Sunday, August 24, 2025

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे निमंत्रण न मिळाल्याने सुनील गावस्कर नाराज

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे निमंत्रण न मिळाल्याने सुनील गावस्कर नाराज

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर विजय मिळवला आहे. तब्बल १० वर्षानंतर ऑस्टेलियाने ३-१ ने ही ट्रॉफी जिंकली आहे.ऑस्ट्रेलियाच्या संघाला एलन बॉर्डर यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी प्रदान केली आहे.एलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर यांच्या नावावरून या ट्रॉफीचं नाव ठेवण्यात आलं आहे. या पुरस्कार वितरणावेळी सुनील गावस्कर ऑस्ट्रेलियातील सिडनीत उपस्थित असतानाही त्यांना स्टेजवर बोलावले नाही. याबाबत गावस्करांनी नाराजी व्यक्ती केली आहे.

सुनील गावस्करांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या प्रेझेंटेशनबाबत बोलताना म्हणाले, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पुरस्कार प्रदानावेळी मला स्टेजवर उपस्थित राहण्यासाठी नक्कीच आवडले असते. अखेर ही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आहे. मी इथे मैदानावर उपस्थित आहे. ऑस्ट्रेलिया जिंकला याने मला काही फरक पडत नाही. ते चांगले क्रिकेट खेळले आणि त्यामुळे ते जिंकले आहेत. ठीक आहे, फक्त मी भारतीय आहे म्हणून मी सादरीकरणामध्ये ट्रॉफी देऊ शकलो नाही. माझा मित्र एलन बॉर्डरसह ट्रॉफी सादर करताना मला आनंद झाला असता, अशा शब्दांत गावस्कर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची अशी योजना होती की, जर ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली तर एलन बॉर्डर ट्रॉफी देतील आणि भारताने ही ट्रॉफी त्यांच्याकडे कायम ठेवली तर सुनील गावस्कर ट्रॉफी देतील. गावसकर स्टेजवर न जाण्यामागे हेच कारण होते. असेही सांगण्यात येत आहे. मात्र, ट्रॉफी प्रदान करण्यावेळी स्टेजवर बोलवण्यात आले नसल्याने गावस्कर नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment