Saturday, March 22, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखWelcome New Year : नव्या वर्षाचे स्वागत करू या!

Welcome New Year : नव्या वर्षाचे स्वागत करू या!

प्रत्येक सालापेक्षा वेगळे काही चित्र २०२५ मध्ये पाहायला मिळेल याबाबत प्रत्येकाच्या मनात अपेक्षा असणार आहेत. २०२४ मधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा आगामी वर्षात प्रभाव असेल, यात दुमत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करणे ही मानवाच्या भावनिक, सांस्कृतिक आणि सामाजिक आयुष्यातील एक महत्त्वाची बाब आहे. हे फक्त एक वार्षिक संकेत नसून जीवनातील नवनवीन अध्याय सुरू करण्याची प्रेरणा असते. विविध देशांमध्ये नववर्षाचे स्वागत करण्याच्या विविध पद्धती असल्या तरी, या सर्व प्रथा आणि परंपरांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आशा, आनंद आणि उत्सवातील उत्साह. जगभरात नववर्ष साजरे करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करताना लक्षात येते की, या परंपरांमध्ये सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा सुंदर संगम आहे. खरे तर भारत हा विविध संस्कृती आणि धर्मांचा देश असल्यामुळे येथे नववर्ष साजरे करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. शहरांमध्ये आधुनिक पद्धतीने पार्ट्या, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांनी स्वागत केले जाते, तर ग्रामीण भागात पारंपरिक पूजाअर्चा आणि धार्मिक विधींचा भाग महत्त्वाचा असतो. भारतातील सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये नववर्षानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी असते. तसे पाहिले तर इंग्रजी नववर्षाला हिंदू धर्माप्रमाणे कोणतेही महत्त्व नाही; परंतु नववर्ष हे नवचैतन्य देणारे ठरावे या आध्यात्मिक हेतूने मंदिरांकडे वळण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे.

महाराष्ट्राचा विचार करताना, महायुती सरकारने २०२४ सालात मतदारांना विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी लाडकी बहीण सारख्या योजना अमलात आणून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. सर्वसामान्य जनतेला आपले सरकार वाटावे यासाठी लोककल्याणकारी योजनेबरोबर, सुरक्षिततेची काळजी महायुतीचे सरकार घेईल, अशा अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच असणार आहे. नवी मुंबईत येत्या एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे, हवाई प्रवाशांचा कोट्यवधींचा टप्पा पार पडेल, अशी आशा आपण बाळगू या. त्याचबरोबर केंद्रातील एनडीए सरकारपुढे २०२५मध्ये महागाई, बेरोजगारी, कृषीविषयक समस्या या महत्त्वाच्या आव्हानांबरोबरच इतरही सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जगभरातील घटनांचा आपल्या देशातील जनतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे त्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. २०२४च्या उत्तरार्धात पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर ट्रम्प सरकार सत्तेत आले. ज्यांच्यामुळे कोणत्याही क्षणी महायुद्धाचा भडका उडू शकतो. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-आखाती देश यांच्यातील युद्धांना त्यामुळे फारसा काही फरक पडेल अशी आशा दिसत नाही. कारण, रशिया आणि इस्रायल ही अमेरिकेच्या दबावापुढे झुकणारी राष्ट्रे नव्हेत. इस्रायलला तर अमेरिकेचा आणि युक्रेनला पाश्चात्त्य देशांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे या युद्धांपासून दूर राहून आपले राजकीय महत्त्व कायम ठेवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल. भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडवणारा काश्मीर प्रश्न आणि दहशतवाद याला कायमस्वरूपी तोडगा काढण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरेल अशी आशा आहे.

भारतीय तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. २०२४ हे वर्ष एआय, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा आणि शाश्वत तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे गाजले. २०२५ मध्ये भारतीय बी२बी तंत्रज्ञानाचा लँडस्केप विकसित होत आहे. कारण व्यवसाय स्पर्धात्मक राहण्यासाठी तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. शिक्षणातील तंत्रज्ञान हे अधिक समावेशक आणि परिणामाभिमुख बनवण्याचे २०२५ सालातील उद्दिष्ट आहे. डिजिटल क्लासरूमपासून ते ऑनलाइन संसाधनांपर्यंत, शहरी-ग्रामीण भेद दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण महत्त्वाचे आहे, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळेल. हे नवीन शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे जुळते, जे आकर्षक शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरण्यावर साल २०२५ मध्ये भर देणे आवश्यक आहे.

सरत्या वर्षाचा आढावा घेताना आपण आपल्या जीवनातील चांगल्या, वाईट घटनांचा विचार करतो. कधी यशस्वी क्षणांची आठवण काढत त्याचा आनंद घेतो, तर कधी एखाद्या अपयशाला पाठीशी घालून नव्याने सुरुवात करण्याचा निर्धार करतो. नवीन वर्ष हे केवळ कॅलेंडर बदलण्याचे नाव नाही, तर आत्मपरीक्षण, आत्मविश्वास वाढवणे आणि स्वतःला सुधारण्यासाठीची संधी आहे. नवीन संकल्प, नवीन अपेक्षा आणि सकारात्मक विचारांची बीजे इथे रोवली जातात. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गुढीपाडव्याला नववर्ष साजरे केले जाते, तसेच थायलंडमध्ये सॉन्क्रान उत्सव साजरा केला जातो. थायलंडमध्ये पारंपरिक नववर्ष लुनार कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यात साजरे केले जाते. सॉन्क्रान म्हणजे थाई नववर्षाचा मुख्य सण आणि तो पाण्याच्या उत्सवासाठी जगभर ओळखला जातो. सॉन्क्रान हा संक्रमण या संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे, जो सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्या संक्रमणाचा अर्थ लावतो. थायलंडमध्ये हा सण जुन्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात गुढीपाढवा साजरा होत असला तरी, इंग्रजी कॅडेंलरप्रमाणे १ जानेवारीला नववर्षाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळेल. आशा करू या की, या जल्लोषाबरोबरचा उत्साह प्रत्येक क्षेत्रात ऊर्जा देणारा ठरो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -