श्रीनिवास बेलसरे
जुने सिनेमा हे तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब चित्रित करत असत. भारतीय समाजातील, नातीगोती, चालीरीती, सणवार, समज-गैरसमज, श्रद्धा-अंधश्रद्धा, भक्ती असे कोणतेही विषय त्यांना वर्ज्य नव्हते. त्यामुळे जुन्या सिनेमात सर्व सणांवरची गाणी आहेत, प्रेमावर, विरहावर, अगदी लग्नविधींवरही गाणी आहेत, लहान बाळाला झोपवतानाची अंगाईगीते आहेत. तेव्हाचे कवी साध्यासरळ भारतीय जीवनशैलीशी, लोकमानसाशी भावनिकदृष्ट्या जोडले गेलेले होते. जीवन हे हल्लीसारखे घाईघाईत, मिळेत त्या वेळात, उरकून टाकायचे ‘टास्क’ नव्हते. सुख आणि दु:खासह साजरा करायचा तो एक सोहळा होता. उत्सव होता. सिनेमा होता सी.एस.वासन यांनी जेमिनी पिक्चर्ससाठी निर्मिलेला १९६४ चा जिंदगी. दिग्दर्शक रामानंद सागर. कलाकार – राजेंद्रकुमार, वैजयंतीमाला, राजकुमार, पृथ्वीराज कपूर, लीला चिटणीस, मेहमूद, हेलन, धुमाळ, जीवन आणि कन्हैयालाल. या सिनेमात वैजयंतीमालाच्या अत्यंत नैसर्गिक, सोज्वळ अभिनयाबरोबरच हेलनचे सौंदर्य आणि अभिनयही पाहण्यासारखा होता. सिनेमा एका फ्रेंच कादंबरीवर बेतलेला होता. त्याची लगेच १९६५ ला तमिळ (वाझाकाई पडागू) आणि तेलुगू (अदा ब्राथूकु) आवृत्तीही निघाली.
एक नाट्य अभिनेत्री असलेल्या बीनाच्या सौंदर्यावर (वैजयंतीमाला) थियेटरचा मालक रतनलाल लुब्ध होतो. तो तिचे अपहरण करायला गुंड बांकेला (जीवन) सांगतो. सुदैवाने तिथे राजन (राजेंद्रकुमार) येऊन तिला वाचवतो आणि घरी नेऊन सोडतो. पुढे परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. सुरुवातीला राजनचे वडील रायबहादूर गंगासरण (पृथ्वीराज कपूर) इतक्या गरीब मुलीला सून करून घ्यायला तयार नसतात पण राजनच्या घर सोडण्याच्या धमकीने राजी होतात. लग्न होते. बीना गर्भारशी होते. विशेष म्हणजे त्या प्रसंगावरसुद्धा शैलेंद्रने आपले अद्वितीय लेखनकौशल्य सिद्ध करणारे एक गाणे लिहिले. जेव्हा नवविवाहित वधूच्या रूपातली वैजयंतीमाला गर्भार असल्याची बातमी घरात पसरते त्या प्रसंगावरचे हे गाणे शंकर जयकिशन यांच्या दिग्दर्शनात लतादीदीने गायले होते. त्या आगळ्या गीताचे शब्द होते-
‘एक नए मेहमान के आने की खबर है,
दिल में लहर है.
चाँद को पलने में बुलाने की खबर है,
दिल में लहर है.’
त्याकाळी निर्मल, स्वाभाविक, नैसर्गिक जीवन जगणाऱ्या समाजात अपत्याच्या जन्म ही लग्नानंतरची अत्यंत आनंददायक घटना मानली जायची. गर्भधारणेचा सुद्धा उत्सव केला जायचा. तसाच सोहळा रायबहादूर यांच्या प्रशस्त हवेलीत सुरू आहे. बीनाच्या मैत्रिणी तिची चेष्टा करत, तिला खुलवत सगळे विधी पार पाडत आहेत असे दृश्य! गीतकार म्हणतात घरात ‘एक नवा पाहुणा येतोय ही गोष्ट म्हणजे आम्ही जणू आमच्या घरातल्या पाळण्यात तेजस्वी चंद्रालाच निमंत्रित केले आहे आणि तो येतोय! बीना ही गोष्ट सगळ्यांना माहीत झाल्याने आणि ते तिचा जाहीर उच्चार करत असल्याने संकोचून जाते आहे, लाजते आहे. त्यावर हेलन म्हणते अगं सुंदर हरणाक्षी, तू नजर का चोरतेस? खाली का बघतेस? लाजतेस कशाला? ही तर आनंदाने सर्वांना सांगण्याची बातमी आहे! ही लपवायची गोष्ट थोडीच असते?
‘नैनोवाली काहे को तू नैन चुराये,
बैठी है तू चोरसी क्यों सरको झुकाए,
मुख न छुपा क्या यह छुपानेकी खबर है?
एक नए मेहमान के आनेकी खबर हैं,
दिल मे लहर हैं…’
आता येणारा स्वत: जरी रडत रडत येणार असला तरी तो सगळ्या घराच्या चेहऱ्यावर अत्यानंदाचे हसू आणणारा असणार आहे. त्याच्या नुसत्या आगमनाने घरातील सर्वांच्या मनात आशेचे कितीतरी दीप उजळणार आहेत. ही तर नाचण्यागाण्याची, आनंद साजरा करण्याची बातमी आहे.
‘रोता कोई आएगा इस घरको हँसाने,
आसके दीपकसे कई दीप जलने,
नाचे रे मन नाचने-गानेकी खबर है.
दिलमें लहर है…’
‘जिंदगी’मध्ये असेच दुसरे एक गाणे आहे, मन्नाडेसाहेबांनी गायलेले! घटनाक्रमात काही समज-गैरसमज झाल्याने राजनने बीनाचा त्याग केला आहे. बीनाला कायमचे माहेरी पाठवल्यावर योगायोगाने त्याची, वडिलांचे जीवलग मित्र असलेल्या खानचाचाच्या घरी, आपल्याच छोट्या मुलाशी भेट होते. तेव्हा त्याला कडेवर घेऊन खेळवताना तो म्हणतो –
“मुस्कुरा, लाडले, मुस्कुरा.
कोई भी फूल, इतना नहीं खुबसूरत,
है जितना ये मुखडा तेरा.
मुस्कुरा, लाडले, मुस्कुरा.
त्याकाळी लहान मुलांबद्दल सर्वांनाच प्रेम वाटायचे. पहिले अपत्य ही तर आनंदाची पर्वणी असायची. त्याच्या आगमनाने आई-वडिलांच्या आनंदाला पारावर उरत नसे. राजेंद्रकुमारला हा आपलाच मुलगा आहे हे माहीत नसले तरीही त्याला त्या गोड दिसणाऱ्या बाळाबद्दल स्वाभाविक प्रेम दाटून येते आणि तो म्हणतो, ‘या जगात तुझ्याइतके सुंदर एकही फूल नाही. तू असाच हसत राहा. तुझे हे निरागस हसू कधीच हरवू नये. तुझ्या तारुण्यात तुला नेहमी फुलांच्या बिछान्यावर झोपायला मिळो. माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे.
‘तेरी ये मुस्कान कोई ना छीने कभी,
और फूल की सेज सोए जवानी तेरी,
मालिकसे है ये दुआ, है ये दुआ,
मुस्कुरा लाडले मुस्कुरा…’
राजन पत्नीच्या विरहात, तिने केलेल्या प्रतारणेच्या अतीव दु:खात आतून अतिशय अस्वस्थ आहे. तो त्या बाळाला म्हणतो, ‘तुला पाहून मला माझे बालपण आठवू लागले आहे. मीही तुझ्यासारखाच लहानपणी किती आनंदी होतो.’
‘तुझको जो देखा, वो दिन याद आने लगे.
आँखों के बुझते दिए झिलमिलाने लगे,
मैं तेरे जैसाही था, ऐसाही था.
मुस्कुरा, लाडले, मुस्कुरा.’
राजेंद्रकुमारच्या मनात बीनाविषयी अजून संशय आहे. त्याच्या मते तिने त्याला फसवले आहे. त्याच्या प्रामाणिक प्रेमाची किंमत कवडीमोल करून ती परक्या पुरुषाकडे रात्रभर राहिली होती. त्याचा हा समज हे सत्य नसले तरी ते त्याला वास्तविकता माहीत नाही. म्हणून तो अतिशय दुखावला आहे. त्यामुळे तो नकळत त्या छोट्या बाळालाही सांगतो, ‘तू या जगापासून सांभाळूनच राहा. इथे अगदी जवळ येऊनही लोक परकेच राहतात. आपली सावलीसुद्धा अस्तनीतला साप बनून आपल्याला दंश करते. बाहेरच्या जगात सगळे बेईमान असतात. तू जपून राहा. स्वत:ला संभाळत पण असाच हसत रहा.
‘बचके तू चल, लाडले, हैं बुरा ये जहाँ,
बन साँप डसता है अपनाही साया यहाँ,
हर कोई है बेवफा, है बेवफा.
मुस्कुरा, लाडले, मुस्कुरा.’
आपल्या संस्कृतीशी, इथल्या भावविश्वाशी समरस झालेले, जीवनाचे सर्वसमावेशक दर्शन घडवणारे ते चित्रपट म्हणजे जुन्या सुसंस्कृत, सुस्थिर, आश्वस्त जगाला पुन्हा भेट देण्याची संधी असते. पाहावेत असे सिनेमा कधीकधी!