विलास खानोलकर
नूतन वर्षी भक्ताच्या स्वप्नात स्वामी आले नमस्कार करूनच भक्ताने स्वामींना विचारले नाम कसे घ्यावे? हे सर्व वाचल्यानंतर आपणही नाम घ्यावे व भगवंताची व आत्मानंदाची प्राप्ती करून घ्यावी, असा विचार काही वाचकांच्या मनात येण्याची दाट शक्यता आहे. अर्थात असा केवळ विचार मनात येणे, हा देखील पूर्व पुण्याईचाच भाग म्हणावा लागेल; कारण, नाम घेण्याची बुद्धी सर्वांनाच होत नाही. ज्याला आपल्याकडे ओढून घ्यायची भगवंताची इच्छा असते, त्यालाच त्याचे नाम घेण्याची इच्छा होते. जे परमेश्वराची निवड करतात (त्याच्याकडे ओढले जातात), त्यांची निवड परमेश्वरानेच केलेली असते). अर्थात, यासाठी काही पात्रता निर्माण करणे आवश्यक असते. शुद्ध आचार, विचार आणि आहार यांचा अवलंब केल्यास हळूहळू मन व हृदय शुद्ध होत जाते आणि मग परमेश्वराची प्रीतीही आपोआप संपादन होते. भक्ताने पुन्हा विचारले स्वामी सांगा आता नाम कसे, किती व कोठे घ्यावे? त्यासाठी आसन व माला कोणती वापरावी? त्याची पथ्ये कोणती आहेत?
स्वामींनी नामजपाचे पुढील तीन प्रकार सांगितले : ते वाचिक, उपांशू आणि मानसिक आहेत. ते म्हणतात, ज्याचे उच्चारण स्पष्ट ऐकू येते, तो वाचिक जप होय. तर ज्या नामजपाच्या वेळी ओठ हलतात; परंतु तो जप फक्त जपकर्त्यालाच ऐकू येतो, तो म्हणजे उपांशू जप होय. आणि ओठ आणि जिव्हा न हलविता, अंतर्मनाच्याद्वारे जो जप केला जातो तो मानसिक जप होय. ‘मानसिक जप हाच सर्वश्रेष्ठ जप होय. ज्याच्यात तमोगुणाचे प्राबल्य विशेष असेल, त्याने वाचिक जप करावा; रजोगुण आणि सत्त्वगुण एकत्र असल्यास, उपांशू जप करावा; परंतु सत्वगुण सर्वांत अधिक असेल व वृत्ती ‘अंतर्मुख असेल, अशांनी मानसिक जपच करावा.’ याचाच अर्थ, वाचिक, उपांशू आणि मानसिक हे प्रगतीचे एका पुढील एक टप्पे आहेत; म्हणूनच साधकाने सुरुवातीला काही दिवस वाचिक जपच करावा. त्यायोगे वास्तुशुद्धीही होईल. तसेच, वाचिक जपापासून सुरुवात करण्याचे दुसरे कारण असे की, एकदम मानसिक जपाने सुरुवात केल्यास, कदाचित जपाबरोबर इष्टदैवताकडे मन एकाग्र करणे, शक्य होणार नाही; कारण साधनेच्या सुरुवातीच्या अवस्थेत, मनाची सैरभैर धावण्याकडेच प्रवृत्ती असते. अशा उच्छृंखल मनाला, सर्व शक्तीनिशी इष्टदैवताकडे खेचून स्थिर करणे, सुरुवातीला काही दिवस जमत नाही. अशा मनाला थोडी ध्यान-धारणेची सवय लावून, मगच हळूहळू अंतर्मुख करावे लागते.
यासाठीच साधकाने प्रारंभीच्या काळात एकदम मानसिक जपाला सुरुवात न करता, वाचिक जपानेच प्रारंभ करावा हे बरे ! त्यानंतर थोडे दिवस उलटल्यावर, त्याने वाचिक जप बंद करून उपांशू जप सुरू करावा. उपांशू जप उत्तम प्रकारे जमू लागून मन इष्टदैवताकडे काही काळ तरी एकाग्र होऊ लागले की, आपला सत्त्वगुण वाढीस लागला आहे असे समजण्यास हरकत नाही. याचवेळी शुद्ध आचार, विचार व आहार यांचे बंधन स्वतःवर घालून घ्यावे व सत्संगत करावी. आध्यात्मिक ग्रंथांचे नियमित वाचन करावे. रोज मंदिरात जाऊन इष्टदैवताचे मनोभावे दर्शन घ्यावे. यायोगे मनाची सत्त्वप्रवृत्ती वाढीस लागून, मन अधिकाधिक शुद्ध बनू लागेल व उपासनेला वेग प्राप्त होईल. अस्वस्थ मन हळूहळू स्थिर व शांत बनू लागेल व नामाशिवाय चैन पडेनासे होईल. यालाच स्वामी नामात गोडी प्राप्त होणे असे म्हणता येईल. महाराज म्हणतात, ‘नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यामध्ये आपणच आपली गोडी घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यामध्ये घालू, तितके ते अधिक गोड वाटेल.’ नामामध्ये अशा प्रकारची गोडी वाटू लागली की, नाम हळूहळू मुरत चालले आहे असे समजावयास हरकत नाही. या टप्प्यानंतर पुढे उपांशू जपाच्या ऐवजी, साधकाने मानसिक जप करावयास हरकत नाही. स्वामी समर्थ। हा जप सर्वश्रेष्ठ आहे. तेथेच सर्व सुख, आनंद, मनशांती आहे.