अमरावती : इयत्ता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गामध्ये बसविले जाणार आहे. सदर दोन वर्गातील नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलले जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्ह्याचा शिक्षण विभाग कामात लागला असून अप्रगत विद्यार्थ्यांची माहिती केंद्र व तालुकास्तरावरून मागविली आहे.एखादा विद्यार्थी समोरच्या वर्गात जाण्यासाठीचे वेळोवेळी निश्चित करण्यात आलेले आवश्यक निकष पूर्ण करण्यास असमर्थक ठरल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी आणखी अभ्यास करावा, दोन महिन्यात फेर परीक्षा घ्यावी. मात्र, फेर परीक्षेतही विद्यार्थ्याला आवश्यक गुण मिळविण्यात अपयश आल्यास त्याला पाचवी किंवा आठवीच्या वर्गातच बसविण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसल्यानंतर वर्गशिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्याला नेमके काय समजले नाही, हे विविध मूल्यांकनाद्वारे समजून घेऊन त्याला जादा शिकवावे. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला काढता येणार नाही, असे नव्या आदेशात नमूद केले आहे. शासकीय तसेच खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील काही विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिहिता व वाचता येत नाही.जिल्ह्यात इंग्रजी विषयात शाळांमधील बरेचसे विद्यार्थी कच्चे असल्याची माहिती आहे. अशा विद्यार्थ्यांच्या जादा तासिका घ्यावे लागणार आहे.शहर व ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना गणितीय आकडेमोड, समीकरण लवकर कळत नाही, परिणामी ते यात कच्चे आहेत.पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत एखादा विद्यार्थी नापास झाल्यास त्याला दुसऱ्या वर्षी त्याच वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे शिक्षकाला अधिक लक्ष द्यावे लागेल.
शिक्षण आयुक्तालयाने मागवली आकडेवारी
राज्याच्या शिक्षण आयुक्तालयाने अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या अपग्रत विद्यार्थ्यांबाबतची माहिती जिल्हास्तरावरून मागितली आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही माहिती आयुक्तालयाला १०० टक्के पोहोचणार आहे.