भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा शिल्पकार म्हणून ज्यांची जगाला ओळख झाली त्या सलग दहा वर्षे देशाच्या पंतप्रधानपदावर राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधानानंतर आम आदमीप्रमाणेच त्यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सिंग यांच्यावर शासकीय इतमामाने व शिख परंपरेनुसार झालेल्या अंत्यसंस्कार देशातील कोट्यवधी जनतेने टीव्हीच्या पडद्यावर बघितला. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, दिल्लीच्या मुख्यमंत्री अातिषी, प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोट, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आदी दिग्गज नेते डॉ. सिंग यांच्या पार्थिव देहावरील अंत्यसंस्कार प्रसंगी हजर होते. प्रत्येकाने डॉ. सिंग यांच्याविषयी आदराच्या भावना व्यक्त केल्या. पण अंत्यसंस्कारानंतरही माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांच्यावर राजघाटावर किंवा शक्तिस्थळावर अंत्यसंस्कार करण्यास केंद्र सरकारने परवानगी का दिली नाही, हा प्रश्न कायम चर्चेत राहिला.
आज जगात भारताची बलशाली प्रतिमा निर्माण होण्यामागे डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणाचा व दूरगामी निर्णयांचा मोठा वाटा आहे. दोन टर्म सलग पूर्ण करणारे गांधी-नेहरू परिवाराच्या बाहेरचे डॉ. सिंग हे पहिलेच पंतप्रधान ठरले. डॉ. सिंग हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते. ते राजकारणी नव्हते. सोनिया गांधींनीच त्यांना एकदा नव्हे, तर दोन वेळा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी दिली. मग त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अन्य पंतप्रधानांच्या तुलनेने वेगळी वागणूक का देण्यात आली? देशभरातील मीडियातून डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर केंद्र सरकारने राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याचीच चर्चा जास्त झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांशी संपर्क साधून डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कार व स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. स्मारकाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व औपचारिकता सरकार लवकरच पूर्ण करील असे त्यांना उत्तर देण्यात आले. भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले की, डॉ. सिंग यांची समाधी व स्मारक बनविण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करणे, ट्रस्ट निर्माण करणे, जमिनीचे हस्तांतरण करणे यासाठी काही वेळ लागू शकतो. डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले ते काँग्रेसमुळेच. पण त्यांना पदावर असताना काँग्रेस पक्षाने, गांधी परिवाराने कसे वागवले हे सर्वश्रूत आहे. डॉ. सिंग हे दहा वर्षे पंतप्रधान असताना सोनिया गांधी याच सुपर पीएम होत्या, असे वातावरण होते. त्या काळात डॉ. सिंग यांना सोनिया गांधींचे बाहुले म्हटले जात असे. दि. ३ डिसेंबर २००४ रोजी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे निधन झाले. तेव्हा काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार सत्तेवर होते. मग तेव्हा नरसिंह राव यांचा अंत्यसंस्कार राजघाटावर का झाला नाही? नरसिंह राव यांचे स्मारक काँग्रेसने दिल्लीत का नाही उभारले? राव यांचे अंत्यसंस्कार राजधानीत होऊ नयेत व त्यांचे स्मारकही दिल्लीत असू नये असे काँग्रेसला वाटत होते, असे त्यांचे पुत्र प्रभाकर यांनीच म्हटले आहे. नरसिंह राव यांची हयात दिल्लीत गेली पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक हैदराबादमध्ये उभारणार असे काँग्रेसने तेव्हा म्हटले होते. राव यांच्या कुटुंबाने राव यांचे दिल्लीत स्मारक व्हावे असे सोनिया गांधींना पत्रही दिले होते. पण सोनियांनी काहीच केले नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या सरकारने २०१५ मध्ये नरसिंह राव यांची समाधी दिल्लीत बांधली व २०२४ मध्ये राव यांना भारतरत्न हा मरणोत्तर सर्वोच्च पुरस्कार दिला.
काँग्रेसने नेहरू-गांधी परिवाराच्या पलीकडे कोणाचाच आदर केला नाही हा इतिहास आहे. सीताराम केसरी, नरसिंह राव, प्रणव मुखर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग अशा उत्तुंग नेत्यांच्या बाबतीत हेच घडले. प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती झाले. त्यांच्या निधनानंतर आपल्याच नेत्याला काँग्रेस कार्यकारिणीत साधी श्रद्धांजलीही पक्षाने अर्पण केली नाही. सोनिया गांधींनी त्यांची कन्या शर्मिष्ठा यांना प्रणवबाबूंच्या निधनानंतर दु:ख झाल्याचे पत्र पाठवले पण ज्या पक्षासाठी मोठ्या नेत्याने हयात घालवली, त्यांच्या निधनानंतर शोकप्रस्तावही काँग्रेसने संमत केला नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करावा लागतोय, हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अवमान केला, असे ट्वीट केले. डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी व स्मारकासाठी १ हजार यार्ड जागा भाजपा सरकार देऊ शकत नाही, याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खंत व्यक्त केली आहे. डॉ. सिंग यांचे स्मारक उभारण्यासाठी शक्तिस्थळ (इंदिरा गांधींची समाधी) किंवा वीरभूमी (राजीव गांधींची समाधी) जवळ जागा देण्यास काय अडचण होती, अशी विचारणा प्रियंका गांधींनी केली. पंजाब काँग्रेसचे नवज्योत सिद्धू यांनी म्हटले – अटलजींचा अंत्यविधी राजघाटावर होणार नाही व तिथे स्मारक होणार नाही, असे कोणी सांगितले तर तुम्हाला कसे वाटेल? शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनीही केंद्राच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपण माजी पंतप्रधानांच्या निधनानंतर कसे वागलो याचे जरी काँग्रेसने स्मरण केले तरी स्मारकावरून राजकारण करणे योग्य आहे का, याचे उत्तर काँग्रेसलाच मिळेल. तिरंग्यात लपटलेले नरसिंह राव यांचे पार्थिव दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयासमोर आणले गेले तेव्हा अर्धा तास तेथे थांबूनही मुख्यालयाचा दरवाजा उघडला गेला नव्हता. या घटनेने कोणालाच यातना झाल्या नसतील असे काँग्रेस श्रेष्ठींना वाटते का? देशाच्या दहा दिवंगत पंतप्रधानांच्या समाधी आहेत. मोरारजी देसाई यांची समाधी अहमदाबाद येथे आहे. पंतप्रधान असताना मंडल आयोगाच्या शिफारसी अमलात आणणाऱ्या विश्वनाथ प्रताप सिंग यांची समाधी नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचे राष्ट्रीय स्मृतिस्थळ राजघाटावर उभे आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती आणि महत्त्वाकांक्षा मुळीच नव्हती.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची इंडिया शायनिंग घोषणा फसली आणि काँग्रेसचे आश्चर्यकारक पुनरागमन झाले. त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होत्या आणि त्याच आता पंतप्रधान होणार असे सर्वांनीच गृहीत धरले होते. पण भाजपाने त्यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला. इटलीत जन्म झालेली व्यक्ती भारताची पंतप्रधान कशी होऊ शकते? देशाच्या सर्वोच्च संवेदनशील पदावर विदेशी जन्माची व्यक्ती कशी बसू शकते? भाजपाच्या आक्रमक नेत्या सुषमा स्वराज व उमा भारती यांनी सोनिया यांना पंतप्रधान होण्यास कठोर विरोध केला. सोनिया पंतप्रधान झाल्या, तर आपण मुंडन करून देशभर निषेध व्यक्त करीत फिरू असा इशारा सुषमा स्वराज यांनी दिला. सुषमा व उमा या फायरब्रँड महिलांच्या लढाऊ पावित्र्याने सोनिया गांधींचा पंतप्रधान पदाचा मार्ग रोखला. काँग्रेस पक्षातील सारे नेते सोनियांनी पंतप्रधान व्हावे म्हणून हट्टाला पेटले होते, पण त्यातला धोका सोनियांनी ओळखला. सोनियांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण राष्ट्रपती भवनमध्ये तयार होते. पण काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत स्वत: सोनिया यांनीच नेते पदासाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव सुचवले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आणखी मोठे यश मिळाले. पण त्या यशाचे श्रेय कोणी डॉ. सिंग यांना दिले नाही. सोनिया यूपीए व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या अध्यक्ष होत्या. तेव्हा राज्याचे व केंद्राचे मंत्री, खासदार, व्हीआयपी हे थेट १० जनपथवर सोनियांना भेटायला जात असत. पंतप्रधानांवर सोनिया यांचाच रिमोट कंट्रोल चालतो, अशी भरपूर टीका झाली. डॉ. सिंग यांना मौनीबाबा म्हणून आणि अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर म्हणून संबोधले गेले. पण डॉ. सिंग आपले काम शांतपणे करीत राहिले, कोणाच्याही टीकेला त्यांनी कधीच उत्तर दिले नाही. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर खासदार-आमदाराचे सदस्यत्व रद्द होणार असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर काँग्रेससह यूपीएतील सारे पक्ष हादरले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल रोखणारा अध्यादेश तेव्हा यूपीए सरकारने काढला. भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देणारा अध्यादेश काढला, म्हणून विरोधी पक्षाने देशभर वादळ उठवले. तेव्हा राहुल गांधींनी दिल्ली प्रेस क्लबमध्ये हा कसला अध्यादेश म्हणून तो जाहीरपणे टराटरा फाडून फेकून दिला. आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांचा एवढा जाहीर अवमान यापूर्वी कोणी केला नव्हता. तेव्हा डॉ. सिंग हे विदेशात होते, भारतात परतल्यावर त्यांनी पण राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पंतप्रधान असताना पहिल्या टर्ममध्ये त्यांनी जेएनयू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ)ला भेट दिली. सिंग यांच्या बजेटमधील आर्थिक धोरणाला व काही कपातींना विरोध म्हणून विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाही दिल्या. नंतर स्वत: डॉ. सिंग विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना म्हणाले – विद्यार्थी असोत किंवा कोणीही, प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. आपले प्रश्न कोणी मांडत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. पत्रकारांशी बोलताना डॉ. सिंग एकदा म्हणाले – मै यह नहीं मानता कि मैं एक कमजोर प्रधानमंत्री हूँ. मुझे उम्मीद है कि मीडिया की तुलना में इतिहास मेरा मूल्यांकन करते समय जादा उदार होगा…
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…