प्रा. देवबा पाटील
असेच ते दोघे आजेनाते म्हणजे आनंदराव आणि त्यांचा नातू स्वरूप गप्पागोष्टी करीत सकाळी फिरायला निघाले. फिरता फिरता स्वरूपची प्रश्नावली सुरू झाली. “ हवेला दाब असतो पण मग आपणास हवेच्या दाबाचे अस्तित्व कसे जाणवत नाही आजोबा?” स्वरूपने विचारले. आनंदराव म्हणाले, “ हवेचा दाब हा सगळीकडे, सर्व ठिकाणी, सर्व वस्तूंवर, सर्व दिशांनी सारखाच विभागलेला असतो. त्यामुळे त्याचे अस्तित्व आपणास जाणवत नाही. आपण श्वासोच्छवासाद्वारे, नाकातोंडावाटे सतत हवा आत घेत असतो व बाहेरही सोडत असतो. वातावरणातील हवा माणसाच्या शरीराच्या सर्व भागांमध्ये शिरत असते. त्यामुळे वातावरणातील हवेचा दाब व आपल्या शरीराच्या आतील हवेचा दाब हा नेहमी सारखाच राहतो. म्हणून आपणास बाहेरील हवेचा दाब जाणवत नाही.” “ मग वादळवारा कसा उत्पन्न होतो आजोबा?” स्वरूपने प्रश्न केला. “हलक्या व अतिशय संथपणे वाहणाऱ्या हवेला झुळूक म्हणतात. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या वातावरणातील वेगवेगळे भाग वेगवेगळ्या प्रमाणात उष्ण होतात. त्यामुळे जमिनीवर हवेचे कमी-जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. जर दोन ठिकाणच्या तापमानातील पर्यायाने हवेच्या दाबातील फरक हा जर थोडा अधिक असेल, तर हवा जास्त वेगाने वाहते. त्यालाच वारा म्हणतात. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारा वाहतो. तापमानातील फरक अतिशय जास्त असल्यास तोच वारा जास्त वेगाने वाहतो. त्यालाच सोसाट्याचा वारा म्हणतात. हवेच्या दाबातील फरक हा खूप खूप जास्त असल्यास हाच वारासुद्धा खूप खूप वेगाने व अत्यंत जोराने वाहतो त्याला वादळ म्हणतात. वादळ हे आपल्यासोबत वातावरणातील धूळ, धूर, कचरा वाहून नेते. वादळात जर अतिप्रमाणात धूळ, वाळू असल्यास त्याला धूळवादळ वा वालुकावादळ म्हणतात. ते डोळे आंधळे करते म्हणून त्यापासून दहा हात दूरच राहिले पाहिजे.” आनंदरावांनी सांगितले.
“आजोबा, हवा सकाळी-सकाळी कशी मस्त गार वाटते.” स्वरूप म्हणाला.
आनंदराव म्हणाले, “ सकाळी वा सायंकाळी सूर्यकिरण पृथ्वीवर तिरपे येतात. सकाळ व सायंकाळच्या तिरप्या किरणांना वातावरणातील जास्त अंतराच्या जाड थरातून यावे लागते. त्यामुळे त्यांची उष्णता त्या थरात जास्त शोषल्या जाते व पृथ्वीवर येईपर्यंत ती कमी होते. तसेच ते सरळ किरणांपेक्षा जास्त जागा व्यापतात. त्यामुळे त्यांची उष्णता अधिक जागेवर पसरते. त्यामुळे जमीन कमी तापते व थंड राहते. म्हणूनच सकाळी व सायंकाळी हवा थंड असते; “ परंतु दुपारी हवा गरम का असते आजोबा?” स्वरूपने विचारले. “ दुपारच्या वेळेला सूर्य थेट डोक्यावर येतो नि त्याचे किरण पृथ्वीवर सरळ सरळ पडतात. सरळ येणाऱ्या दुपारच्या किरणांना वातावरणातून कमी अंतराच्या थरातून यावे लागते त्यामुळे त्यांची उष्णता वातावरणात कमी शोषली जाते. म्हणून दुपारी उष्णता जास्त असते.” “ आजोबा, जसजसे वर जावे तसतशी सूर्याची उष्णता वाढत जाते तरी उंचावरील हवा थंड का असते?” स्वरूपने विचारले. आजोबा म्हणाले, “ जमिनीजवळची हवा सूर्याच्या उष्णतेने तापून हलकी होते. हवा हलकी झाली की वर जाते. ती जसजशी वर वर जाते तसतशी ती विरळ होत जाते व तसतसा तिच्यावरील दाब कमी कमी होत जातो. त्यामुळे ती वर गेल्यावर प्रसरण पावते. तिच्या प्रसरणासाठी लागणारी उष्णता या हवेतूनच घेतली जाते. त्यामुळे हवेचे तापमान कमी होऊन ती थंड होते.” “ आजोबा, हवेतही पाण्याची वाफ असते ना.” स्वरूपने विचारले.
“ हो. हवेत जर पाण्याची वाफ नसती, तर पृथ्वीवर नेहमी दिवसभर कडक ऊन तापले असते व रात्रभर कुडकुडणारी थंडी पडली असती. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची सतत वाफ होत असते व ती हवेत मिसळत असते. वाफेचा महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की, ती दिवसा सूर्याची उष्णता शोषते, तर रात्रीला ती त्या उष्णतेला बाहेर जाऊ न देता राखून ठेवते. वाफेमुळे हवा समशीतोष्ण राहते व प्राणिमात्रांचे जीवन सुसह्य होते.” आनंदरावांनी सांगितले. अशाच ज्ञानविज्ञानवर्धक गप्पागोष्टी करीत ते दोघे आजेनाते सकाळी मस्त फिरून फारून आपल्या घरी परत आले.