Friday, June 13, 2025

महिलांना नोकरी देणे बंद करा, अन्यथा एनजीओंची मान्यता रद्द!

महिलांना नोकरी देणे बंद करा, अन्यथा एनजीओंची मान्यता रद्द!

महिला राहत असलेल्या घरांमध्ये खिडक्या बसवण्यावर बंदी


काबुल : अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यानंतर तेथील महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. आता तालिबानी सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. हा आदेश तालिबान सरकारने बिगर शासकीय संस्थांना (एनजीओ) देण्यात आला असून महिलांना रोजगार देणे तत्काळ बंद करावे, अन्यथा संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


तालिबानच्या अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एका पोस्टद्वारे हा इशारा दिला आहे. तालिबानने म्हटले आहे की, ते अफगाणिस्तानात महिलांना काम देणाऱ्या सर्व राष्ट्रीय आणि विदेशी गैर-सरकारी संस्था (एनजीओ) बंद करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सर्व स्वयंसेवी संस्थांना महिलांना रोजगार देण्यास मनाई केली होती. स्त्रिया इस्लामिक हिजाब नीट परिधान करत नाहीत असे सांगितल्यामुळे तालिबानने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.


आदेशाचे पालन न करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना सक्त ताकीदही देण्यात आली आहे. अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांवर नियंत्रण आणि हस्तक्षेप करण्याचा तालिबानचा हा नवा प्रयत्न आहे.



महिला राहत असलेल्या घरांमध्ये खिडक्या बसवण्यावर बंदी


तालिबानने शनिवारी देखील असाच एक आदेश दिला होता. तालिबानने महिला राहत असलेल्या घरांमध्ये खिडक्या बसवण्यावर बंदी घालणारा नवा फर्मान जारी केला आहे. त्यानुसार, महिला दिसू शकतील, अशा ठिकाणी खिडक्या बनविण्यास बंदी घालण्यात आली. यामुळे अश्लीलता पसरते, असा तर्क दिला होता.


महिलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या शेजाऱ्यांकडील विहीर, अंगण, स्वयंपाकघर आदी जागा दिसतील, अशा ठिकाणी खिडक्या नको, असे तालिबान प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केले होते. त्याचबरोबर अशा ठिकाणी ज्या आधीपासून खिडक्या आहेत, तिथे खिडक्यांसमोर भिंत उभारण्याचे आदेश घरमालकांना दिले आहेत.

Comments
Add Comment