रवींद्र तांबे
सन २०२५ या नवीन वर्षाचा आज चौथा दिवस आहे. नवीन वर्ष सुरू झाले की प्रत्येकजण जीवनात यशवंत होण्यासाठी नवीन संकल्प करीत असतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात परीक्षा महत्त्वाची असते. त्या आनुषंगाने अभ्यास सुद्धा महत्त्वाचा असतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना आपल्या परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासाचा संकल्प केला पाहिजे. यातच त्यांचे परीक्षेतील यश अवलंबून असते. नवीन वर्ष सुरू झाले की प्रत्येकजण आपला संकल्प करीत असतात. त्यासाठी तो मागील वर्षाच्या चुका सुधारून पुन्हा तशा चुका होणार नाहीत याची काळजी घेत नवीन संकल्प सुरू करीत असतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी नवा संकल्प करावा लागतो. त्यासाठी आपले उद्दिष्ट ठरवून डोळ्यांसमोर ठेवावे लागते. प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असले तरी विद्यार्थ्यांचे मुख्य उद्दिष्ट आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे हे असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. एक दिवस किंवा परीक्षेच्या आदल्या रात्री रात्रभर अभ्यास केला म्हणजे आपल्याला चांगले गुण मिळतील असे नाही. शेवटी आत्मविश्वासाने व प्रसन्न वातावरणामध्ये तीन तास पेपर अचूक सोडवावा लागणार आहे. याची तयारी झाली का? याचे उत्तर विद्यार्थ्यांनी आता शोधत बसण्यापेक्षा जे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करीत वेळ वाया न घालविता अभ्यासाचा संकल्प करावा. यातच त्यांचे भवितव्य आहे.
मागील वर्षाला गुड बाय म्हणत असताना अभ्यासक्रम सुद्धा शिकवून पूर्ण झाला असेल. तेव्हा नवीन वर्षाला वेलकम म्हणत वेळ घालविण्यापेक्षा आतापर्यंतची अभ्यासातली प्रगती लक्षात घेऊन वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील त्याचा संकल्प करावा. आता हीच वेळ आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
त्यासाठी आतापासून परीक्षा होईपर्यंत आपले आरोग्य सांभाळून वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा. म्हणजे वेळेचे नियोजन जरी केले तरी दिवसातील किती तास अभ्यास करणार आहोत त्याचा संकल्प विद्यार्थ्यांना करावा लागेल. यातच त्यांचे यश अवलंबून आहे. त्यासाठी आपली परीक्षेसाठी तयारी किती झाली याचे उत्तर त्यांनी स्वत:ला प्रामाणिकपणे द्यावे. हीच यशाची पायरी आहे. नवीन वर्षाची सुरुवात करीत असताना विद्यार्थ्यांनी इतर संकल्प बाजूला सारून आपल्या भवितव्यासाठी आपले विषय व त्या विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करून अभ्यासाचा संकल्प करावा. त्यासाठी परीक्षा होईपर्यंत मित्र, नातेवाईक व सखा मित्र बनलेला मोबाईल यांना दूर ठेवून अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे लिखाणाची सुद्धा नियमित सवय ठेवावी. परीक्षा संपल्यावर पाहुणचार करावा मात्र आता परीक्षा होईपर्यंत पाहुणचाराचा विचार करू नये. काही विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सुरू झाले की आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे हा संकल्प डोळ्यांसमोर ठेवून नियमित अभ्यास करीत असतात. त्यामुळे ते परीक्षेला हसत हसत सामोरे जावून विशेष श्रेणीत पास होतात. आलीकडे तर १०० टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण होऊ लागले आहेत. तसेच शाळांचा सुद्धा १०० टक्के निकाल लागतो. यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून संकल्प केला जातो. तसेच हे यश संकल्पामुळेच शक्य होते. तेव्हा जीवनात यश संपादन करायचे असेल तर मनापासून संकल्प हा अतिशय महत्त्वाचा असतो. जीवनात संकल्पाशिवाय यश संपादन करू शकत नाही. त्यासाठी जिद्द अतिशय महत्त्वाची असते.
आता विद्यार्थ्यांनी मागील वर्षातील चुका उजळत बसण्यापेक्षा त्या बाजूला सारून अंतिम परीक्षेची तयारी कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून संकल्प करावा. तेव्हा विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेतील आपली प्रगती लक्षात घेऊन अभ्यासाला लागावे. ते सुद्धा परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे सोने करण्यासाठी अभ्यासाचा संकल्प करावा. त्यासाठी वेळेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रत्येक दिवसाचे नियोजन करून त्याप्रकारे विषयांचे वेळापत्रक तयार करावे लागेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तेव्हा प्रत्येक विषयाची परीक्षा कधी आणि मध्ये सुट्टी किती दिवस आहे याचा अंदाज घेऊन अभ्यासाला लागावे.महत्त्वाची बाब म्हणजे आता वेळ कमी आहे. अभ्यास अभ्यासक्रमानुसार करावा. त्यानंतर आपली किती तयारी झाली याचा सुद्धा विद्यार्थ्यांनीच विचार केला पाहिजे. आता अवांतर वाचनाकडे जास्त लक्ष देऊ नये याची खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी. तसेच घरातील टीव्हीपासून चार हात दूर राहावे. पालकांनी सुद्धा मुलांचे भवितव्य ओळखून आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मुलांच्या परीक्षा होईपर्यंत विशेष कार्यक्रमांपासून दूर राहावे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलांच्या जेवणामध्ये बदल करू नये. परीक्षा कालावधीत त्याला जे आवडते तेच जेवण द्यावे. शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. तेव्हा नवीन वर्षाचा आज ४ था दिवस आहे. आता विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून जीवनात चांगले यश संपादन करण्यासाठी आजपासून परीक्षा संपेपर्यंत आपल्या मनातील ताण तणावावर मात करत अभ्यासाचा संकल्प करायला हवा. हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे.