Monday, February 17, 2025
HomeदेशPM Modi : अण्णा हजारेंना पुढे करून काही लोकांनी दिल्लीतील लोकांना संकटात...

PM Modi : अण्णा हजारेंना पुढे करून काही लोकांनी दिल्लीतील लोकांना संकटात ढकलले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुंकले आपविरोधात प्रचाराचे रणशिंग

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी अर्थात आप ही आपत्ती आहे. ती सहन करणार नाही आणि दिल्लीतील परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार दिल्लीतील मतदारांनी केला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपविरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेईमान लोक म्हणत मोदींनी वार केला. अण्णा हजारेंना पुढे करून काही लोकांनी दिल्लीतील लोकांना संकटात ढकलले, असे ते म्हणाले.

दिल्लीतील अशोक विहार येथे झोपडपट्टी धारकांना घरांचे वाटप करण्यात आले. १६७५ झोपडपट्टीधारकांना फ्लॅटच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल आणि आप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मद्य परवाना प्रकरणात घोटाळा, मुलांच्या शाळेत घोटाळा, गरिबांच्या उपचारात भ्रष्टाचार, प्रदूषणाविरोधात लढण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार, नोकर भरतीत भ्रष्टाचार. हे लोक दिल्लीच्या विकासाच्या गोष्टी करत होते. पण, हे लोक, आप आपत्तीच्या रुपात दिल्लीवर तुटून पडली आहे.

गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर

पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवत आप सरकारला लक्ष्य केले. हे लोक इथे भ्रष्टाचार करतात. आणि त्याचे समर्थनही करतात. चोर तर चोर वर शिरजोर! आप ही आपत्ती दिल्लीवर आलेली आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी आपत्तीविरोधात लढाईचे रणशिंग फुंकलं आहे. दिल्लीतील मतदारांनी दिल्लीला आपत्तीतून (आप) मुक्त करण्याचा निर्धार केला आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

दिल्लीतील प्रत्येक नागरिक म्हणतोय, दिल्लीतील प्रत्येक मुलं म्हणतेय, दिल्लीतील प्रत्येक गल्लीतून आवाज येतोय की आपत्ती सहन करणार नाही, बदलल्याशिवाय राहणार नाही. आपत्ती सहन करणार नाही, बदलल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

मोदी विरुद्ध केजरीवाल असा थेट सामना होण्याची शक्यता

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. तर पुढील महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, दिल्लीत विविध विकासाकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. तर काँग्रेस पक्ष राजधानीत म्हणावा तेवढा मजबूत नाही. त्याबरोबरच काँग्रेसकडे दिल्लीतील स्थानिक प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.

‘आप’ नव्हे ‘आपदा’ (आपत्ती), प्रचाराची लाईन ठरली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमात आपविरोधात प्रचाराची लाईन निश्चित केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘आप’ नव्हे ‘आपदा’ (आपत्ती) असे मोदींनी म्हटले. त्याचबरोबर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपविरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा हा भाजपच्या प्रामुख्याने अजेंड्यावर असेल, असे संकेतही या सभेतून दिले. शुक्रवारी दिल्ली भाजपने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘दिल्ली चली मोदी के साथ’. तसेच या अगोदरही पक्षाने ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावर लढण्याचे संकेत दिले होते. आता हे संकेत खरे ठरत असून भाजप ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहऱ्यावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -