अयोध्या येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाच्या बालक रामललाच्या मूर्तिची गेल्यावर्षी अर्थात पौष शुक्ल द्वादशी म्हणजे २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा विधिवत झाल्यानंतर आता त्या सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हापासून तर सतत अयोध्या आणि नवपुर्ननिर्मित राममंदिर याबाबतची चर्चा सर्वप्रकारच्या माध्यमातून होत आहे आणि वाचनातही येत आहे. पूर्वी होत नव्हती का तर असे नाही परंतु अलीकडे ती जरा जास्तच होत आहे आणि त्याला राजकीय नजरेतून पाहिले जात आहे. आज येथे त्रेता युगातील कथा-कहाण्या सांगण्याची आवश्यकता नाही कारण हिंदूच्या धार्मिक पूजास्थळांवर परकीय शत्रू अर्थातच मुस्लीमांनी देवीदेवतांचा अपमान करुन देवस्थान नष्ट केलीत आणि असे प्रकार हजारोंनी घडलेली आहेत.
प्रमोद मुजुमदार
मागील इतिहासाकडे पाहता प्रामुख्याने अयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान ते समूळ नष्ट करून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली आणि श्रीरामाचे जन्मस्थान परत मिळावे यासाठी देशव्यापी प्रचंड आंदोलन झाले, रस्त्यावर संघर्ष करण्यात आला, तर दुसरीकडे न्यायालयातही दाद मागण्यासाठी कायदेशीर लढाही लढला गेला आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये ही संघर्षाची एक महत्त्वपूर्ण नोंद झाली. आश्चर्य असे की कायदेशीर लढ्यामध्ये श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत प्रश्रचिन्ह ही निर्माण करण्यात आले होते आणि असा प्रश्र निर्माण करणारे तत्कालीन काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल हे होते. हे आपल्या हिंदू समाजाचे दुर्दैवं. एकीकडे कायदेशीर मार्गाने न्यायालयात तर दुसरीकडे रस्त्यावर हिंदू समाजातील सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, भाषा, आपापले भेदाभेद विसरून संघटितपणे जन्मभूमीसाठी संघर्षरत होते. वेळोवेळी तत्कालीन केंद्र आणि राज्य सरकारांचे लक्ष वेधण्यासाठी विरोध प्रदर्शन, रामरथ यात्रा, एकात्मता यात्रा, अयोध्येमध्ये कारसेवा व जेल भरो आंदोलन असे विविध मार्गाने आंदोलने करण्यात आली होती आणि यात अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनात विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षासह अन्य समविचारी संस्था-संघटनांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग होता हे वेगळे सांगण्याची काही आवश्यकता नाही. न्यायालयामध्ये कायदेशीर लढाईचे शेवटी सर्वोच्च न्यायालयात जवळपास ४० दिवस दररोज नियमित सुनावणी होऊन अखेर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी अर्थात रामललाच्या बाजूने आपला निकाल दिला.
न्यायालयाच्या निकालाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अयोध्येमध्ये मंदिर बांधण्यासाठी एक न्यास ट्रस्ट स्थापित केला. गेल्या २२ जानेवारी २०२४ रोजी रामजन्मभूमीवर पुनर्निमित मंदिरामध्ये रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत संपन्न झाली. मंदिराच्या परकोटा परिसरामध्ये एकूण १८ मंदिरे बांधली जात आहे. यामध्ये दशावतार, शेषावतार, निषादराज, शबरी, अहिल्या, संत तुलसीदास, शिव, सर्य, मां दुर्गा, अन्नपूर्णा, श्रीगणेश, हनुमान आदींच्या मंदिराचा समावेश आहे. मंदिर निर्माण समितीचे प्रमुख नृपेन मिश्र यांचेनुसार हा मंदिर प्रकल्प जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल. या जन्मभूमी मुक्ती आंदोलनामध्ये प्रत्येक हिंदूंचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग होता आणि प्रत्येक कामात उत्साहाने भाग घेतला, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. यामागे निश्चितच प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर भव्य मंदिराचे पुनर्निर्माण आणि त्यासाठी गेले सुमारे ५०० वर्षांहून अधिक काळापासूनचा जो संघर्ष आणि नंतर विशेषत्वाने स्वतंत्र भारतामध्ये आपल्याच हिंदू समाजातील एका अर्थाने काँग्रेस पक्षाच्या श्रीराम विरोधी मानसिकतेच्या विरोधात आणि न्यायालयात कायदेशीर लढा द्यावा लागला, हे एक दुर्दैव; परंतु यासाठी संघाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या आहवालानुसार गेल्यावर्षी २०२४ मध्ये देशव्यापी गृहसंपर्क अभियान राबविले होते, यामध्ये सर्व प्रातांच्या ५ लाख ७८ हजार ७७८ गावे, ४७२७ नगरांतील एकूण १९९,८४,९०७१ परिवारापर्यंत संपर्क साधला गेला आणि यामध्ये संघ स्वयंसेवकांसह ४४ लाख ९८ हजार ३३४ कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता. याबरोबर अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या दिवशी २२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण देशभर जवळपास ५ लाख ५९ हजार २३१ ठिकाणी ९ लाख ८५ हजार ६२५ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमामध्ये २७ कोटी ८१ लाख ५४ हजार ६६५ रामभक्त श्रद्धाळू प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
अयोध्येमध्ये राम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा समारोहामुळे देशभर एकूण वातावरण राममय झाले होते असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही आणि यावेळी हिंदू समाजाने आपल्या एकजूट, संघटन शक्तीचा परिचय संपूर्ण देशवासीयांना करून दिला आहे. ही संघटित शक्ती प्रभू श्रीरामाच्या प्रेरणेमुळेच आहे. हिंदू समाज आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा मुकाबला जसा सामूहिक संघटित शक्तीद्वारे करतो तर दुसरीकडे तो समाजातील अनिष्ठ प्रथा, जातीय भेदाभेद, दूर करण्यासाठी रचनात्मक कार्यामध्ये दीन दलित, पीडित, शोषित, वंचिताचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी, अन्य समाज घटकांबरोबर आणण्यासाठीदेखील हिंदू समाज सक्रिय भूमिका निभावत आहे, असे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. ‘संघटन में शक्ति है’ याची प्रचिती दिसून येते. अयोध्या येथे तर गेल्यावर्षी प्राणप्रतिष्ठा समारोहाचे प्रसंगी पूर्ण नगरामध्ये घरोघरी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी मंदिरात, मठामध्ये, धर्मशाळा, येणाऱ्या भाविकांसाठी भोजन, चहा-नाश्ता आदींची व्यवस्था केली होती. यामध्ये स्थानिक जैन, बौद्ध, शीख बांधवांचा तितकाच सिंहाचा वाटा होता. राम मंदिर निर्मितीसोबत आता संपूर्ण अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसराचा सर्वांगीण विकास आणि त्यासंबंधी विविध प्रकल्प उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने हाती घेतलेले आहेत आणि यात प्रमुख सडक मार्गाचे रुंदीकरणासोबतच सुशोभीकरण, साफसफाई स्वच्छता तसेच रेल्वे मार्ग आणि गाड्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.
अयोध्येचे अत्याधुनिक रेल्वेस्टेशन आहे. येथे नवीन विमानतळ बांधण्यात आले असून त्याला महर्षी वाल्मिकी अांतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. अयोध्या विमानतळ हे देशभरातील प्रमुख मोठ्या महानगरांशी जोडले गेले. २०२५ मध्ये प्रयागराजला महाकुंभ असल्याने वाराणसी व अयोध्या येथे येणाऱ्या तीर्थयात्रेकरूंची ही संख्या निश्चितच वाढणार आहे. येथे येणाऱ्या भाविक दर्शनार्थींच्या सोयी-सुविधांसाठी तीर्थक्षेत्र ट्स्ट्रने अनेक आवश्यक सोई केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांसाठी व्हीलचेअरची निःशुल्क सोय केली आहे. तसेच आपले मौल्यवान किमती सामान सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरची सोय केली आहे. शिवाय ताबडतोब गरज भासली आणि कुणा भाविक दर्शनार्थीची प्रकृतती जर बिघडली तर येथे अपोलो हॉस्पिटल आणि तीर्थक्षेत्र ट्स्ट्रच्या पुढाकाराने एक आपात्कालीन हॉस्पिटल ही सुसज्जित करण्यात आले आहे. तीर्थयात्री आणि पर्यटकांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेता आता हॉटेल, गेस्ट हाऊसचे नवीन बांधकामही मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे आणि यात पंचतारांकित हॉटेलचाही समावेश आहे. सोबत टॅक्सी व्यवसायही वाढत आहे आणि परिणामतः राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जीएसटीच्या रूपाने अतिरिक्त कमाई होऊ लागली आहे ही एक महत्त्वपूर्ण उल्लेखनीय बाब म्हटली पाहिजे.
मंदिरासाठी दररोज मातीचे दिवे किंवा पणती यासाठी आजूबाजूच्या परिसरातील कुंभारांना भरपूर मोठ्या प्रमाणावर काम मिळाले तसेच प्रसाद, फुले यांचा व्यापारही वाढला आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानदारांची रोजची विक्रीही वाढली आहे आणि यात प्रामुख्याने श्रीरामाची मूर्ती ही मागणी फारच आहे. पूर्वी मंदिराचे मॉडेल अधिक विक्री होत असे आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीरामाची मूर्ती जास्त संख्येत विक्री होत आहे. एकूण दुकानदाराचा माल विकला जातो आणि त्या माध्यमातून शासनाला जीएसटीही मिळतो. येणाऱ्या काळांत अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला आले की, मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी झालेल्या संघर्षाची ही आठवण सतत होत राहीलच पण त्यासोबत आता या नव्या योगी-मोदी युगामध्ये अयोध्येचा सर्वांगीण विकास, प्रगती, कायापालट हा देखील प्रत्यक्ष अनुभवता येईल, एवढे मात्र निश्चित!