राजेश जाधव
शिर्डी : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या अंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत दोन ते अडीच कोटी भाविक वर्षाकाठी साई दर्शनासाठी हजेरी लावत असतात. हजारोंच्या संख्येने दररोज येणाऱ्या साई भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच व्हीआयपी च्या दौऱ्याने नेहमीच सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण असतो. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल तसेच पोलीस विभाग व साईबाबा संस्थान कायम व कंत्राटी कर्मचारी अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.
आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त तीर्थक्षेत्र असल्याने या मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेकरिता राज्य शासनाने यापूर्वी विशेष आदेश काढून पोलीस उपाधीक्षक दर्जाचा अधिकारी संस्थान सुरक्षा व्यवस्थेचा प्रमुख म्हणून नियुक्त केला होता. साई समाधी शताब्दी वर्षात आनंद भोईटे हे डी.वाय एस.पी. दर्जाचे अधिकारी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे इन्चार्ज म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेचा डोलारा साधा पीएसआय अर्थात पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी सांभाळत आहे.
यापूर्वी साईबाबा संस्थान प्रशासनाचा कार्यभार बघण्याकरिता प्रांताधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त होते.परंतु त्यानंतर शासनाने साईबाबा संस्थानचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा थेट आयएएस अधिकारी असावा असा निर्णय घेतला आणि या ठिकाणी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झालेली आहे. जागतिक कीर्ती देवस्थानच्या सुरक्षितेचा कारभार डी वाय एस पी दर्जाच्या अधिकारीकडे असणे गरजेचे असल्याचा अभिप्राय शासनाला गेल्याने शासनाकडे प्रलंबित आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे अधिकारी व कर्मचारी मिळून इतकी ७४ संख्या आहे. पोलिसांची १९०, साईबाबा संस्थानच्या सेवेत कायम २७० व कंत्राटी कर्मचारी ६००,क्यू.आर.टी जवान ९, डॉग स्कॉड असे मिळून एकूण एक हजाराच्या आसपास कर्मचारी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा विभाग प्रमुख अर्थात साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाची जबाबदारी सध्या पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी सांभाळत आहे.
साईबाबा संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा कारभार हाताळायला पीएसआय दर्जाचा अधिकाऱ्याचे काम नव्हे, याठिकाणी आयपीएस अधिकारी असावा, यासाठी मी २००८ मध्ये द्वारकामाईसमोर उपोषण केले होते. अप्पर जिल्हाधिकारी प्रमाणे साई मंदिर सुरक्षेसाठी अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. – संजय काळे (सामाजिक कार्यकर्ते )