Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडी…तर चौकाचौकात मराठी माणूस मार खाईल, मुंब्र्यातील ‘त्या’ प्रकारावरून मनसेची आगपाखड!

…तर चौकाचौकात मराठी माणूस मार खाईल, मुंब्र्यातील ‘त्या’ प्रकारावरून मनसेची आगपाखड!

ठाणे : काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका इमारतीत सुरू झालेला किरकोळ वाद पुढे मराठी-अमराठी वादापर्यंत पोहोचला होता. त्यात एका अमराठी व्यक्तीकडून मराठी व्यक्तीला मारहाण झाल्याची चर्चा होती. आता मुंब्र्यात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Mumbra Marathi Language Controversy) झाला आहे. या प्रकरणात एका तरुणाने फळविक्रेत्याला “मराठीत बोला” असे सांगितल्यामुळे त्याला धमकावण्यात आले आणि सार्वजनिक माफी मागायला लावण्यात आले आहे. यावरून आता मनसेने गंभीर शब्दांत इशारा दिला आहे.

ही घटना मुंब्र्यातील कौसा भागात गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता घडली. २१ वर्षीय तरुण फळ खरेदी करत असताना फळविक्रेत्याशी हिंदीत संवाद होऊ लागला. त्यावर तरुणाने “मराठीत बोला” असे म्हटल्यावर वाद वाढला. फळविक्रेत्याने इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले, आणि जमलेल्या गर्दीने तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले.

या घटनेचा व्हिडिओ गर्दीतील एका व्यक्तीने रेकॉर्ड करून व्हायरल केला. नंतर त्याच जमावातील एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला बोलावून चौकशी केली.

चौकशी दरम्यान तरुणाने माध्यमांना सांगितले की, “मला धमकावले गेले. त्यांनी मला शिवीगाळ केली. मी म्हटलं शिव्या देऊ नका. तर त्यानंतर मला म्हणाले माफी माग. मी माफीही मागितली. पण मला नंतर पोलीस स्टेशनमध्ये चार तास बसवून ठेवलं. माझ्या आईलाही स्टेशनबाहेर बसवून ठेवलं. माझी आई घाबरली आहे. पुढच्या वेळी मुंब्र्याला आल्यानंतर मला काही झालं तर काय अशी भीती आम्हाला वाटते आहे. त्यांच्यातल्याच एकानं माझ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे”, अशी प्रतिक्रिया सदर तरुणानं दिली आहे.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात ३ ठार तर तीनजण गंभीर जखमी

दरम्यान, या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गेल्या काही दिवसांत मराठी माणसाच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. मुंब्र्यातली ही घटना दुर्दैवी आहे. मराठी भाषेवरून वाद झाल्यानंतर तिथे काही मुसलमान मुलं जमली. त्यांनी व्हिडीओही रेकॉर्ड केला. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही असं म्हणतात आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात? यांची एवढी हिंमत कशी होते?” असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.

“असंच घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व संकटात येईल. कल्याण, ठाणे, विरार, मुंबईत घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर दिवसेंदिवस यांच्यातली हिंमत मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचं दिसतंय. मुंब्र्यातल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि तिथे घोषणाबाजी केली. हे करायची काय गरज होती? तो मराठीत बोला सांगतोय यावरून तुम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करणार?”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

“यानंतर महाराष्ट्रात पुढे भाषिक वाद सुरू झाला, तर कुणी त्यावर बोलू नये. भविष्यात हे हल्ले वाढतील. यांना आत्ताच ठेचलं नाही, तर भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल. माझी मराठी माणसाला विनंती असेल की वेळेवरच एकत्र या. नाहीतर जोपर्यंत तुम्हाला कुणी फटके मारत नाही तोपर्यंत तुम्ही लांबून बघत राहणार असाल, कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल. त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

“मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रात राहून मराठी बोलायचे नसेल, तर ही मानसिकता बदलायला हवी. अशा घटनांना वेळीच रोखले नाही तर भविष्यात मराठी माणसाला मोठा त्रास होऊ शकतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठी-अमराठी वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. या घटनेने भाषिक अस्मितेचा मुद्दा आणि त्यावरील राजकीय प्रतिक्रिया आता चर्चेत येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -