प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
स्व आई-बाबांकडून आम्हांला कलेचा आणि अध्यात्माचा वारसा मिळाला आहे. त्यात वडीलबंधू प्रा. मोहन (Life Coach) यांनी सर्वांगीण शिक्षण दिले. पुढे चित्रकार बंधू साईनाथ यांनी मार्गदर्शनासह ‘ज्ञानेश्वरी’ दिली. हे सर्व भाग्ययोग आहेत. त्यातून मनाची बैठक बनत गेली. या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानेश्वरी’तून काय मिळाले? खरे सांगायचे, तर काय मिळाले नाही!
सर्वप्रथम माझी स्वेच्छानिवृत्ती संपन्न केली, सुखद केली. तीस वर्षे रॉयल महाविद्यालयात शिकवल्यानंतर निवृत्ती घेतली; पण विद्यार्थ्यांची आठवण व्याकूळ करीत असे. अशा वेळी आधार मिळाला ‘माऊलीं’चा! नित्यनेमाने रोज ‘ज्ञानेश्वरी’चे वाचन तास-दोन तास सुरू झालं. ते दीड वर्षं चाललं. हे केवळ वाचन नव्हतं. मला वाटे, माऊली माझी जणू पाठशाळाच आहेत. ते शिकवतात, मी माझ्या परीने शिकते आहे. हे शिक्षण कसलं? सर्वप्रथम साहित्याचं, कवितेचं. ज्ञानेश्वरीच्या वाचनाने मला लयीचं भान येऊ लागलं. पूर्वी मी लिहिलेल्या कविता लयीच्या दृष्टीने तपासू लागले. माझ्या लेखनात एक नाद येऊ लागला.
दुसरीकडे निसर्गाशी, भोवतालाशी सजगतेने संवाद सुरू झाला. संवेदना उत्कट झाल्या. स्वयंपाकघरातील साधा फोडणीचा गंध तीव्रतेने जाणवू लागला. बाहरेची वाऱ्याची झुळूक आत स्पर्श करणारी झाली. फुलांचे, झाडांचे इतकंच नव्हे, तर माणसांचे गंधही मनात उतरू लागले. माणसांतील सकारात्मक / नकारात्मक ऊर्जा उमगू लागली. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ने माणसांचं वाचनही शिकवलं.
त्याचबरोबर ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना आनंदाच्या ऊर्मी कागदावर झिरपत गेल्या. बघता बघता ती लेखमाला झाली. त्यातून ‘प्रहार’च्या डॉ. सुकृत खांडेकर यांच्यामुळे साप्ताहिक सदर सुरू झाले. त्यांच्या प्रोत्साहनासाठी मी त्यांची आणि ‘प्रहार’ परिवाराची ऋणी आहे. या सदराला आता दोन वर्षे पूर्ण झाली. १०४ लेख झाले. ही लेखमाला होत असताना एक नियम होता. ‘ज्ञानेश्वरी’ला नमस्कार करून त्यातील ओव्या आणि अर्थ पाहायचा. त्याचा भावार्थ, सूचित अर्थ जमेल तसा लिहीत जायचा. बाहेरचे संदर्भ, ग्रंथ वापरायचे नाहीत शक्यतो. त्यामुळे प्रवासात कधी अडायला व्हायचं. मग फोन करून प्रा. जोशी यांचं मार्गदर्शन; पण शक्यतो स्वतःचं डोकं वापरायचं. ही प्रक्रिया जणू माझ्या बुद्धीला धार देणारी ठरली. सुतार रंधा मारतो, त्याप्रमाणे भावार्थ उलगडताना मेंदूला रंधा मारला जातो आहे असं वाटायचं. गमतीने मी म्हणते, माझ्या मेंदूवर थोड्या सुरकुत्या पडल्या असतील ‘ज्ञानदेवी’च्या अभ्यासाने!
या बुद्धीचा उपयोग सर्वत्र होऊ लागला. साहित्यात, लेखनात, भाषणात. एरवी व्यवहारात, दैनंदिन काम करताना वेळ वाचवून सुटसुटीतपणे काम करण्याचं तंत्र उलगडू लागलं. लेखन-प्रक्रियेने हस्ताक्षर सुधारलं. ‘अक्षरात सुधारणा म्हणजे व्यक्तिमत्त्वात सुधारणा’ (इति वडीलबंधू मोहन सर) स्वच्छ, नेटकं लिहिण्यातून विचार प्रक्रियाही सरळ, स्वच्छ! माणसांकडे पाहण्याचा एक सहानुभाव मनात जागला. संकटात सापडलेल्या माणसांना प्रत्यक्ष मदत प्रत्येक वेळी करता आली नाही, तरी जमेल तशी प्रार्थना होऊ लागली. हा दयाभाव मनात जागला जागतो आहे तो ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘गीते’मुळेच! या साऱ्याचा अर्थ, मी सद्गुणी झाले का? नाही, अजूनही खूप उणिवा, दोष आहेत. मोठा पल्ला गाठायचा आहे. पण परिवर्तन-यात्रा सुरू झाली आहे एवढं नक्की! यासाठी आई, वडील, वडीलबंधू, सर्व गुरू, श्रीनिवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा माऊलींना त्रिवार वंदन! त्यांचं हे ऋण अपार आणि अनंत…
manisharaorane196 @ gmail.com