Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखNavi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ विकासाचे नवे पर्व...

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ विकासाचे नवे पर्व…

छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेपावलेले इंडिगो एअरलाइन्सचे ‘ए-३२०’ विमान रविवारी दुपारी १.४० वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विसावले. पहिले व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरवण्यात आल्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विमानतळ आता लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (एनएमआयए) लवकरच सेवा सुरू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेगाने काम सुरू आहे. नवी मुंबई विमानतळावरून व्यावसायिक सेवांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. विमानतळाचे विधिवत उद्घाटन १७ एप्रिल २०२५ रोजी केले जाणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असू. एरोड्रोमच्या परवानगीसाठी आम्ही ६ फेब्रुवारी रोजी अर्ज करणार आहोत. ७० दिवसांच्या आत आम्हाला ही परवानगी मिळू शकते. मे २०२५ पासून उड्डाणांना नियमित सुरुवात होणार आहे, असे अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी सांगितले. “देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेणाऱ्या महत्त्वाच्या एअरलाइन्सशी आम्ही चर्चा करत असून प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचे आमचे ध्येय आहे.

अतिरिक्त प्रवाशांचा भार पेलण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व सुविधांनी युक्त आहे. त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होईल,”असेही बन्सल यांनी पुढे सांगितले. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळामधील अंतर हे फक्त ३५ किलोमीटरचे असल्यामुळे मुंबईच्या रहिवाशांनाही नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करण्यासाठी आम्ही अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे हे विमानतळ प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही उच्च दर्जाच्या सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे उड्डाण घेण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी उसळली तरी आम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, असा विश्वास विमानतळ व्यवस्थापनाकडू्न व्यक्त करण्यात आला आहे.

अदानी समूहाने २०२१ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक नियंत्रक हिस्सा विकत घेतला. जून २०२२ मध्ये सिडकोने बांधकाम सुरू करण्यासाठी २८६६ एकर जमीन अदानी समूहाला सुपूर्द केली. सिडकोनेही ५ हजार कुटुंबांच्या पुनर्वसनाचे नियोजन केले आहे. नवी मुंबई विमानतळाचे भूसंपादन २०१९मध्ये पूर्ण झाले, मात्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी अनेक आव्हाने होती. त्यामुळे सिडकोने पुढील चार वर्षांत अदानी समूहाच्या मदतीने प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन केले. सप्टेंबर २०२३ मध्ये, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (आयएटीए) नवी मुंबई विमानतळाला एनएमआय कोड प्रदान केला. ऑगस्ट २०२४ मध्ये, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्याच्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमसाठी (आयएलएस) फ्लाइट कॅलिब्रेशनची चाचणी घेतली. विमानतळाचा परवाना देण्यापूर्वी आणि कार्यान्वित करण्यापूर्वी आयएलएस चाचणी करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया होती. मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीला मार्च २००८ मध्ये सुरुवात झाली. अडीच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार आल्यानंतर विमानतळाच्या कामाने वेग घेतला. ऑक्टोबर १०३४ मध्ये या प्रक्रियेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. भारतीय वायुसेनेच्या विमानाने या विमानतळावर ट्रायल लँडिंग यशस्वीरीत्या पार पाडले. चाचणी लँडिंगमुळे अभियंते आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांना कामगिरी आणि विमानतळाच्या तयारीचे मूल्यांकन करण्याची परवानगी मिळाली. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय वायुदलाच्या सी-२९५ या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. वायुदलाच्या अनुभवी चालकांनी ही मोहीम यशस्वीपणे राबवली होती. आता व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग झाल्याने रितसर विमानसेवेची सुरुवात होण्यास कुठलीही आडकाठी नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची क्षमता आहे. येथून दरवर्षी २.५ दशलक्ष टन कार्गो वाहतूक होईल. पनवेलपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १० मिनिटांच्या अंतरावर आहे. या विमानतळावर रस्ता, मेट्रो रेल्वे आणि उपनगरीय रेल्वेमार्गे सहज पोहोचता येईल. विमानतळ नवी मुंबई मेट्रो लाईन १ आणि मुंबई मेट्रो लाईन ८ ला जोडते, ज्याला गोल्ड लाईन देखील म्हणतात. हे विमानतळ मुंबई-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू असेल. तसेच शिवडी-न्हावा-शेवा-ट्रान्स-हार्बर सी लिंक किंवा एमटीएचएल येथून विमानतळावर सहज प्रवेश करता येईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एरोट्रोपोलिसमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नवी मुंबईत लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होतील. विमानतळाचा सर्वात मोठा फायदा नवी मुंबईच्या रिअल इस्टेटला, विशेषतः पनवेलला झाला आहे. मुंबईच्या विपरीत, नवी मुंबईच्या आसपासचा बहुतांश विकास हा ग्रीनफिल्ड असेल. त्यात रुंद रस्ते, फुटपाथ, चांगला ड्रेनेज आणि सांडपाणी व्यवस्था आदी पायाभूत सुविधा नियोजित पद्धतीने तयार केल्या जातील. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर येथील जागांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. विमानतळामुळे पनवेल, उलवे, कामोठे, खारघर आणि तळोजा या प्रमुख बाजारपेठांना फायदा होईल. हे सर्व क्षेत्र मिळून तिसरी मुंबई बनते. नवी मुंबई विमानतळामुळे पनवेलचा नवी मुंबईतील व्यावसायिक हॉटस्पॉट म्हणून उदय होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकदा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर, या भागांमधील व्यावसायिक रिअल इस्टेटच्या किमती वाढू शकतात. कारण मागणी
जास्त आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -