संतोष वायंगणकर
सिंधुदुर्गात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ शकतात. याची कोणी कल्पनाही केली नव्हती. गेल्या २७ वर्षात कोकणात अनेक पर्यटन स्थळ विकसित झाली. जगाच्या पर्यटन नकाशावर त्यांची स्वत:ची एक नवी ओळख घेऊन उभी आहेत. १ फेब्रुवारी १९९९ रोजी खा. नारायण राणे फक्त आठ महिन्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु या आठ महिन्यात सिंधुदुर्गात तर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी हजारो कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला. रस्ते, नळपाणी योजना, विज जोडणी अशी अनेक काम त्यातून उभी झाली.
जगामध्ये सध्या पर्यटन व्यवसायाला फार मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. जगभरातील अनेक देशांनी पर्यटन व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करत त्या-त्या देशांनी आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत बनवली आहे. यासाठी राज्य आणि देशपातळीवरील जो प्रांत, जे राज्य पर्यटन व्यवसायातून आर्थिक समृद्धी आणू शकते त्या भागाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते. गोवा राज्याच्या बाजूला असणारा कोकणप्रांतदेखील पर्यटन व्यवसायाला मोठा वाव असणारा भाग आहे; परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने कोकणातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न आणि पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे, ती पायाभूत उभारणी आजही कागदावरच आहे. ३० एप्रिल १९९७ साली तत्कालीन महसूलमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान खासदार नारायण राणे यांची आग्रही भूमिका आणि मागणीमुळे सावंतवाडीत तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री स्व. गोपिनाथ मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुस्थानातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित
करण्यात आला.
सिंधुदुर्गात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ शकतात. याची कोणी कल्पनाही केली नव्हती. गेल्या २७ वर्षांत कोकणात अनेक पर्यटन स्थळ विकसित झाली. जगाच्या पर्यटन नकाशावर त्यांची स्वत:ची एक नवी ओळख घेऊन उभी आहेत. १ फेब्रुवारी १९९९ रोजी खा.नारायण राणे फक्त आठ महिन्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले; परंतु या आठ महिन्यांत सिंधुदुर्गात तर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी हजारो कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. रस्ते, नळपाणी योजना, वीज जोडणी अशी अनेक कामे त्यातून उभी झाली; परंतु २००० साली महाराष्ट्रात सत्तापालट झाला आणि मुख्यमंत्रीपदावर विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री पदावर आ. छगन भुजबळ होते. विशेष म्हणजे तेव्हा पर्यटन मंत्रालय आ.छगन भुजबळ यांच्याकडे होते. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यासाठी स्थापन झालेल सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळ रद्द करून कोकण सागरी विकास महामंडळाचा जन्म झाला; परंतु दुर्दैवाने आ.छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातून सागरी विकास मंडळाची फाईल कधी बाहेरच आली नाही.
२००२ साली रत्नागिरीत कॅबिनेटची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला; परंतु फक्त कागदावरच्या या प्रगतीच्या टप्याने प्रत्यक्षात एक पाऊलही पुढे सरकले नाही. यामुळे कोकणातील पर्यटनाला विद्यमान खा. नारायण राणे यांनी त्यावेळी जे प्रयत्न केले, जी दिशा दिली त्यानंतर मात्र फक्त विरोधाचं राजकारण होतं राहिलं. विरोध करून निवडून येता येतं हे राणे विरोधकांना कळलं. त्यामुळे शिरोडा-वेळागर, ताज ग्रृपचा पंचतारांकित हॉटेल प्रकल्प, मिठबाव येथील ओबेरॉय ग्रृपचा पंचतारांकित हॉटेल प्रकल्प हे सगळ पुढे काही होऊ शकला नाही. याच एकमेव कारण म्हणजे स्वार्थी राजकारणातून होणारा विरोध. शेतकऱ्यांबद्दल विरोध करणाऱ्यांपैकी कोणाला काहीही देणं-घेणं नव्हतं. अगदी अलीकडेही वेळागरला स्टंटबाजी करणार आंदोलन केलं गेलं. या सगळ्यात कोकणातील पर्यटनाचंच नुकसान करण्यात आलं आहे. सी वर्ल्डसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोकणात होऊ शकला नाही. त्या सी वर्ल्डसाठीही भू-संपादनासाठी त्यावेळी खा. नारायण राणे यांच्याच प्रयत्नातून तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी १०० कोटींची आर्थिक तरतूद केली होती; परंतु राजकीय विरोधाने तोही प्रकल्प थांबला. कोकणाच दुर्दैव असं आहे जेव्हा राजकीय इच्छाशक्ती सत्तास्थानावर असते तेव्हा विरोधक डोकं वर काढत प्रकल्प होऊ देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कोकणच्या पर्यटन विकासाला प्रचंड मोठा वाव आहे. मात्र, त्यासाठी सरकार पातळीवरची प्रशासनातील अधिकाऱ्यांची सकारात्मकता पर्यटन मंत्र्यांनी कोकण समजून घेत पर्यटन विकासासाठी करावयाचे प्रयत्न या सर्व गोष्टी घडून यायला पाहिजेत.
आजवर दुर्दैवाने पर्यटन मंत्रालय कोकणाबाहेरील मंत्र्यांना मिळालं. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाचा जो मास्टर प्लॅन तयार करून पर्यटन विकासातून महाराष्ट्राच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग याच कोकणातील पर्यटनातून जातोय हे एकदा महाराष्ट्रात सत्तास्थानावर असणाऱ्यांना समजावून सांगावं लागेल. आज सुदैवाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहा वजनदार मंत्री आहेत. मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, मंत्री आशीष शेलार, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, मंत्री राज्यमंत्री योगेश कदम असे मंत्री या मंत्रिमंडळात आहेत. कोकणातील पर्यटन पुरक उद्योग व्यवसायांची उभारणी करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आता कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतेय; परंतु पर्यटनस्थळ विकसित करावी लागतील. पर्यटनस्थळांवर सोयी-सुविधा निर्माण करून द्याव्या लागतील यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राजकीय इच्छाशक्ती बरोबर जनतेची सकारात्मक मानसिकता तितकी महत्त्वाची ठरणारी आहे. कोकणातील जनतेनेही कोकणातील विकासासाठी आग्रही राहिलेच पाहिजे. आज देवबाग-तारकर्लीसारखी पर्यटनस्थळ शोधत जगभरातील पर्यटक येतात. त्या पर्यटकांनी कोकणातील इतर पर्यटनस्थळांवर त्यांनी जावं, पुन्हा-पुन्हा कोकणात यावं अशी पर्यटकांना समाधान वाटणारी व आनंद देणारी मानसिकता आपणच जपली पाहिजे तरच हे सर्व बदल घडतील असे वाटते.