Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीBangladeshi : बांगलादेशी नागरिक महाड पर्यंत पोहोचले? औद्योगिक वसाहतीमध्ये तपासणी सुरू

Bangladeshi : बांगलादेशी नागरिक महाड पर्यंत पोहोचले? औद्योगिक वसाहतीमध्ये तपासणी सुरू

कारखानदार व नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन!

महाड : देशात सध्या सुरू असलेल्या बांगलादेशातील नागरिकांच्या (Bangladeshi) संदिग्ध रहिवासाबद्दल रायगड जिल्ह्यात पनवेल परिसरात मागील चार दिवसात आढळून आलेल्या नागरिकांच्या बातम्या ताज्या असतानाच हे नागरिक महाड पर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात महाड औद्योगिक परिसरामध्ये पोलिसांकडून तातडीने तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख जीवन माने यांनी दैनिक प्रहारशी बोलताना दिली.

दरम्यान महाड मधील कारखानदारांनी तसेच नागरिकांनी आपल्या येथे नोकरीला ठेवताना अथवा जागा भाड्याने देताना सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील एमआयडीसी पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.

देशातील सद्यस्थिती लक्षात घेता रायगड जिल्ह्यात बेकायदेशीर पद्धतीने आलेल्या बांगलादेशी नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील चार दिवसात पनवेल परिसरामध्ये या संदर्भात काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे.

मंजुरी मिळून १४ वर्षे झाली तरीही रस्ता कागदावरच; पालीत वाहतूक कोंडीचे विघ्न कायम

या पार्श्वभूमीवर महाड परिसरातील बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबतची माहिती जाणून घेतली असता एमआयडीसी पोलीस ठाण्यात यापूर्वीच संबंधित कारखाने व परिसरातील गावांमधून असलेल्या परप्रांतीयांची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मागील काही दिवसापासून महाड औद्योगिक वसाहती मधील सर्व कारखान्यांना आपल्या येथे असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना गावात राहणाऱ्या परप्रांतीयांसंदर्भात सविस्तर माहिती देण्याबाबतची सूचना करण्यात आल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख जीवनमाने यांनी स्पष्ट करून यानुसार आतापर्यंत १८ ते १९ कारखानदारांकडून आपल्या येथील कामगारांची सविस्तर माहिती देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

महाड औद्योगिक वसाहत मागील चार दशकांपासून सुरू असून या ठिकाणी दहा ते पंधरा हजार परप्रांतीय कामगार नोकरी व्यवसाय या निमित्ताने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळेच प्रामुख्याने सिव्हिल, वेल्डिंग तसेच भंगार विक्रेते व सफाई कामगार म्हणून या बांगलादेशी नागरिकांनी सध्या विविध ठिकाणी आपली कामे सुरू केली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर तपास सुरू असून येत्या काही दिवसातच याबाबतची अंतिम माहिती प्राप्त होईल, असे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

महाड औद्योगिक वसाहत परिसरातील ग्रामीण भागात नागरिकांकडून देण्यात आणि येणाऱ्या भाड्याच्या खोल्यांबाबत कोणतेही करार केले जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून संबंधितांबरोबर केला जाणारा करार हा कायदेशीररित्या योग्य कागदपत्रांच्या आधारे असणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

गेल्या पंधरा दिवसात एमआयडीसी मध्ये झालेल्या दोन मारहाणीच्या घटनेमध्ये कामगारांकडून प्राप्त झालेल्या आधार कार्डवर टोपण नावे असल्याचे दिसून आल्याची त्यांनी सांगितले.

यामुळेच संबंधितांचे मूळ नाव, त्यांची बँकेसंदर्भातील कागदपत्रे यांची पडताळणी करूनच संबंधितांना नोकरीवर ठेवताना अथवा जागा भाड्याने देताना कारखानदार व जमीन मालकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परिसरात सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये प्राधान्याने फळ विक्रेते तसेच सिव्हिल व वेल्डिंग क्षेत्रामध्ये सहाय्यक कामगार म्हणून काम करणाऱ्यांमध्ये या नागरिकांचा समावेश असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

महाड एमआयडीसीसह तालुक्यात देखील विविध ठिकाणी या संदर्भात तपासणी मोहीम येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल असे संकेत देऊन तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या परप्रांतीयांसंदर्भात विशेष करून बांगलादेशी नागरिकांसंदर्भात काही माहिती प्राप्त झाल्यास ती तातडीने पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करावी असे सुचित केले.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आढळून आलेल्या बांगलादेशी नागरिकांनंतर आता हे लोन महाड पर्यंत पोहोचल्याचे शक्यता वर्तविण्यात आल्याने महाड मधील विविध व्यवसायात असलेल्या परप्रांतीयांसंदर्भात नागरिकांमधून अधिक जागरूकता बाळगणे गरजेचे असल्याचे दिसून आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -