शिर्डी : शिर्डी एअरपोर्ट (Shirdi airport) येथे उडाण योजनेसह काही दिवसातच नाईट लँडींग विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येणार असुन देशांतर्गत व अंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सहकार, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी केली.
दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी गुरुवारी धूपारतीपूर्वी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, माजी नगरसेवक ताराचंद कोते, जगन्नाथ गोंदकर, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
PM Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा
साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले की, नवीन वर्षाच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आलो आहे. शिर्डीत नेहमीच मी येत असतो. साईबाबांच्या शिर्डीत वर्षाकाठी देशभरातून सव्वा दोन कोटी भाविक हजेरी लावत असतात. त्या अनुषंगाने शिर्डी विमानतळ २४ तास सुरू राहावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेंटून शिर्डी एअरपोर्ट बाबतच्या अडचणी सोडवण्याबाबत विनंती केली होती. गृहमंत्री अमित शहा यांनी चार दिवसांपुर्वी शिर्डी एअरपोर्टसाठी सीआयएसएफचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे.
शिर्डी विमानतळावर नाईट लँडींग बाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दुर करून पंधरा दिवसात शिर्डीतून विमानांची नाईट लँडींग व टेकअप सुरू करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना विमानसेवा जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
शिर्डी विमानतळाचा थकीत साडेआठ कोटी रुपयांच्या कराबद्दल त्यांनी सांगितले की, याबाबत माझ्याकडे माहिती आल्यास काकडी ग्रामपंचायतिला देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. येत्या ६ जानेवारीला मुंबईत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमावेत मुख्यमंत्री फडणवीस व आपल्या उपस्थित शिर्डीसह राज्य भरातील विमानतळाच्या अडचणी दुर करण्यासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे मोहळ यांनी जाहीर केले.
सध्या देशात सहाशे मार्ग उड्डाण अंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. देशातील सामान्य माणसाला विमानप्रवास करण्यासाठी मोदी सरकारने १० वर्षात देशात विमानतळांची संख्या ७५ वरुन १५७ वर नेली असुन विमानतळावर स्वस्त दरात भाविकांना भोजन नाश्ता देण्याची योजना कोलकत्ता विनानतळापासुन सुरू केली आहे. त्याची व्याप्ती देशातील इतर विमानतळांवर वाढवणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.