Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखसरकारच्या निष्काळजीपणाचे बळी?

सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अशा काही अपघाती घडामोडी घडत आहेत ज्या अनपेक्षित असून मुंबईच्या प्रतिष्ठेलाही शोभत नाहीत. कुर्ला येथील बेस्ट बस अपघात असो वा गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटा येथे जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडून झालेला अपघात असो, रोज कित्येक जण असेच गाडीखाली येऊन अथवा अपघात होऊन मरत असतात. मात्र हा नशिबाचा भाग होता की, प्रशासकीय निष्काळजीपणाचा भाग होता. ही एक घटना होती म्हणून सर्वजण मृत्यू पडलेल्यांच्या नातेवाईकांना पैशाची मदत करून निर्धास्त होणार की, यातून कोणता धडा घेणार…

मुंबई डॉट कॉम – अल्पेश म्हात्रे

मुंबई शहरात नुकतेच कुर्ला येथे भर रहदारीच्या वेळेत बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. त्यात ९ जण मृत्युमुखी पडले. मुंबईत बेस्टचे थोडे-फार प्रमाणात अपघात होतात; मात्र हा अपघात इतका भीषण अपघात होता की, बसच्या रूपाने साक्षात यमदूतच होता की काय? असा प्रश्न पडतो. यात ५० हून अधिक जण जखमी झाले, कित्येक जणांची स्वप्न उद्ध्वस्त झाली, कित्येक जण कायमचे जायबंदी झाले, कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. यामधून सावरत असतानाच काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर एक बेस्ट अपघात झाला. त्यात एकाला आपले प्राण गमवावे लागले, तर काही दिवसांनी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या बोटीला नौदलाच्या एका नादुरुस्त बोटीने धडक देऊन अपघात झाला. त्यात कित्येक जणांना बुडून जलसमाधी मिळाली, तर कित्येक जण थोडक्यात बचावले, तर या दोन घटनेतून बाहेर पडत असतानाच दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे टेम्पोवाल्याचे नियंत्रण सुटून त्यांनी पाच दुचाकींना धडक दिली त्यात अनेक दुचाकीस्वार व हातगाड्यांचे नुकसान झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला आणि अगदी कालचीच ताजी बामी म्हणजे तर मराठी अभिनेत्रीच्या चालकाने भर वेगात गाडी चालवल्याने त्याचा नियंत्रण सुटून ती पोईसर मेट्रोस्थानकाखाली काम करत असलेल्या मजुरांना धडक दिली. त्यात दोन मजूर मृत्युमुखी पडले, तर अभिनेत्री अजूनही इस्पितळात उपचार घेत आहे.

या अशा घटनांमुळे मुंबई शहरातील पादचारी काय आता पर्यटकही सुरक्षित नाहीत असा चुकीचा संदेश सर्वत्र जाऊ शकतो व कालांतराने मुंबईच्या पर्यटनालाही याचा फटका बसू शकतो हे आता लक्षात घेतले पाहिजे. मुंबई शहर हे अपघातांचे शहर असे नावारूपाला येऊ नये हीच इच्छा. एलिफंटा येथे घडलेल्या अपघातात तर पंधरा जणांचा नाहक मृत्यू झाला, तर कित्येक जणांना वाचवण्यात यश आले. मुंबईत पायी चालत निघाले तरी कुठले झाड तर अंगावर कोसळणार नाही किंवा एखादे होल्डिंग तर अंगावर पडणार नाही याचीही भीती घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वसामान्यांच्या मनात घर करू लागल्या आहेत, रस्त्यावर चालायला गेले तर कोणते वाहन बेकाबू होऊन आपल्या अंगावर येऊन आपले प्राण तर घेणार नाही अशी भीती सतत पादचाऱ्यांच्या मनात घोंगावत आहे. बाकी दुचाकीवरचे अपघात मुंबईला रोज नवीन नाहीत. व दुचाकीस्वारांच्या चालवण्यावर तर बोलायचीच सोयच राहिलेली नाही. दुचाकीस्वारांच्या स्वैराचारावर बोलण्याचीही कोणती सोय राहिलेली नाही. याचा परिणाम मुंबईच्या जडणघडणीवर उद्योग-धंद्यांवर तसेच पर्यटनावरही होऊ शकतो. अशा बेशिस्तीमुळे मुंबईचे महत्त्व कमी होऊ शकते. आर्थिक नुकसान होईल ते वेगळेच. एलिफंटा येथे जाणाऱ्या नीलकमल बोटीवर आलेले प्रवासी हे तर मुंबईच्या पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यास आले होते. त्यांत त्यांची काय चूक होती.नौदलाची नादुरुस्त बोट येऊन त्यावर धडकते काय आणि यातील १५ जणांना जलसमाधी मिळते काय सगळेच समजण्यापलीकडील आहे.

मुंबईत आनंद लुटण्यासाठी आलेले ते पर्यटक जीवनातील दोन क्षण वेगळ्या वातावरण घालवायला आले होते. आपल्या मुलांच्या हट्टाखातर त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले होते पण त्यांच्यावर अशा पद्धतीने काळाने घाला घातला. असा काही प्रकार घडण्याची कोणती कल्पना नसताना ही घटना घडली. इतर यंत्रणा तेथे लवकर पोहोचल्यामुळे बोटीतून शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले मात्र १५ जणांना आपला जीव गमवावा लागला. अशा घटनांमुळे मनात भीती उत्पन्न होणे हे स्वाभाविकच आहे. मुंबईत आता त्यामुळे कोणताही प्रवास असुरक्षित राहिलेला नाही.मुंबईची लोकसंख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यातच रस्ते कोणतेही करा डांबरी अथवा सिमेंटचे. ते मोठे न होता रुंदच होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा गाड्यांचे पार्किंग केले जात आहे. वाहनचालकांना शिस्त राहिलेली नाही. वाहतूक पोलिसांचे कार्य अशा वाहनचालकांना शिस्त लावणे आहे. मात्र त्यांच्या पुढे ही महत्त्वाची गोष्ट नसून अशा प्रकारे एखादा वाहनचालक भेटलाच तर त्याच्याकडून वसुली करणे हेच त्यांचे एकमेव कार्य राहिलेले आहे. दंड गोळा करून वसूल करणे व सरकारी महसुलात भर घालणे. वाहनचालकांना शिस्त लावणे यांचे प्राधान्य कशाला द्यायचे याचे उत्तरच आता त्यांच्याकडून मिळवले पाहिजे. रस्त्यावरील फेरीवाले मुंबईतील फार मोठी समस्या आहे पण त्यावर तोडगा काढला जात नाही. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी कधीही होऊ शकत नाही हे माहीत असताना केंद्र सरकारने कोट्यावधी रुपयांचे कर्ज त्यांना दिले आहे. ते केवळ त्यांच्या व्यवसायात वाढ व्हावी म्हणून पण त्याचा उलटा परिणाम होतोय. फेरीवाल्यांच्या संघटित दादागिरीसमोर एकटा ग्राहक काहीच करू शकत नाही.पालिकेला न्यायालयाचे आदेश आहेत त्यांनी व पोलिसांनी संयुक्तपणे पदाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी पण आदेश आल्यानंतर थोडे दिवस कारवाई करण्यात येते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे राहते हे नेहमीचेच झाले आहे.

सध्या पालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. ज्या ठिकाणी कुर्ल्याचा अपघात झाला त्या ठिकाणी पालिकेने अपघातानंतर कारवाई केली तीच आधी कार्यवाही केली असती, तर रस्ता थोडा मोठा झाला असता व अपघातात काही लोकांना आपली बळी द्यावी लागली नसती. हे बळी प्रशासनाचे बेपरर्वाईचे बळी तर नव्हेत ना? तीच गोष्ट नीलकमल बोटीला झालेली दुर्घटना.

नीलकमल बोटीची काहीही चूक नसताना नौदलाची नादुरुस्त बोटीत बिघाड झाला होता व ती या नीलकमल बोटीवर आदळली मात्र यात दोष कोणाचा? यातील नीलकमल बोटीचा परवाना रद्द करण्यात आला. कारण काय तर त्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीतून वाहून नेण्याचा गुन्हा केला. मात्र ही गोष्ट उजेडात येण्यास दुर्घटना कारणीभूत ठरली. आता सर्वच बोटींचे परवाने तपासले जाणार व बोटीही नियमानुसार चालणार. प्रवासी अगदी लाईफ जॅकेट घालून बोटीत बसणार ते पुढची दुर्घटना होईपर्यंत…

कुर्ला येथे बेस्ट बस अपघात प्रकरणी सर्वच कंत्राटी बसचालकांची आता तपासणी सुरू होणार . त्या बसचालकांनी किती प्रशिक्षण घेतले आहे त्यात किती गैरव्यवहार झाले आहेत याचाही शोध लावला जाणार. मात्र हे सर्व करण्यास अपघातच घडून आला हे आपल्याच प्रशासकीय यंत्रणेचे दुर्दैव होय. हे कायमचे राहो. नाही तर दुसऱ्या अपघाताची वाट पाहावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -