प्रासंगिक – लता गुठे
आजपर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या कलांबद्दल लेख लिहिले आहेत. त्यामध्ये स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, वारली चित्रकला याविषयी लिहिलं आहे आणि ते अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. मला सतत आकर्षित करणारी आणखी एक अनोखी कला म्हणजे मधुबनी चित्रकला. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय आखीव-रेखीव आणि सुंदर रंगछटांनी चित्रित केलेली ही कला आहे. आज आपण या कलेविषयी जाणून घेऊया… ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात आदिवासी भागांमध्ये वारली चित्रकलेची सुरुवात झाली आणि ही आदिवासी कला जगभर पसरली तसेच मधुबनी वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे. आजही महिलांना, मुलींना आकर्षित करते ती. साड्यांवर, दुपट्ट्यांवर मधुबनी चित्रं काढलेली असतात. या चित्रांमधून राधा कृष्णाच्या अनेक लीला चित्रित होतात आणि त्याचबरोबर झाडे, वेली, फुलं डोईवर घागरी घेऊन जाणाऱ्या स्त्रिया त्यांच्या आजूबाजूला मोर, हरण, पक्षी, मासे असे वेगवेगळे प्राणी व असं बरंच काही त्यामध्ये चित्रित केलेले असते.
मधुबनी म्हणजे मधू आणि वन यांचा चित्रित केलेला अनोखा संगम अशी या शब्दाची उत्पत्ती होते. या कलेला मैथिली कलाही म्हटले जाते. मधुबनी चित्रकला ही भारतातील बिहारमधील मिथिला प्रदेशातील एक लोककला आहे. या भागांमध्ये या चित्रकलेची सुरुवात कशी झाली आणि ती चित्रकला पुढे कशी विकास पावत गेली याचा इतिहास असा आहे…
असं म्हटलं जातं, ही कला रामायणापासून सुरू झालेली कला आहे. जेव्हा जनक राजाने सीतेचं स्वयंवर ठरवलं त्या वेळेला आजूबाजूच्या गावातील कलाकारांना बोलवून त्यांनी अशी सुंदर चित्रं काढून घेऊन सारा परिसर आकर्षित करून घेतला होता. पुढे १९३४ मध्ये विलियम जी. आर्चर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही लोप पावलेली कला शोधून काढली. ही कला खरं तर स्त्रियांनीच जिवंत ठेवली आहे. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही चित्रकला हस्तांतरित होत गेली. अति ग्रामीण भागामध्ये जी साधनसामग्री उपलब्ध असेल त्याने हे चित्र काढले जातात, यामध्ये नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. म्हणजेच, बांबूच्या काडीला कापसाने गुंडाळून त्याचा ब्रश केला जातो, बोटांची नखे, आगपेटीच्या काड्या किंवा निबची टोके, ब्रश इ.साधने वापरून मधुबनी शैलीची चित्रे काढली जातात. यामध्ये आकर्षित रंगाचा वापर केला जातो. हिरवा, पिवळा, निळा, काळा, लाल असे रंग वापरून विरोधी रंगाचा वापर करून चित्रकलेची ही शैली चमकदार रंगांनी चित्रित केली जाते. सर्व रंग पानाफुलांपासून बनवले जातात. यामध्ये गोल, चौकोन, त्रिकोण, रेषा अशा भौमितिक नमुन्याचा वापर करतात. अशा शैलीबद्ध आकृत्यांच्या वापराद्वारे वैशिष्ट्यपूर्ण आकारात, रंगात ही चित्रे अतिशय आकर्षक दिसतात. सुरुवातीच्या काळामध्ये अशी चित्रे घराच्या, मातीच्या, कुडाच्या भिंतीवर स्त्रिया रेखाटत असत आणि आपली झोपडी, घर सुंदर बनवायचे हा उद्देश असे. मुळात स्त्री ही अतिशय सृजनशील आणि सर्जनशील असल्यामुळे तिला सौंदर्याचं आकर्षण असलेलं जाणवतं. पुढे ही कला इतर गावांमध्ये, शहरांमध्ये पसरली आणि मधुबनी चित्रकलेला महत्त्व प्राप्त झालं. वेगळं काहीतरी प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे फरशी, शोभेच्या वस्तू, टीपॉय, पडदे यामध्ये अशी चित्रे पाहायला मिळतात आणि घराच्या सजवटीसाठी मधुबनी चित्रं वापरली जातात. पुढे जाऊन आणखी त्यामध्ये बदल होऊन धार्मिक ग्रंथातील कथा चित्रित होऊ लागल्या. या चित्रकलेची वैशिष्ट्ये असे सांगता येतील की, या चित्रात खासकरून कूल देवतेचे चित्रण होते. हिंदू देवी-देवतांचे फोटो, प्राकृतिक दृश्ये उदा. सूर्य आणि चंद्र, धार्मिक वनस्पती उदा. तुळस आणि विवाहाची दृश्ये पाहायला मिळतात.
मधुबनी भित्तिचित्रात चिकन माती व गायीच्या शेणाच्या मिश्रणात बाभूळ या झाडाचे डिंक मिसळून भिंतीवर सारवून बेस तयार केला जातो. गायीच्या शेणात एक खास प्रकारचे रसायन पदार्थ असल्याने भिंतीवर विशेष चमक येते. ही चित्रे त्या भागांमध्ये काही ठरावीक जागेतच चित्रे करण्याची प्रथा होती. त्यामध्ये घरातील देवघरासमोर किंवा देवघराच्या परिसरात तसेच लग्न समारंभाच्या वेळी काही महत्त्वाच्या पूजा किंवा शुभकार्य असेल तेव्हा अशी चित्रे काढून तो परिसर सुशोभित करतात. या चित्रांमध्ये खास समावेश असतो तो म्हणजे गणपती, दुर्गा, काली, सीता-राम, राधा-कृष्ण, शिव-पार्वती, गौरी-गणेश, विष्णू देवतेचा. अशी विविध चित्रे सणसमारंभ, शुभकार्याच्या काढली जातात. या व्यतिरिक्त प्राकृतिक आणि रम्य देखाव्याची चित्रेसुद्धा काढली जातात. वर म्हटल्याप्रमाणे पशु-पक्षी, वृक्ष, फुले-पाने इत्यादी चित्रेही वापरली जातात. आता या कलेला व्यावसायिक रूप प्राप्त झाले आहे. ही चित्रे कागदावर, कपड्यांवर व इतर वस्तूंवरही काढली जातात. मागणी पूर्ण करून देण्यासाठी स्त्रियांबरोबर पुरुषही आता ही चित्रे काढू लागली आहेत. दिवसेंदिवस या मधुबनी चित्रशैलीचे आकर्षण वाढत आहे. ही कला अधिक प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकार आणि अखिल भारतीय हस्तशिल्प भारत सरकार माध्यमातून महिला कलाकारांना ग्रामीण भागातील हस्तकलांचा विकास होण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना कागद, रंग व इतर साधन सामर्थ्य देऊन ही चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अशा चित्रांची जागोजागी प्रदर्शनेही भरविली जातात. अनेक परिवाराला यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे आणि ही कला मिथिलाच्या घराघरातील स्त्रियांची कुशलता दर्शविते. त्यांनीच घराच्या भिंतींपासून ते आज संपूर्ण रेल्वे या चित्राने चित्रित करण्यापर्यंत तसेच कपडे, फर्निचर, पडदे, बेडशीट्स इत्यादींवर मधुबनी चित्रकला प्रदर्शित केली आहे. अशा कलांची कदर करून याकडे सौंदर्यात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच अशा कला वृद्धिंगत होतील.