आयुक्त प्रियंका शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेवर भर
पुणे (वार्ताहर) : पुणे विभागातून अनेक महत्त्वाच्या गाड्या धावतात. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या जास्त आहे. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर आला होता. विशेषत: रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची छेड काढण्याचे प्रकार वारंवार घडत होते. यामुळे महिला प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून ‘तेजस्विनी पथका’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल व एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना सुरक्षेची कवच मिळाली आहे.
गेल्या वर्षी तेजस्विनी पथक सुरू करण्यात आले होते. परंतु काही काळानंतर बंद करण्यात आली होती. त्यामुळे महिला प्रवाशांना अडचणी येत होत्या. नवे रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांनी पुन्हा तेजस्विनी पथक सुरू केला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने या पथकाकडे केवळ प्रवासी महिलाच नव्हे, तर मुलांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी सोपविली आहे.
या पथकात सहायक उपनिरीक्षक आणि दोन महिला कर्मचारी आणि एक पुरुष कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तेजस्विनी पथकांकडून दररोज दैनंदिन लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेविषयक अडचणी जाणून घेण्यात येत आहेत. महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. याबाबत महिला प्रवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
व्हॉट्सॲपद्वारे मदत
तेजस्विनी पथकाने एक व्हॉट्सॲप समूह तयार केला आहे. या समूहात महिला प्रवाशांना जोडण्यात येत आहे. महिलांना मदतीसाठी या समूहाच्या माध्यमातून संपर्क साधता येतो. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा दलही या समूहाच्या मदतीने महिला प्रवाशांशी संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सूचना देत आहे.
लोकलमध्ये तेजस्विनी पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकातून महिला प्रवाशांमध्ये जागृती केली जाणार आहे. हे पथक सर्व लोकलमध्ये असणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची अडचणी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न आहे.
-प्रियंका शर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे विभाग