळे देशातच नव्हे तर परदेशात ठाण्याला ओळखलं जातं. मात्र शहराची मूळ ओळख ही निसर्ग संपन्नता हीच आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डोंगर, तलाव आणि सोबतीला विस्तीर्ण खाडी किनारा असं भरभरून दिलेल्या नैसर्गिक संपत्ती कदाचित काही शहरांना लाभली असावी. खाडीमुळे ठाणे शहराला एक वेगळा इतिहास देखील लाभला असून त्याच्या खुणा देखील तोफांच्या माध्यमातून बघायला मिळतात. खाडीतील मासे, जलचर, प्राणी पक्षी यांची एक परिसंस्थांच वावरत हळूहळू वाढताना दिसतो आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे खाडी संवर्धनाच्या दृष्टीने सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात असून याचं फलित गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे.
वर्षाचे बाराही महिने फ्लेमिंगोंची नजाकत !
परदेशी पाहुणा अशी ओळख असलेला फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्याची आता स्थानिक पक्ष्यांमध्येच गणती करावी लागणार आहे. ठाणे खाडीत वर्षभर त्यांचा वावर असून परिसरातील पोषक वातावरणामुळे ठाणे, रायगड (उरण) जिल्ह्यातील खाडी समुद्रकिनारी मोक्याची जागा बघून त्यांचा कायमस्वरूपी मुक्काम विसावण्याची शक्यता आहे. गुजरातमधील रणकच्छ नंतर आपल्याकडे देखील त्यांचा विस्तार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे खाडी परिसरात हिवाळ्यामध्ये देश-विदेशातील शेकडो विविध पक्षी बघायला मिळतात. नंतर उष्मा वाढायला सुरुवात झाल्यावर बहुतांशी सर्वच पक्षी आपल्या मायदेशी अथवा विणीच्या मैदानांवर परतताना दिसतात; परंतु याला काही फ्लेमिंगो आता अपवाद राहिले आहेत. पावसाळा संपला की, कच्छ तसेच युरोप, सैबेरीया यांसारख्या देशातून बहुसंख्येने येणारे फ्लेमिंगो आता ठाणे खाडीत तळ ठोकूनच आहेत. गेल्या काही वर्षांपासून खाडी परिसरात कायमस्वरूपी भिरभिरणं सुरू असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात. राज्य सरकारने देखील ठाणे खाडीचा काही परिसर फ्लेमिंगोसाठी आरक्षित केला असून त्यामुळे त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरत आहे. खाडी परिसरात त्यांच्या आवडीचं शेवाळ, मासे आदी खाद्य विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे इकडच्या वातावरणाशी जुळवून घेत असावेत आणि त्यामुळे खाडीत वर्षाचे बाराही महिने फ्लेमिंगो दिसत आहेत. फ्लेमिंगोंचा गुलाबी रंग ठाणे खाडीतील विशिष्ट शेवाळ व लाल छोटी कोलंबी खाल्ल्याने येतो. ऐरोली येथून फ्लेमिंगो दर्शनासाठी बोटीची सोय कोस्टल आणि मरिन बायोडायवरसिटी सेंटरने केली आहे. दरवर्षी जानेवारी ते एप्रिलमध्ये बोट सफारी असते.
ठाणे खाडीत फ्लेमिंगो पाठोपाठ सीगल पक्षी देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. लडाख, चायना, सैबेरिया, युरोप, कॅस्पियन समुद्र या ठिकाणाहून ब्लॅक हेडेड सीगल्स, ब्राऊन हेडेड सीगल्स, पलाश गल्स, स्लेंडर बिलगल्स, स्टेपी गल्स, कॅस्पियन गल्स असे सात ते आठ प्रकारचे सीगल्स भारताच्या किनारपट्टीवर भिरभिरताना दिसतात. यापैकी ठाण्याच्या किनारपट्टीवर ब्लॅक हेडेड आणि ब्राऊन हेडेड गल्स बघायला मिळतात. प्रमुख खाणं हे मासे, लहान खेकडे, कोलंबी यांसारखे जलचर हे त्यांचे नैसर्गिक खाद्य आहे. मात्र या पक्ष्यांना पर्यटकांनी मानवी खाद्याची सवय लावली आहे. खरं तर निसर्गाने समतोल राखण्यासाठी प्रत्येक सजीवाची निर्मिती केली आहे. समुद्रातील मेलेले मासे खाऊन सीगल्स सारखे पक्षी समुद्र स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. मात्र हा समतोल बिघडवण्याचे काम पर्यटक करताना दिसतात. तेलकट पिष्टमय पदार्थांचे सेवन केल्यामुळे या पक्ष्यांचे चयपचय क्रियेत अडथळा येण्याची शक्यता आहे.
ठाणे खाडीचे खरं तर आपल्याला वरदान लाभले आहे व ते प्रदूषणमुक्त ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
खाडीत तब्बल २२० पक्ष्यांचा वावर!
नैसर्गिक विविधतेमुळे ऋतुमानानुसार ठाणे शहरात अनेक प्रकारचे पक्षी झेपावतात, सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे भारताच्या इतर भागांबरोबरच युरोप, आशिया खंडातील विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून येतात व ठाणे खाडी परिसरात अनेक पक्ष्यांची मांदियाळी भरताना दिसते. फ्लेमिंगो पक्ष्याबरोबर सीगल्स, रानबदकं, सँडपायपर, पेन्टेड स्टार्क, स्पुन बिल, गॅाडवीट, आयबीस, ईग्रेट्स, विविध बदके, हेराॅन्स यांसारख्या मनोहारी पक्ष्यांसाठी निवारा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये (२०११ ते २०२४) ठाणे खाडीत तब्बल २२० प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी सोडल्यामुळे जलचरांसाठी पोषक ठरले आहे. खाडीच्या पाण्यात हे पाणी मिसळल्याने या ठिकाणी मासे, चिंबोरी, कोळंबी यांसारखे जीव वाढत असून अशा जलचरांवर ताव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी येताना दिसतात. थंडीच्या दिवसांत एकाच वेळी तब्बल एक ते दोन हजार वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे थवे या ठिकाणी बघायला मिळतात. दरवर्षी जवळजवळ १ लाख पक्ष्यांना ठाणे खाडी आसरा देते. खाडी २६ किमी लांब असून तिला २०२२ साली ‘रामसर’ हा संरक्षित पक्षी क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.