Friday, March 28, 2025

लग्न

प्रा. प्रतिभा सराफ

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. त्याआधी त्यांचे पूर्णतः मनोमिलन होतेय का, हे पाहण्याची सोय अलीकडच्या लग्नांमध्ये झालेली आहे. म्हणजे कोणी एकेकाळी मुलांची लग्न पाळण्यातचही ठरवली जायची किंवा काही जाती जमातीमध्ये मामाला वगैरे मुलगी द्यायची, हे आधीच ठरलेले असायचे आणि तसे घडायचेही. एखाद्या धर्म, पोटजात, आर्थिक स्तर इत्यादी सर्व पाहूनही लग्न ठरवली जायची किंवा अजूनही ठरवली जातात. पण एक मात्र खरे की, आता अंतरपाट बाजूला झाल्यावर नवरा-नवरी एकमेकांना पाहतात, असे होत नाही. मुलामुलींना व्यवस्थित आधी एकमेकांना दाखवले जाते आणि मग त्यांच्यात संवाद घडवून आणून, लग्नासाठी परवानगी घेऊनच लग्न केली जातात, ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रेमविवाह असेल तर लग्नाआधीच लग्नात नवरा-नवरी म्हणून उभे राहण्याआधी एकमेकांविषयीची पूर्ण माहिती असते पण तशी माहिती ठरवलेल्या लग्नात नसल्यामुळे त्या मुलीला हळूहळू आपण कायमचे वास्तव्य करणार असतो अशा कुटुंबाची माहिती होणे आवश्यक आहे. यासाठीही काही लग्नविधी घडवून आणले जातात. या विधींमध्ये साखरपुडा, मेंहदी, हळद आणखीही खूप काही विधी असतात. यादरम्यान मुलीचे मन त्या होणाऱ्या नवऱ्याविषयी आणि त्यांच्या घरातल्यांविषयी थोडेफार तयार होते. तिच्यासोबत करवली म्हणून बहीण, मैत्रीण, नातेवाईक इ. नवीन घरी म्हणजेच सासरी सोबत जातात. त्यानंतरच ती तिथे एकटं राहायला सुरुवात करते. त्यामुळे हे विधी संस्कार म्हणून आणि मुलीची नवीन घरात एकटे राहण्याची मानसिकता तयार व्हावी या दृष्टीनेही आवश्यक असतात; परंतु आजकाल लग्नाचे स्वरूप बाजारू झाले आहे असे खूपदा वाटते.
मोठ्या बजेटच्या हिंदी सिनेमामधून हे सुरुवातीला सुरू झाले.

पूर्वी मुलाच्या घरच्या घरगुती कार्यक्रमात मुलाला हळद लावली जायची आणि मग त्या हळदीतला काही भाग शिल्लक ठेवून तो दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरी पाठवला जायचा आणि तिथे घरगुती कार्यक्रमात मुलीचा हळदीचा विधी व्हायचा. अलीकडच्या लग्नामध्ये वधू-वरांना एकत्र बसवून हळदीचा फार मोठा समारंभ केला जातो. तसेच मेहंदी लावण्याच्या कार्यक्रमाचे आणि साखरपुड्याचेही. ही लग्न आता कौटुंबिक न राहता ‘इव्हेंट’ झाली आहेत. लग्नांमध्ये हा ‘इव्हेंट’ मॅनेजर सगळे ठरवतो. म्हणजे मुलामुलींना काही प्रश्न विचारतो, काही खेळ खेळायला लावतो. त्यानंतरच्या ‘संगीत’ या कार्यक्रमात सासू-सासरे, आईवडील, नातेवाईक, नवरा आणि नवरीचे मित्र-मैत्रिणी, त्यांची लहान मुले यांचे वेगवेगळे नाच असतात. अशा पाच-सहा कार्यक्रमांवर फार मोठा खर्च केला जातो. खूपदा असे कार्यक्रम एखाद्या हॉटेलमध्येच ठेवले जातात. त्या हॉटेलमधल्याच काही खोल्या दोन्हीकडच्या नातेवाईकांसाठी दोन-तीन दिवसांसाठी भाड्याने घेतल्या जातात. लग्न कधी आपण राहतो त्या ठिकाणांच्या जवळ, तर कधी हिल स्टेशनवर किंवा देशाबाहेरही घडवून आणली जातात.

आता मला एक प्रश्न पडतो की, हे सगळे गरजेचे आहे का? या सगळ्याच्या खर्चाला कुठेतरी आळा बसू शकेल का? या जेवणावळीत खूप मोठ्या प्रमाणात अन्नही वाया जाते. कपडे, दागिने आणि आणखीही तत्सम देणेघेणे व्यवहार यामुळे पैशाचा वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो; परंतु जर असे मला वाटत असेल तर तसे सगळ्यांनाच वाटायला हवे, असेही नाही म्हणजे अनेकांशी मी या विषयावर जेव्हा बोलले तेव्हा ते म्हणाले की ‘लग्न’ हा विषय त्या त्या कुटुंबांची खासगी बाब आहे त्यामुळे त्यांनी या लग्नकार्यावर किती खर्च करावा, हे त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे! ‘लग्न एकदाच होतात.’ हे काही प्रमाणात खरे आहे. त्यामुळे आम्ही आमची हौसमौज आमच्या पद्धतीनेच पूर्ण करणार, असे म्हणणारा वर्गही मोठा आहे. पैसे आहेत म्हणून उडवणारे आहेत आणि पैसे नाहीत तरी कर्ज काढून लग्नसमारंभात उडवणारे आहेत. ‘हुंडा’ या विषयावर परत मौन बाळगलेले बरे. हे सर्वसाधारण बऱ्या परिस्थितीच्या कुटुंबीयांविषयी मी लिहिलेले आहे. श्रीमंतांच्या लग्नसोहळ्यावर आपण काय बोलणार बुवा? प्रसारमाध्यमे या लग्न समारंभाच्या फोटो आणि बातम्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसेही कमवतात. एकंदरीत काय तर लग्न असो व आणखी काही समारंभ, पैशाचा आणि वेळेचा किती अपव्यय करायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते, नाही का?
pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -