शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा…
मी कशी शब्दांत सांगू, भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे, लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा…
लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा…
शोधिले स्वप्नात मी, ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा…
गीत : मंगेश पाडगांवकर
स्वर : अरुण दाते, सुधा मल्होत्रा
लवलव करी पातं …
लवलव करी पातं
डोळं नाही थाऱ्याला;
एकटक पाहूं कसं
लुकलुक ताऱ्याला?
चव गेली सारी,
जोर नाही वाऱ्याला;
सुटं सुटं झालं मन :
धरूं कसं पाऱ्याला?
कुणी कुणी नाही आलं,
फडफड राव्याची;
रुणझुण हवा का ही?
गाय उठे दाव्याची.
तटतट करी चोळी,
तूट तूट गाठीचीं;
उंबऱ्याशी जागी आहे
पारूबाई साठीची.
गीत : आरती प्रभू
स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर