फिरता फिरता – मेघना साने
गेली पंधरा वर्षे केवळ स्त्री कलाकारांना घेऊन प्रायोगिक नाटके रंगमंचावर सादर करणाऱ्या ‘प्रारंभ कला अकादमी’च्या संस्थापिका, संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांची केवळ स्त्रियांची अशी प्रायोगिक नाटके दिग्दर्शित करण्याबद्दल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. हा सगळा प्रवास खडतर होता. तो मी अरुंधतीकडूनच जाणून घेतला.
‘प्रारंभ कला अकादमी’ची स्थापना २००२ मधे झाली. सुरुवातीच्या काळात डॉ. अरुंधती बालनाट्ये बसवत होती. त्यानंतर स्त्री कलाकारांना घेऊन प्रायोगिक नाटके बसविण्यासाठी तिने ‘प्रारंभ कला अकादमी’तर्फे अभिनय प्रशिक्षण वर्ग उघडला. ती स्वतः नाट्यशास्त्र घेऊन Ph. D. झाली होती. त्यामुळे नवख्या स्त्री कलाकारांना प्रशिक्षण देणे तिला सहज शक्य होते आणि मग घरातील कामांना वाहून घेतलेल्या गृहिणी आपली नाटकाची हौस पुरविण्यासाठी या प्रशिक्षण वर्गात येऊ लागल्या. चार-सहा महिने शिकून सावरून रंगमंचावर आत्मविश्वासाने उभ्या राहू लागल्या. ‘प्रारंभ कला अकादमी’तर्फे डॉ. अरुंधतीने स्त्रियांच्या वीस-बावीस नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.
हे शिवधनुष्य पेलणे वाटले तितके सोपे नव्हते. यासाठी केवळ नाट्यशास्त्राची पदवी असणे पुरेसे नव्हते. निरनिराळ्या वयाच्या आणि स्वभावाच्या बायकांना सांभाळणे आणि शिकवणे यासाठी मोठीच कसरत करावी लागत होती. व्यावसायिक नाट्यक्षेत्रातील स्त्री कलाकार आणि प्रायोगिक नाटकात हौसेखातर आलेली गृहिणी यात मुख्य फरक हा असतो की, व्यावसायिक नाट्यक्षेत्रातील स्त्री कलाकार कोणत्याही अडचणी, प्रसंग, सण समारंभ घरात असेल तरी प्रयोगाला दिलेल्या तारखांना आणि वेळेलाच प्राधान्य देतात. तालमीच्या तारखाही त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. तालीम हीच नाटकाचा कणा असते हे त्या जाणून असतात. पण हौशी रंगमंचावर काम करायला आलेल्या स्त्रियांना घरच्या गोष्टींना प्राधान्य द्यायची सवय झालेली असते. आज पाहुणे आले आहेत, गावाहून सासू आली आहे, शेजारच्यांच्या लग्नात हळदीला जायचे आहे अशा कारणांसाठी त्या तालीम चुकवू शकतात. कित्येकदा नाटक उभे राहिल्यावरही कलाकार सोडून गेल्याने अरुंधतीला बदली कलाकार शोधावी लागली. ‘दिग्दर्शन करताना दर वर्षी माझी पेशन्स वाढत होती’ असे अरुंधती सांगते.
‘प्रारंभ’चे पहिले नाटक ‘पाहुणा येता मंडळात’ हे सुरेखा शहा यांची संकल्पना असलेले नाटक अरुंधतीने विकसित केले आणि दिग्दर्शित केले. ते विनोदी आणि मनोरंजक होते. सर्व स्त्री कलाकारांनी अतिशय मेहनत केली, सहकार्य दिले आणि ते यशस्वी केले. पुढे ‘प्रारंभ’तर्फे सामाजिक आशयाची प्रायोगिक नाटके करण्यासाठी तशी नाटके तिने आपल्या मित्रमैत्रिणींकडून लिहून घेतली. नाटकातून ‘प्रारंभ कला अकादमी’ काहीतरी संदेश देत असते अशी संस्थेची प्रसिद्धी झाली. ‘ये गं ये गं सरी’ हे नाटक अभिराम भडकमकर यांनी लिहून दिले. दिग्दर्शन डॉ. अरुंधती भालेराव आणि नेपथ्य नितीन गवळी, रंगभूषा दीपक लाडेकर आणि अभय शिंदे अशी छान टीम तयार झाली. दोनच स्त्री कलाकारांचे हे नाटक प्रेक्षकांना निःशब्द करून गेले. मात्र या दोन स्त्री कलाकारांनी पुढे नाटक हे करिअर म्हणून निवडले नाही. त्या वेगवेगळ्या वाटांनी गेल्या.
प्रचंड प्रापंचिक तडजोडी करून तालमींना येणाऱ्या प्रत्येक नवख्या स्त्री कलाकाराला प्रमुख भूमिका म्हणजे नायिकेची भूमिका मिळावी असे वाटणे साहजिक होते. पण ते शक्य नव्हते. ‘आम्ही तेहेतीस टक्के’ हे नाटक ‘प्रारंभ’ने करायचे ठरवले तेव्हा या नाटकाच्या दिग्दर्शनाची मुख्य जबाबदारी आशुतोष भालेराव यांनी घेतली होती तर अरुंधती सहदिग्दर्शक होती. नाटकाचे लेखन संभाजीनगरचे राजशेखर कुलकर्णी यांनी केले होते. या नाटकात तर अरुंधतीने चॅलेंजच घेतले होते. एकाच प्रवेशात राणी लक्ष्मीबाई, साववित्रीबाई, इंदिरा गांधी, जिजाबाई, पूतना, शूर्पणखा, सोनिया गांधी, सरोजिनी नायडू, शोले सिनेमाचे स्त्रीलिंग म्हणून शोली, गब्बरची केलेली गबरी, ठाकूरची केलेली ठाकूराई, सांबाची केलेली मिसेस सांबा अशी पलटण होती. प्रत्येकीला वैशिष्ट्यपूर्ण पात्र मिळाल्याच्या आनंदात बायकांनी खूप मेहनत केली आणि प्रयोग छान झाला.
‘प्रारंभ कला अकादमी’च्या प्रायोगिक नाटकांचा स्तर दरवर्षी उंचावत होता. हळूहळू नाटकाच्या संहितेबाबत, प्रयोगाबाबत स्त्री कलाकार गंभीरपणे विचार करायला शिकल्या. कोणतीही भूमिका असो, त्याचे आव्हान स्वीकारून मेहनत करू लागल्या. ‘मृत्योर्मा’ सारखे अवघड नाटक तीन महिला कलाकारांनी पेलले आणि मेहनतीने यशस्वी करून दाखवले.
‘प्रारंभ कला अकादमी’ने ‘आम्ही जिंकलो हरता हरता’ हा कॅन्सरवर आधारित कार्यक्रम कँसर पेशंट्सना धीर देण्यासाठी आणि कँसरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी निर्माण केला. त्यात कॅन्सरशी झुंज देणारी आणि क्षीण होत चाललेली वनिता नावाची अरुंधतीची एक मैत्रीण काम करत होती. तिला अखेरचे रंगमंचावर बसायचे होते. रंगमंदिराच्या पायऱ्या चढण्याची ताकद नसतानाही ती कुणाच्या तरी मदतीने वर आली. प्रयोगात काम करताना टाळ्याही घेतल्या आणि मग एक्झिट घेतली. तो तिचा शेवटचा प्रयोग. पण तिने दाखवून दिलं की कलेची झिंग चढल्यावर महिला इतक्या कणखर होऊ शकतात की मृत्यूलाही त्या रोखून धरू शकतात. अशा अनेकविध नाटकांमधून ‘प्रारंभ कला अकादमी’ने गेल्या पंधरा वर्षांत अनेक कलाकार घडवले.
डॉ. अरुंधती भालेराव यांनी अभिनेत्री होण्याचे स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवत अनेक हौशी महिलांना कलाकार म्हणून उभे राहण्याचे बळ दिले. गृहिणींमधील आत्मविश्वास जागा केला. कलाकार म्हणून काम करण्याची त्यांची सुप्त इच्छा पूर्ण केली. रंगमंचावर प्रयोग यशस्वीपणे साकार झाल्यावर कलाकारांच्या डोळ्यांत चमकणारे आनंदाश्रू पाहणे यातच अरुंधतीचा आनंद सामावला आहे!