Friday, June 13, 2025

MHADA : म्हाडाची १० घुसखोरांना घरे खाली करण्याची नोटीस

मुंबई : लॉटरीत न विक्री झालेल्या म्हाडाच्या मानखुर्द येथील ३४ घरांमध्ये घुसखोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने कारवाई करीत १० जणांना तत्काळ सदनिका खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. सदनिका खाली न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे बजावले आहे.




MHADA

उर्वरित २४ घुसखोरांनी म्हाडाच्या कारवाईविरोधात अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागितली आहे. त्यामुळे पुढे काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. म्हाडाने २०१८मध्ये घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लाॅटरीत मानखुर्द येथील घरांचा समावेश केला होता; मात्र ३४ घरांची विक्री न झाल्याने ती पडून होती. कोरोना काळात या घरांमध्ये घुसखोरी झाली. त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करीत म्हाडाच्या सक्षम प्राधिकृत अधिकारी-२ यांनी संबंधितांना घरे खाली करण्याचे निर्देश देतानाच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली होती; मात्र ३४ पैकी २४ घुसखोरांनी सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागितली आहे. त्यानुसार आता सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर त्यावर सुनावणी होणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, इतर १० घुसखोरांवर कारवाई अटळ असल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment