Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमूलभूत बचत बँक खाते

मूलभूत बचत बँक खाते

नेहमीप्रमाणे आजही बरोबर ८च्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्याची वर्दी मिळाली. आज मावशींची स्वारी भलतीच खूश दिसत होती. हातातील पेढ्यांचा पुडा माझ्याकडे देत मुलीला दहावीच्या परीक्षेत ९३% मार्क मिळाल्याचे त्यांनी मला सांगितले. मावशींच्या कष्टांचे आणि त्यांच्या मुलीच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान वाटले. मावशी स्वयंपाक आटपून घरी जाताना मी त्यांच्या मुलीसाठी बक्षीस म्हणून पैसे पाकिटात घालून दिले. इतर कुठे खर्च न होता तिच्या शिक्षणासाठी त्याचा विनियोग व्हावा ह्या हेतूने, तिच्या नावे बँकेत खाते उघडून त्यात ते पैसे ठेवण्याचा सल्ला दिला. तेव्हा बँकेतील बचत खात्यात घातलेले सगळे पैसे काढता येत नाहीत. त्या खात्यात ठरावीक पैसे शिल्लक ठेवावेच लागतात, असे त्यांच्या मुलीचे म्हणणे त्यांनी मला सांगितले.

समाजातील अल्प उत्पन्न गटातील लोकांनाही किमान सामान्य अत्यावश्यक बँक सेवांचा लाभ घेता यावा यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने १७ ऑगस्ट २०१२ रोजी मूलभूत बचत बँक खात्याच्या घोषित केलेल्या योजनेबद्दल मी त्यांना माहिती दिली. याला शून्य शिल्लक बचत खाते असेही म्हणतात. मूलभूत बचत बँक ठेव खात्यात किमान शिल्लक आवश्यक नाही. खात्यात शिल्लक असले तर त्या रकमेवर ठरावीक दराने व्याज मात्र मिळते. परिणामी, शून्य शिल्लक बाबतीत कोणताही दंड आकारला जात नाही हेच या प्रकारचे खाते उघडताना ग्राहकांसाठी मुख्य आकर्षण ठरू शकते. या प्रकारचे खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रारंभिक ठेवीची आवश्यकता नसते. यासाठी वयाची वा किमान उत्पन्नाची अट नाही. कोणतीही निवासी व्यक्ती व हिंदू अविभक्त कुटुंबे मूलभूत बचत बँक खाते उघडण्यास पात्र असतात.

प्रत्येक प्रकारच्या बँक खात्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे विशिष्ट नियम व अटी लागू असतात. बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव खाते, डिमॅट खाते किंवा एनआरआय खाते अशा विविध प्रकारची कितीही बँक खाती ग्राहक आपल्या गरजेनुसार कुठल्याही आणि कितीही बँकांमध्ये उघडू शकतात. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, ग्राहक मूलभूत बचत खाते मात्र एकापेक्षा जास्त उघडू शकत नाही. केवळ एकच मूलभूत बचत खाते ग्राहक, कोणत्याही एकाच बँकेत उघडू शकतो. मूलभूत बचत खात्यासाठी अर्ज करताना, तुमचे इतर कोणत्याही बँकेत मूलभूत बचत खाते नाही असे एक घोषणा पत्र तुम्हाला बँकेला द्यावे लागते. त्या बँकेत ग्राहकाचे इतर कुठल्याही प्रकारचे खाते नसणे अनिवार्य आहे. दुसरे कुठल्याही प्रकारचे खाते असल्यास, मूलभूत बचत खाते उघडलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत, ते बंद करणे अनिवार्य आहे. असे केले नाही तर ती इतर खाती बंद करण्याचा अधिकार बँकेला असतो. ग्राहकांनी लेखी संमती दिल्यास ग्राहकांच्या विनंतीवरून सामान्य बचत बँक खात्याचे मूलभूत बचत खात्यामध्ये रूपांतरण केले जाऊ शकते. अशावेळी मूलभूत बचत खात्यामध्ये उपलब्ध असलेल्या सेवांची वैशिष्ट्ये आणि व्याप्ती बँकेने ग्राहकांना सूचित करणे आवश्यक असते. मूलभूत बचत खात्यांमध्ये तुम्ही दरमहा होणाऱ्या व्यवहारांवर मर्यादा असते. सहसा, बँका प्रत्येक महिन्यात फक्त चार वेळा पैसे काढण्याची परवानगी देतात. तुम्ही परवानगी दिलेल्या संख्येपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास, बँक तुमचे शून्य शिल्लक खाते नियमित बचत खात्यात रूपांतरित करू शकते. ग्राहकांना पूर्वसूचना देऊन या अतिरिक्त व्यवहारांसाठी काही बँका नाममात्र शुल्क देखील आकारू शकतात. तसेच या खात्यात एका वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येत नाही किंवा खात्यात कधीही पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम शिल्लक ठेवता येत नाही. सदर खात्यातून एका महिन्यात रुपये १०००० पेक्षा जास्त रोख रक्कम काढता आणि इतर खात्यांत हस्तांतरण करता येत नाही.

मूलभूत बचत खात्यांमध्ये ठेवी आणि रोख रक्कम काढणे, विविध नेटबँकिंग सुविधांद्वारे पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे किंवा बँक शाखांमध्ये चेक जमा करणे तसेच एटीएमच्या माध्यमातून पैसे मिळवणे ह्या मोफत सेवा समाविष्ट आहेत. मूलभूत बचत खाते उघडताना एटीएम डेबिट कार्डवर कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जात नाही. एटीएम डेबिट कार्ड घेणे ऐच्छिक असते. एखाद्या ग्राहकाने एटीएम डेबिट कार्ड स्वीकारलेच पाहिजे अशी सक्ती बँक करू शकत नाही. मात्र, जर ग्राहकांनी एटीएम डेबिट कार्ड निवडले, तर बँकांनी अशा ग्राहकांना एटीएम डेबिट कार्ड, एटीएम पिन आणि त्याच्याशी संबंधित जोखीम याबद्दल शिक्षित करणे आवश्यक आहे. आपल्या इतर ग्राहकांना एटीएम डेबिट कार्ड आणि पिनच्या वितरणासाठी अवलंब करत असलेल्या प्रक्रियेचाच अवलंब करून सुरक्षित वितरण वाहिन्यांद्वारे मूलभूत बचत खातेधारकांना ही सुविधा प्रदान करणे अनिवार्य आहे. ग्राहक या खात्याचे बँक स्टेटमेंट तपासू शकतो. संगणक किंवा फोनवरून वीज, फोन आणि पाणी बिलही भरू शकतो. मूलभूत बचत खात्यासंबंधी सविस्तर माहिती देऊन जवळच्या बँकेत मुलीच्या व मावशींच्या नावे मूलभूत बचत खाते उघडण्याविषयी मावशींना मी सुचवले. त्यामुळे मुलीच्या पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद करता येईल. मूलभूत बचत खात्याची उपयुक्तता व महत्त्व आमच्या मावशीपर्यंत पोहोचले. आपल्या आजूबाजूच्या आपल्याला मदत करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती अनेक महत्त्वाच्या उपयुक्त माहितीविषयी अनभिज्ञ असतात. त्यांना सुजाण, सजग, सक्षम ग्राहक बनवण्याचा प्रयत्न करू या. किंबहुना आपण नवीन वर्षाचा हा आपला संकल्प बनवू शकतो.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -