Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल - मुख्यमंत्री

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल - मुख्यमंत्री

मुंबई : थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल ठरला आहे. राज्यातील विदेशी गुंतवणुकीच्या वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा देशात अग्रेसर असून आता तो थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत त्यांनी ट्विटच्या माधम्यातून माहिती दिली आहे.


फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला असून कर्नाटक दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यातील विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी पाहिल्यास २०२०-२१ : १,१९,७३४ कोटी, २०२१-२२ : १,१४,९६४ कोटी, २०२२-२३ : १,१८,४२२ कोटी, २०२३-२४ : १,२५,१०१ कोटी आणि २०२४-२५ (एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात) : १,१३,२३६ कोटी.


देशातील परकीय गुंतवणुकीची २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरपर्यंतच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये सरासरी एक लाख १९ हजार ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.औद्योगिक आघाडीवरील राज्याची घोडदौड पुढेही कायम राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.


राज्यातील उद्योगधंदे परराज्यात जात असल्यावरून महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.


ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटलं की, महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के एफडीआय अवघ्या ६ महिन्यांत”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली तर १,१९,५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो… माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.

Comments
Add Comment