Friday, January 17, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘यदा कदाचित रिटर्न्स’ : नाबाद ४००

‘यदा कदाचित रिटर्न्स’ : नाबाद ४००

राजरंग – राज चिंचणकर

मराठी रंगभूमीवरच्या ज्या नाटकांनी रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे; त्यात ‘यदा कदाचित’ या नाटकाचाही समावेश आहे. युवा लेखक व दिग्दर्शक संतोष पवार याच्या ‘यदा कदाचित’ नाटकाने काही वर्षांपूर्वी विक्रमी प्रयोग करत रंगभूमी गाजवली होती. या नाटकाचा पुढचा टप्पा म्हणून ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाने रंगभूमीवर एन्ट्री घेतली आणि या नाटकालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुरुवातीपासूनच मिळत आहे. आता हेच ‘यदा कदाचित रिटर्न्स’ तब्बल ४०० प्रयोगांच्या टप्प्यावर येऊन पोहोचले असून, त्याचा नाबाद ४०० वा प्रयोग याच महिन्यात रंगणार आहे.

संतोष पवारचे ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे नाटक ५ वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले आणि त्याचे १७४ प्रयोग झाले असताना त्या नाटकाच्या निर्मात्यांचे अकस्मात निधन झाले. परिणामी, या नाटकाचे प्रयोग थांबले. त्यानंतर कोरोनाचा फटका रंगभूमीला बसला. त्यावेळी थांबलेल्या या नाटकाचे प्रयोग, संतोष पवारने नवीन निर्मात्यांना घेऊन पुन्हा एकदा रंगभूमीवर सुरु केले आणि सध्या ‘फूल टू बॅटिंग’ करत हे नाटक रंगभूमी गाजवत आहे. आतापर्यंत विविध नाटकांच्या निमित्ताने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा भूमिका पार पाडणारा संतोष पवार या नाटकात ८ वेगवेगळ्या भूमिका सुद्धा रंगवत आहे. त्याच्यासह नव्या दमाचे १३ कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत.

रंगभूमीवरचा ‘अवलिया’ म्हणून ओळख असलेल्या संतोष पवारची खासियत अशी की चेहरा नसलेल्या कलाकारांना घेऊनही तो नाटक यशस्वी करून दाखवतो. ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे नाटकही त्याला अपवाद नाही. आतापर्यंत अनेक कलाकारांच्या या नाटकात एन्ट्री आणि एक्झिट झाल्या आहेत; पण संतोष पवार त्या कलाकारांच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून थोडक्या अवधीत नव्या कलाकारांना उभे करून, नाटकाचा प्रयोग ताकदीने रंगवू शकतो. आता असे नवे कलाकार आयत्यावेळी त्याच्या नाटकात एन्ट्री घेत भूमिका कशी काय निभावून नेतात, हे त्या कलाकारांना व संतोष पवारलाच माहीत…! वास्तविक, ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटकाच्या तालमीपासून संतोषला ‘स्लिपडिस्क’चा त्रास होत होता. ‘आराम केला नाही, तर ऑपरेशन करावे लागेल’, असे त्याला डॉक्टरांनी सांगितले होते. पण त्याला प्रयोगही रद्द करायचे नव्हते. मग या नाटकातल्या कलाकारांना तो त्याच्या घरी बोलवायचा आणि स्वतः चक्क झोपून त्यांच्या तालमी घ्यायचा. अशा या हरहुन्नरी रंगकर्मीवर रंगदेवता प्रसन्न राहणार नाही तर काय…!

या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटक गाठत असलेला ४०० व्या प्रयोगाचा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे. या निमित्ताने संतोष पवारला बोलते केले असता तो सांगतो, “कुठल्याही रंगकर्मीसाठी त्याच्या नाटकाचे जितके प्रयोग होतील तितके कमीच असतात. आता ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटक करताना, आम्ही आधी केलेल्या ‘यदा कदाचित’ नाटकाचे दडपण होते. कारण ज्यांनी आधी ते नाटक पाहिले आहे, त्यांना ‘रिटर्न्स’ किती भावेल असा प्रश्न होता. आमच्या दोन्ही नाटकांच्या प्रयोगांच्या बाबतीत तुलना होऊ शकत असल्याने जरा धाकधूक होती. आमचे ‘रिटर्न्स’ रसिकांना आवडेल याची खात्री होतीच; पण तुलना होताना नक्की काय होईल, याची काळजी वाटत होती. मात्र ‘यदा कदाचित रिटर्न्स’चे प्रयोग सुरू झाले आणि आम्हाला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत गेला. कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर आमच्या नाटकाचे १७४ प्रयोग झाले होते आणि कोरोनामुळे नाटक थांबले. कोरोना संपल्यानंतर आम्ही पुन्हा नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आता संयुक्त अशा ४०० प्रयोगांचा टप्पा गाठत आहोत, याचा आनंद आणि समाधान आहे”.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -