जयपूर: राजस्थानच्या अलवर येथील कोटपुतली येथे बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षाच्या चेतनाला अखेर दहाव्या दिवशी बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत तीन जीवनाची लढाई हरली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. १७० फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढून चिमुकलीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण
२३ डिसेंबर २०२४ला सोमवारच्या दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास खेळताना चेतना बोअरवेलमध्ये पडली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. २४ डिसेंबरला मुलीला १५० फूट खोल खड्ड्यातून ३० फूट वर खेचण्यात आले. यामुळे आशा जागृत झाल्या. मात्र आव्हान कायम होते.
२५ डिसेंबरला पायलिंग मशीनच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्याआधी जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू केले. सतत खड्ड्यामध्ये ऑक्सिजन पोहोचवला जात होता. मात्र कॅमेऱ्यामध्ये चिमुकलीची हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. २६ डिसेंबरला उत्तराखंड येथून एक विशेष टीम बोलावण्यात आली. यानंतर पाइलिंग मशीनने सातत्याने खोदकाम सुरू होते. मात्र थांबून थांबून येणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. २७ डिसेंबरला रॅट होल मायनर्सची टीम घटनास्थळी पोहोचली.
२८ डिसेंबरला बोअरवेलच्या खड्ड्याजवळ १७० फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यात केसिंग टाकून खोदण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. एनडीआरफची टीम सुरक्षा उपकरणांसह ९० डिग्रीवर साधारण १० फुट सुरंग खोदण्यासाठी उतरली. २९ डिसेंबरला १७० फूट खोल खड्डा खणून एल आकाराचे खोदकाम करण्यात आले. ३० डिसेंबरला सुरंग खोदण्याचे काम पूर्ण झाले मात्र तेथून निघत असलेल्या गॅसमुळे श्वास घेणे कठीण होते. त्यामुळे बचाव टीम मुलीपर्यंत पोहोचू शकली नाही. ३१ डिसेंबरला सुरंग खोदल्यानंतरही बोअरवेलची जागा सापडली नाहीय यानंतर ४ फूट खोल सुरंग खोदण्यात आला यानंतर बोअरवेलला जाण्याचा मार्ग मिळाला.