भालचंद्र ठोंबरे
श्रीविष्णूंचा अवतार व महाभारताचा नायक असलेल्या श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया असल्याचा उल्लेख पुराणात असून यापैकी केवळ आठच प्रमुख असल्याचाही उल्लेख पुराणात आहे. त्या आठ पत्नींची नावे अनुक्रमे रुक्मिणी, सत्यभामा, जांभवंती, कालिंदी, मित्रविंदा, नागजीती, (सत्या) भद्रा, लक्ष्मणा (मद्रा) अशी आहेत. यातही रुक्मिणी ही प्रमुख आहे. श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण करून तिच्याशी विवाह केल्याचा तसेच रुक्मिणी ही माता लक्ष्मीचाच अवतार असल्याचा उल्लेखही पद्मपुराण, विष्णुपुराण व भागवत पुराणात आहे. विदर्भ नरेश भीष्मक व पत्नी शुद्धमती यांच्या पोटी कुंडनी येथे रुक्मिणीचा जन्म झाला. त्यावेळेस विदर्भाची राजधानी कुंडनी (सध्याच्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर) येथे होती. रुक्मिणीला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश व रुक्मनेत्र असे पाच भाऊ होते. वयात आल्यापासूनच तिला कृष्णाच्या विविध लीला, तसेच जरासंधाचा पराभव, कंस वध व अन्य पराक्रमाच्या गाथा ऐकून तिला कृष्णाबद्दल आकर्षण वाटू लागले होते व तिची कृष्णावर प्रीती जडली.
वयात आल्यावर तिच्या विवाहाचा विचार भीष्मक व राणी शुद्धमती यांच्या मनात सुरू झाला. त्यांना रुक्मिणीचा विवाह कृष्णाशीच व्हावा अशी इच्छा होती. मात्र रुक्मिला रुक्मिणीचा विवाह त्याचा परममित्र चेदीचा युवराज शिशुपाल यांच्याशी व्हावा, असे वाटत होते. रुक्मी जरासंधाचाही मित्र होता. शेवटी रुक्मिच्या आग्रहावरून भीष्मकही रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्यास तयार झाला. रुक्मिणीचे स्वयंवर करावे असे भीष्मकाने ठरविले मात्र त्यात रुक्मिणीने शिशुपालाचीच निवड करावी अशी रुक्मिची सूचना होती. मात्र रुक्मिणी या निर्णयामुळे नाराज होती. तिने एका विश्वासू ब्राह्मणाला द्वारकेला कृष्णाकडे चिठ्ठी घेऊन पाठविले व आपण मनाने तुम्हासच वरल्याचेही कळविले. ब्राह्मणाने कृष्णाला चिठ्ठी देऊन सर्व वृत्तांत कथन केला.
कृष्णही रुक्मिणीच्या सौंदर्याची ख्याती ऐकून होते. त्यांचीही रुक्मिणीशीच विवाह करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्वरित ब्राह्मणासह रथावर आरूढ होऊन कुंडनीला प्रयाण केले. कृष्ण एकटेच निघाल्याचे पाहून बलरामही यादव सेना घेऊन त्यांच्या पाठोपाठ निघाले. रुक्मी व भीष्मकाच्या आमंत्रणावरून चेदी युवराज शिशुपालनेही आपला मित्र जालंधर, दंतवक्र, शाल्व, विदुरथ यांच्यासह व मोठ्या सैन्यासह कुंडनीकडे कूच केले. राजा भीष्मकाने सर्वांचे यथोचित स्वागत करून त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. लग्नाच्या दिवशी रुक्मिणी रिती रीवाजाप्रमाणे साज शृंगार करून मैत्रिणीसह कुलस्वामिनी अंबा देवी (गिरीजा गौरीच्या)च्या दर्शनासाठी मंदिरात गेली. रुक्मिणीच्या सोबत तिच्या सखी होत्या. तसेच रुक्मिने संरक्षणासाठी सैन्यही पाठविले होते. अंबा देवीच्या दर्शनासाठी जाणारी रुक्मिणी, कृष्णाकडून कोणताही निरोप न आल्याने तसेच द्वारकेला गेलेला ब्राह्मणही परत न आल्याने चिंतेत होती. तिला आपला निरोप कृष्णापर्यंत पोहोचला की नाही याची काळजी वाटू लागली. तसेच चिंता ही उत्पन्न होऊ लागली; परंतु देवदर्शन करून बाहेर येताच तिला तो ब्राह्मण दिसला. त्याला पाहून तिला अत्यंत आनंद झाला. तसेच ब्राह्मणांनेही येऊन सर्व वृत्तांत सांगून श्रीकृष्ण स्वतः आल्याचे सांगताच रुक्मिणीला आनंद झाला.
मंदिरातून बाहेर आलेली रुक्मिणी स्वतःच्या रथात न बसता श्रीकृष्णाच्या रथात जावून बसली व कृष्णाने रथ द्वारकेच्या दिशेने सोडला. त्या पाठोपाठ बलरामही आपल्या सैन्यासह निघाले. कृष्णाने रुक्मिणीला पळविल्याचे पाहताच शिशुपालांसह सर्व राजे त्यांना अडविण्यासाठी त्यांच्या पाठलागावर निघाले. शिशुपाल व सहकाऱ्यांच्या सैन्याला येताना पाहून बलरामाची यादव सेना त्यांचीशी भिडली. दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. अखेर यादव सैन्यापुढे टिकाव न लागल्याने शिशुपालासह सर्व राजांचे सैन्य पराभूत होऊन माघारी परत फिरले. रुक्मी मात्र कृष्णाला आव्हान देत त्यांचा पाठलाग करू लागला. जोपर्यंत रुक्मिणीला परत आणत नाही तोपर्यंत कुंडनला जाणार नाही अशी प्रतिज्ञा करून कृष्णाशी लढण्यास निघाला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. कृष्णाने रुक्मीचे धनुष्य तोडून त्याचा रथ तोडला, त्याला पायदळ केले. हातात तलवार घेऊन त्याला पकडून ठार मारणार तोच रुक्मिणीने भावाला ठार न मारण्याची कृष्णाला विनंती केली. अखेर कृष्णाने रुक्मीचे केस कापून त्याला सोडून दिले. अपमानित झालेला रुक्मी प्रतिज्ञेप्रमाणे कुंडनला न जाता तेथेच नगर स्थापून राहू लागला. कृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला पोहोचले तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व येथे त्यांचा विवाह संस्कार पार पडला.