मुंबई : चवदार, लुसलुशीत जिलबी खायला सर्वांनाच आवडते. अशीच एक लज्जतदार जिलबी (Jilabi) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रसाद ओक (Prasad Oak), शिवानी सुर्वे (Shivani Surve) मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्याचबरोबर मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे (Parna Pethe) आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
‘जिलबी’ चित्रपटात पर्ण एका मुस्लिम मुलीची भूमिका साकारणार आहे. मुस्लिम मुलीचे नाव रुबिना असे असून यामध्ये रुबिना अत्यंत कणखर आणि धाडसी मुलगी आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पर्ण सांगते, ‘मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळेपण असेल, तर ते करायला आवडतं’. चांगल्या विषयामुळे मी या चित्रपटाला होकार दिला. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘जिलबी’ चित्रपटातील माझ्या या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास पर्ण व्यक्त करते. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, ‘जिलबी’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल, असे पर्णने सांगितले.
दरम्यान, येत्या १७ जानेवारी रोजी ‘जिलबी’ सर्वांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका ‘जिलबी’ चित्रपटात आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले असून चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.