ठाणे : थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. असे आवाहन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असुन गतवर्षीच्या तुलनेत तळीराम चालकांच्या संख्येत घट झाली असली तरी नववर्षाच्या पुर्वसंध्येला ३११ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. २६ ते ३१ डिसेंबरपर्यंत ६०२ जणांवर कारवाई केली असुन गतवर्षी या कालावधीत एकुण १०४० जणांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलीस आयुक्तालय (ठाणे ते बदलापुर आणि भिवंडी) क्षेत्रात वाहतूक पोलिसांनी ८५ ठिकाणी नाकेबंदी केली होती. या नाकेबंदीच्या सापळ्यात तब्बल ३११ मद्यपी चालक सापडले. तर ५८ सहप्रवाश्यावरही कारवाई केली आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. यात ३११ मद्यपी चालक तावडीत सापडले. यामध्ये ठाणे ते दिवा १२०, भिवंडी ६०, डोंबिवली- कल्याण ७० आणि उल्हासनगर ते बदलापूरमध्ये ६१ मद्यपीं चालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतुक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.