बिहारच्या पश्चिमी चंपारण परिसरातील घटना
पाटणा : रेल्वे रूळांवर बसून मोबाईलमध्ये पबजी गेम खेळणे ३ मुलांना चांगलेच महागात पडले आहे. ही मुले गेम खेळण्यात मग्न असल्यामुळे रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंज ते मुझफ्फरपूर रेल्वे सेक्शनवर ही घटना घडली.
बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील गुमटी येथील फुरकान आलम, बारी टोला येथील समीर आलम आणि हबीबुल्ला अन्सारी ही मुले रेल्वे रुळांवर बसून पबजी खेळत होते. ते खेळण्यात इतके गुंग झाले की, त्यांना ट्रेनचा आवाज देखील ऐकू आला नाही. त्यामुळे रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पीडित कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी तिघांचेही मृतदेह घरी नेले आहेत. अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे आणि नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे हा अपघात झाला हे शोधण्यासाठी काम करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक दीप आणि रेल्वे पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरू केला आहे. यासंदर्भात माहिती देताना एसडीपीओ विवेक दीप यांनी सांगितले की, “आम्ही शवविच्छेदनासाठी मृतदेह बाहेर काढण्यासाठी संवाद प्रस्थापित करत आहोत. अपघाताची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही पीडितांच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
प्राथमिक रेल्वे रुळावर बसून ते मोबाईलवर गेम खेळत असल्याचे तपासात उघड झाले आहे.या घटनेमुळे असुरक्षित वातावरणात, विशेषतः रेल्वे रुळांवर मोबाइल गेम खेळण्याच्या धोक्यांबाबतही चिंता निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी पालकांना त्यांच्या मुलांच्या गेमिंग सवयींबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन केल्याचे विवेक दीप यांनी सांगितले.