Saturday, February 8, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलपोस्टमन पॉइंट

पोस्टमन पॉइंट

डॉ. विजया वाड

ही खरीखुरी गोष्ट आहे. डॉ. विजयकुमार वाड भारताच्या सीमेवर, हिमालय प्रदेशात, आपल्या देशासाठी लढत होते. भारतीय सैन्यात कॅप्टनच्या हुद्यावर काम करीत होते. वर्ष होते १९६५. भारत-पाक युद्धाचा समय होता. लक्ष्मण नावाचा पोस्टमन हिमाचल प्रदेशात पत्रवाटप करीत असे. तो पत्रांचा जमाना होता आजच्यासारखे जागोजागी फोन नव्हते. बलबीरसिंगच्या बायकोचे पत्र-उघडे कार्ड होते. त्यात बलबीरसिंग बाप झाल्याचे आनंद वृत्त होते. आता ती बातमी वाचून, ऐकून, सारे जवान आपणच बाप झाल्यासारखे नाचणार होते.

“बाळ, आज जाऊ नको. आज वादळाची चिन्हे आहेत.” असे लक्ष्मणची आई म्हणू लागली.
“नको आई, ही आनंदवार्ता कधी एकदा जवानांच्या कँपवर पोहोचवतो अशी माझ्या मनाला घाई झाली आहे.’’
“ अरे पण बाळ…”
“ आता पण बीण काही नाही कर्तव्य प्रथम.”
“ बरे, जपून जा. बर्फाचे कडे कोसळत आहेत.”
“ होय आई” आणि लक्ष्मण पत्र वाटपासाठी निघाला.
पण वाटेत हिमवादळ आले.
“ तरतरा तुट हा कडा ! कोसळती बर्फांचे कडे ! ते हिमवादळ केवढे ! दाविते रौंद्र रूप एवढे !’ असेच ज्याचे वर्णन करता येईल. मित्रांनो !

तटातटा कडा कोसळला आणि लक्ष्मण त्याखाली गाडला गेला. लक्ष्मण का बरे आला नाही म्हणून जवान खाली उतरले… तो लक्ष्मण बर्फाच्या कड्याखाली शांत झोपला होता. चिरनिद्रा मृत्यू. त्याच्या हातात पोष्टाची थैली होती. जवानांची पत्रे असलेली. त्यात बलबीरसिंग बाप झाल्याची शुभ घटनाही होती. जवानांनी ते पत्र रडत रडत वाचले. बलबीरसिंगने सुख-दु:ख ऐक होऊन टाहो फोडला. पोष्टमन गेल्याचे दु:ख नि बाप झाल्याचे सुख, असे संमिश्र भाव.
सुखाचे हो सुख, झाले दु:खाचा हो कडा
माझा लक्ष्मण गेला, माझा मैतर केवढा !
ती जागा पोस्टमन पॉइंट म्हणून प्रसिद्ध झाली. सैन्यातली मोठ्यातली मोठी व्यक्ती, कितीही हुद्द्यावर असो, त्या जागी थांबते कडक सॅल्यूट ठोकते आणि परत कर्तव्यावर जाते.
जय लक्ष्मण जय जय भारत देश ! जय जगत!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -