भालचंद्र कुबल – पाचवा वेद
मला आताशा समाज माध्यमांवरील नेटकऱ्यांची किव येऊ लागलीय. एखाद्या घटनेमागचे गांभीर्य लक्षात न घेता, हातात मिळालेल्या माध्यमरूपी हत्याराचा अविचारी वापर करत स्वतःच्या मताला रेटण्याची जी विकृती या नेटकऱ्यांमध्ये निर्माण झालीय ती प्रचंड भयानक आहे. यापुढे, असे अनेक मनोरुग्ण पावला पावलांवर भेटत राहतील. याचं प्रमुख कारण म्हणजे ट्रोलिंगचा घुसलेला झोंबी व्हायरस…! झोंबीची लागण झालेला मनुष्य प्राणी जसा दुसऱ्या जिवंत माणसाला मारून नवीन झोंबी जन्माला घालतो, ट्रोलर्स याहून वेगळे नसतात. या झोंबींना तुम्ही नष्ट करायला गेलात, तर ते पुन्हा जिवंत होतात. पुन्हा पुन्हा माणसे खाऊ लागतात, ट्रोलर्सही वेगळं काही करत नाहीत. झोंबी फक्त दृष्य स्वरूपात किळसवाणे, विद्रूप आणि बिभत्स दिसतात, ट्रोलर्स देखील असेच पण अदृष्य स्वरूपात त्यांच्या विचारांतून, भावनांतून, स्वभावातून अशा अश्लाघ्यतेचा प्रसार करताना आढळतात. झोंबी जशी पाश्चात्य संकल्पना आहे. ट्रोलिंग सुद्धा पाश्चात्यच आहे. मग त्याचे अंधानुकरण करणारे आपण भारतीय नेटकरी जाळ्यात अलगद ओढले जातो. हे सर्व लिहिण्यामागचे कारण एकच, शरद पोंक्षे पुरुष नाटकात संवाद विसरतात आणि तो प्रयोग रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय त्या क्षणी काही पर्याय नसल्याने घ्यावा लागतो. या घटनेची बातमी होते आणि ट्रोलर्स नावाची अदृष्य जमात समाज माध्यमात धुमाकूळ घालू लागते. सहज एक सर्वेक्षण म्हणून हे ट्रोलर्स कोण आहेत? त्यांचे समाजात काय स्थान आहे? टीका करण्यास धजावलेल्या त्या वर्गाचे नाटक या माध्यमास दिलेले योगदान काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि एक विदारक सत्य समोर आले. तुटपुंज्या प्रयत्नास आलेले तुटपुंजे अपयश याचे मूलभूत कारण आहे. प्रत्येक प्रयत्नास किंबहुना कार्यास यश न मिळाल्यास त्याची अनंत कारणे असू शकतात; परंतु ती रिचवण्याची शक्तीच गमावल्याचे दिसून येत आहे. आम्हाला केवळ आणि केवळ यशाचे निर्णय हवे आहेत. न मिळाल्यास पलटवार ठरलेलाच आहे, म्हणजे पुन्हा प्रयत्न करण्याची, पुनर्वलोकन करण्याची मानसिकताच गमावून बसलेला हा वर्ग आहे.
सर्व कसं फास्ट झालंय. फास्ट थिंकींग, फास्ट स्टडी, फास्ट जर्नी, फास्ट मनी, फास्ट रिझल्ट्स, फास्ट फुड, फास्ट रिलेशनशिप. सारं काही एवढं फास्ट की त्या फास्टच्या वाऱ्याला उभं राहायची भीती वाटावी? या ट्रोलर्सना फास्ट व्यक्त व्हायचं असतं. मग ते सोशल मीडियाचा सर्रास वापर करतात. कुणाच्या निधनाची, कुणाच्या तरी विजयाची, जाणूनबुजून माहीत असलेल्या अफवेची बातमी प्रसारीत करण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहिली की या ट्रोलर्सची किव येते.
त्याचं झालं असं की पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात पुरुष या नाटकाचा प्रयोग रंगला होता आणि अचानक शरद पोंक्षे संवाद म्हणता म्हणता थांबले. प्रेक्षकांकडे शून्य नजरेने पाहत त्यांनी आपण ब्लँक झालो आहोत आणि प्रयत्न करूनही पुढील संवाद आठवत नसल्याची कबूली देऊन टाकली. अत्यंत जड अंतःकरणाने पडदा टाकावा लागला. प्रयोगाच्या तिकिटाचे पैसे मिळतील अशी हमी दिली; परंतु प्रेक्षकांनी पैसे नाकारले आणि पुढील प्रयोगास पुन्हा तिकीट काढून येऊ व उर्वरित नाटक पाहू, अशी समजूतदार प्रगल्भता दाखवली. विशेष म्हणजे त्याच दिवशीचा दुपारचा प्रयोग हाऊसफूल होऊन रंगला. शरद पोंक्षेनी सकाळची कसर भरून काढत आपल्या अभिनयाचे वर्चस्व सिद्ध केले… आणि हे घडते न घडते तोच फेसबुकवर पहिली पोस्ट फडकली, जी पूर्णतः सकारात्मक होती, मात्र त्या अानुषंगाने पडलेल्या कमेंट्स आणि पुढे एकावर एक पडत गेलेल्या पोस्ट आणि कमेंट्स वैचारीक दिवाळखोरी सिद्ध करणाऱ्या होत्या. कुणी पोंक्षेंना झालेल्या पूर्व आजाराबाबत सुनावत होते, तर हल्लीचे नट स्वतःचे शेड्युल कसे बिझी ठेऊन पैसे कमावण्यात गुंग आहेत. या वत्तीला बोल लावत होते. कुणीतरी रद्द झालेल्या प्रयोगाचे मानधन घेतलेच असणार की, असे बोलून अपमानित करत होते. नंतर नंतर तर त्या कमेंट्स वाचायचा देखील कंटाळा आला. काही वृत्तपत्रातून मात्र सकारात्मक बातम्या झळकल्या, हीच एक बाब आम्हा रंगकर्मीना दिलासा देणारी होती.
साधारण ९०-९१ सालची गोष्ट, महेश मांजरेकरांच्या एका नाटक दौऱ्यात मी आणि अमोल शेटगे (आताचा सिने दिग्दर्शक पूर्वाश्रमीचा फोटोजर्नालिस्ट) त्यांच्या तीन नाटकांची फोटोग्राफी करण्यासाठी त्या ग्रुप बरोबर दिल्लीला गेलो होतो. ‘डाॅक्टर तुम्ही सुद्धा…!’ मावळंकर नाट्यगृहात रंगले होते. मी आणि अमोल स्टेज समोरील पिटात कॅमेऱ्याने विदाऊट फ्लॅश अव्हेलेबल लाईटवर फोटो काढण्यात मग्न होतो. इतक्यात मोहन गोखले थांबले आणि स्टेज समोर कचाकच चमचमाटी फ्लॅशने फोटो काढणाऱ्यावर नाटक थांबवून कडाडले.
नाटक बघायला आलेले प्रेक्षकही बेशिस्तीत फोटो काढत होते. बरं प्रेक्षकात केंद्रीय मंत्री वसंत साठे आणि अनेक व्ही. आय. पी. बसले असतानाही प्रेक्षकांचे फोटो काढणे सुरू होते. शेवटी गोखलेंना नाटक थांबवावे लागले कारण, फ्लॅशमुळे ते ब्लॅक झाले होते. सिक्युरीटीजनी आम्हा सर्वांना हाॅलच्या बाहेर घालवले आणि मग एका विरामानंतर नाटक पुन्हा सुरू झाले. आम्हाला बाहेर काढल्याचे दुःख होतेच; पण फ्लॅश न वापरताही फोटो काढत असून सुद्धा अपमान सहन करण्याची नामुष्की आमच्यावर आली होती. मी विचार करतोय, त्या वेळेस जर हाच सोशल मीडिया आमच्या हाती असता तर? आम्हीही कदाचित ट्रोलिंग करून झोंबी निर्माण केले असते?
आश्चर्य आमच्या नाट्य-समीक्षकांबाबतही वाटत राहाते. एकतर सारेच समीक्षेच्या नावाखाली नाटकाच्या स्टोऱ्या लिहितात, वर वाचकांना स्टोऱ्यांमध्येच रस असल्याने म्हणे तसे लिहावे लागते, ही सारवा सारव देखील असतेच. सद्यस्थितीत एकाही युवा समीक्षकाची कुठल्याच नाटकावर लिहिण्याची योग्यता (खरंतर मला वेगळा शब्द वापरायचा होता, पण असो…) नाही. त्यातही जयवंत दळवींच्या आणि त्यातही पुरुष नाटकावर लिहायचं म्हणजे वांदेच की हो…! टीकेचा वापर करुन केवळ नकारात्मक वातावरण कसे पसरवता येईल याचे हेच समीक्षक म्हणून मिरवणारे मूलभूत घटक आहेत. वाटल्यास पोंक्षेच्या बाबतीत घडलेल्या घटनेची ‘केस स्टडी’ अभ्यासावी. या दोषांच्या जबाबदारीचा मुलस्त्रोत हा दिसामाजी काहीतरी ते लिहिणाऱ्यांमध्येच आढळेल. फेसबुक तर अशा टीकाकारांनी उकिरडा बनवून टाकलेय.
ब्लँक होणं ही एक मेंदूवर ताण पडल्यावर येणारी एक मनोवस्था आहे. ती नटाशीच निगडित आहे, असेही नाही. ती संवाद साधणाऱ्या कोणत्याही घटकाला येऊ शकते. अगदी प्रकाश योजनाकारही ‘ब्लँक’ होतो, याचा अनुभव मी घेतलाय. तेव्हा यावर इलाज, जो तो आपापल्या मानसिक कुवतेनुसार करत असतो, प्रश्न समोरच्याने ते समजून घेण्याचा असतो. घेणारे घेतातही पण ट्रोल करणाऱ्यांचे थोबाड कुणीतरी फोडायलाच हवे, त्याशिवाय गत्यंतर नाही…!