सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सिडनी कसोटी सामन्यात अखेरच्या षटकात एक नाट्यपूर्ण प्रसंग घडला. जसप्रीत बुमराह शेवटच्या षटकासाठी सज्ज होत होता. तो चेंडू टाकण्यासाठी जाणार तोच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टास याने क्षुल्लक मुद्यावरून बुमराहशी वाद उकरून काढला. या वादात थोड्याच वेळात उस्मान ख्वाजा सहभागी झाला. ख्वाजा आणि बुमराह यांच्यातील वाद वाढणार तोच पंचांनी हस्तक्षेप केला. पंचांनी हस्तक्षेप करताच त्यांचा मान राखत बुमराह तातडीने गोलंदाजीसाठी रवाना झाला. यानंतर जसप्रीत बुमराहने टाकलेल्या चेंडूवर उस्मान ख्वाजा झेलबाद झाला. तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलकडे झेल देऊन परतला. ख्वाजा दहा चेंडू खेळून आणि दोन धावा करून तंबूत परतला. उस्मान ख्वाजा बाद होताच भारतीय खेळाडूंनी आनंदोत्सव सुरू केला. बुमराहशी वाद उकरुन काढणाऱ्या कॉन्स्टासचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Fiery scenes in the final over at the SCG!
How’s that for a finish to Day One 👀#AUSvIND pic.twitter.com/BAAjrFKvnQ
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2025
गरज नसताना सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद उकरून काढला. काही वेळा हे अनावश्यक वाद लाभदायी ठरतात तर काही वेळा हानीकारक ठरतात. यावेळी कॉन्स्टासने घातलेल्या वादामुळे भारताचा फायदा झाला आणि ऑस्ट्रेलियाचे नुकसान झाले.
वादामुळे खेळावर लक्ष केंद्रीत करणे अनेक खेळाडूंना कठीण होते. यामुळेच एखादा जम बसलेला खेळाडू बाद व्हावा अथवा वेळ वाया घालवणे शक्य व्हावे यासाठी अनेकदा प्रतिस्पर्धी वाद उकरून काढतात. या प्रकारात वाद सुरू करणारा स्वतःच्या फायद्याचा विचार करून प्रतिस्पर्ध्याची हानी करण्याचा प्रयत्न करतो. सिडनी कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपत आला होता. अखेरचे षटक टाकण्यासाठी कर्णधार बुमराहने चेंडू हाती घेचला होता. बुमराह सारख्या तगड्या गोलंदाजाने कोणाला बाद करू नये यासाठी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाने केला. पण त्यांचा प्रयत्न अपयशी झाला. बुमराहने गोलंदाजी केल आणि ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज बाद झाला.